Ponda By Election Dainik Gomantak
गोवा

Goa ZP Election: 'भाजप' तिकिटासाठी भाऊगर्दी, पक्षश्रेष्ठींची डोकेदुखी वाढली; 12 पेक्षा अधिक उमेदवारांचे गुडघ्‍याला बाशिंग

Goa Zilla Panchayat Election: राज्‍यात जिल्हा पंचायत निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. अनेक इच्छुक उमेदवारांनी आपापल्या मतदारांची भेट घेण्यास सुरुवात केली आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

फोंडा: राज्‍यात जिल्हा पंचायत निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. अनेक इच्छुक उमेदवारांनी आपापल्या मतदारांची भेट घेण्यास सुरुवात केली आहे. धारबांदोडा मतदारसंघात जिल्हा पंचायत निवडणुकीसाठी १२ पेक्षा अधिक इच्छुक उमेदवार तयारीत आहेत. त्‍यामुळे मतदारांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.

सत्ताधारी भाजपचे तिकीट मिळविण्यासाठी धारबांदोड्यात उमेदवारांची वाढलेली ‘भाऊगर्दी’ पक्षातील वरिष्ठ नेत्यांसाठी डोकेदुखी ठरत आहे. साकोर्डा पंचायतीचे माजी सरपंच तथा विद्यमान पंच शिरीष देसाई, युवा मोर्चा अध्यक्ष रुपेश देसाई आणि कुळे पंचायतीचे माजी सरपंच मच्छिंद्र देसाई हे तिघेही भाजप तिकिटासाठी प्रबळ दावेदार मानले जात आहेत. मात्र अंतिम क्षणी पक्ष कोणाच्‍या गळ्‍यात माळ टाकणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सध्या धारबांदोडा हा सर्वसामान्यांसाठी खुला मतदारसंघ आहे. तेथे अपक्ष म्हणून नीलेश मापारी, माजी जिल्हा पंचायत सदस्य गोविंद गावकर, युवा मोर्चा अध्यक्ष रुपेश देसाई, दूधसागर जीप असोसिएशनचे अध्यक्ष नीलेश वेळीप, साकोर्डा माजी सरपंच गौतम सावंत, पंच व युवा समाजसेवक साईश नाईक यांनी लोकांच्या गाठीभेटी सुरू केल्या आहेत.

तसेच साकोर्डा पंच महादेव शेटकर, नीलेश मापारी हेही प्रचारात सक्रिय आहेत. काही इच्छुक उमेदवार भाजप उमेदवारी जाहीर होईपर्यंत थांबून, परिस्थितीनुसार माघार घेण्याची शक्यता आहे.

भाजप आमदार तथा सभापती डॉ. गणेश गावकर यांच्यासाठी सावर्डेतील दोन्ही मतदारसंघ जिंकणे मोठे आव्हान ठरणार आहे. पक्ष ज्याला उमेदवारी देईल, त्याला विजय मिळवून देण्याची जबाबदारी आम्ही घेऊ, असे त्यांनी सांगितले. दरम्यान, काही उमेदवार भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या संपर्कात राहून तिकीट मिळविण्यासाठी धावपळ करत आहेत. दरम्यान, साकोर्डा पंचायत क्षेत्रातून अनेक जण रिंगणात उतरण्याच्या तयारीत आहेत. माजी सरपंच गौतम सावंत यांच्याही उमेदवारीची चर्चा आहे.

अशी आहेत संभाव्य समीकरणे

साकोर्डा पंचायत क्षेत्रातून उमेदवार ठरण्याची शक्यता

तिकीट न मिळाल्यास काहींची बंडखोरी शक्‍य

नोव्हेंबर तिसऱ्या आठवड्यात भाजप उमेदवार होणार जाहीर

भाजपचे चर्चेतील चार चेहरे

कुळे सरपंच व सावर्डे भाजप मंडळ सरचिटणीस म्हणून उत्तम कामगिरी केली आहे. पक्षाने दिलेली जबाबदारी निष्ठेने पार पाडत परिसरातील अनेक प्रश्‍‍न सोडविले. युवा नेतृत्वाला संधी देण्याचा पक्षाचा निर्णय झाल्यास विचार होण्याची शक्यता अधिक.

