Goan Cashews: अनेक दिवसांपासून प्रतीक्षेत असलेल्या गोवन काजू ब्रॅंडला अखेर प्रादेशिक मानांकन (जीआय) मिळाले आहे. मात्र, उत्पादन वाढवण्याबरोबर गोव्याच्या काजूत होणारी भेसळ ही मोठी समस्या असून ती कशी रोखावी, याकडे सरकारने लक्ष द्यावे, असे मत काजू उत्पादक असोसिएशनचे अध्यक्ष रोहित झांट्ये यांनी ‘गोमन्तक’शी बोलताना व्यक्त केले.
इतिहासाचे पुरावे पाहता पोर्तुगीजांनी गोव्यात काजूच्या मूळ (ओरिजनल) जाती आणल्या. प्रामुख्याने डोंगर माथ्यावरील मातीची धूप रोखण्यासाठी त्यांनी त्याचा उपयोग केला. मात्र इथले भौगोलिक वातावरण, जमीन आणि पर्यावरणीय परिस्थितीमुळे गोवन काजूला रुचकर वेगळी चव प्राप्त झाली. यामुळेच विज्ञान-तंत्रज्ञान आणि पर्यावरण खात्याच्या वतीने केलेल्या प्रयत्नांमुळे गोवन काजूला जीआय मानांकन मिळाले आहे.
आता सर्वात मोठी समस्या गोव्यातील काजू मधील भेसळ रोखणे ही आहे. गोव्याच्या काजूला वेगळी रुचकर चव आहे हे लक्षात आल्यानंतर पर्यटकांकडून मागणी वाढली. मग या व्यवसायात व्यापारीवर्गाने घुसखोरी करत इतर राज्यातून आणि परदेशातून मोठ्या प्रमाणात काजू आयात सुरू केली असून त्याला ‘गोवन ब्रँड’ असे नाव दिले आहे.
मात्र, हा खरा ‘गोवन काजू’ नाही त्यामुळे मानांकन मिळूनही भेसळ रोखणे हे ‘गोवन काजू’ समोरचे मोठे आव्हान आहे, असे काजू उत्पादक झांट्ये यांनी सांगितले.
भेसळ रोखण्यासाठी स्थानिक उत्पादन वाढवणे महत्त्वाचे आहे. यासाठी कृषी खात्याने केंद्रीय किनारी शेती संशोधन केंद्र, कृषी विज्ञान केंद्र यांच्या सहकार्याने नवीन जादा उत्पादन देणाऱ्या जातींचा प्रचार प्रसार केला पाहिजे. राष्ट्रीय किनारी शेती संशोधन केंद्राने नव्या शोधून काढलेल्या गोवा १,२,३,४ या जातींचा लागवड केल्यास उत्पादनात नक्कीच वाढ होईल. -डॉ. ए.आर. देसाई, संशोधक
गोव्यात २६ हजार ३२ टन काजू उत्पादित होतो. तर ५६ हजार ८९० हेक्टर वर काजूचे उत्पादन घेतले जाते. एकरी ४५८ काजू उत्पादन मिळते. प्रामुख्याने सत्तरी, धारबांधोडा, नेत्रावळी, सांगे, काणकोण या भागात काजूचे उत्पादन घेतले जाते. वाढीसाठी शेतकऱ्यांकडूनही चांगला प्रतिसाद मिळणे अपेक्षित आहे.-नेव्हील अल्फान्सो, कृषी संचालक
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.