शिरीष देसाई : पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते. विधानसभा निवडणुकीसाठी पूर्वी उमेदवारीची इच्छा व्यक्त केली होती. ‘‘मी जुना कार्यकर्ता असल्याने यावेळी पक्ष माझाच विचार करेल’’ असा ठाम विश्‍‍वास.

नीलेश वेळीप : माजी पंचसदस्‍य. दूधसागर जीप टूर असोसिएशनचे अध्यक्ष. समाजकार्यात सक्रिय सहभाग. पक्षाची उमेदवारी मिळेल असा ठाम विश्‍‍वास.

गोविंद गावकर : माजी जिल्‍हा पंचायत सदस्य. धारबांदोड्यात चांगले वर्चस्व. पत्नी विद्यमान जिल्हा पंचायत सदस्य. त्यामुळे भाजपकडून विचार होण्याची मोठी शक्यता.

सासष्टीत विरोधकांच्या युतीचे गणित बनले गुंतागुंतीचे

दक्षिण गोवा जिल्हा पंचायत निवडणुकीच्या दृष्टीने सर्वाधिक महत्त्‍वाचा तालुका ठरलेल्या सासष्टीत राजकीय समीकरणे वेगाने बदलत आहेत. या निवडणुकीत आपली ताकद अजमावण्यासाठी गोवा फॉरवर्ड पक्षाने तयारी ठेवली असली तरी, काँग्रेस पक्ष कोणती भूमिका घेतो, याकडे त्यांचे विशेष लक्ष लागले आहे.

गोवा फॉरवर्ड, काँग्रेस आणि रिव्होल्युशनरी गोवन्स (आरजी) या तिन्ही पक्षांनी जिल्हा पंचायत निवडणूक एकत्र येऊन लढण्याची इच्छा व्यक्त केली आहे. तरीसुद्धा काँग्रेसने आपली भूमिका अद्याप स्पष्ट केली नसल्याने, विरोधकांच्या संभाव्य युतीचे गणित अजून स्पष्ट झालेले नाही. सासष्टी तालुक्यात राय, नुवे, दवर्ली, गिरदोली, कुडतरी, नावेली, कोलवा, वेळ्‍ळी आणि बाणावली असे नऊ मतदारसंघ आहेत. युती झाल्यास कोणते मतदारसंघ कुणाला मिळणार, हे अजून निश्चित झालेले नाही. त्यामुळे कोणताही पक्ष आपली रणनीती जाहीर करत नाही.

दरम्यान, आम आदमी पक्षाने मात्र स्पष्ट भूमिका घेत नऊही मतदारसंघांत उमेदवार उभे करण्याचा निर्णय घेतला आहे. ‘आप’चे कार्यकारी अध्यक्ष जर्सन गोम्स यांनी सांगितले की, आमचे संभाव्य उमेदवार निश्चित झाले आहेत. उद्यापर्यंत बैठकीनंतर अंतिम यादी जाहीर करू. बाणावली मतदारसंघातून विद्यमान सदस्य जोसेफ पिमेंता पुन्हा निवडणूक लढवतील.

गोवा फॉरवर्डने म्‍हटले आहे की, आमची तयारी सुरू आहे. काँग्रेसने युतीसाठी तयारी दर्शविल्यास आम्हीही त्यासाठी खुले आहोत. पक्षाध्यक्ष विजय सरदेसाई यांनी यापूर्वीच ‘विरोधकांची युती जिल्हा पंचायत निवडणुकीपासूनच व्हावी’ अशी भूमिका घेतली आहे. यापूर्वी गोवा फॉरवर्डने राय व दवर्ली या दोन मतदारसंघांत संभाव्य एसटी उमेदवार निश्चित केले होते; मात्र दवर्ली मतदारसंघ इतर मागासवर्गीयांसाठी राखीव ठरल्याने पक्षाची गणिते काही प्रमाणात विस्कळीत झाली आहेत.

सासष्टी तालुका हा काँग्रेसचा पारंपरिक बालेकिल्ला मानला जातो. तरी देखील काँग्रेसने अद्याप आपली अधिकृत भूमिका स्पष्ट केलेली नाही. तथापि, बाणावली व कोलवा या दोन मतदारसंघांसाठी उमेदवार निश्चित झाल्याची माहिती मिळाली आहे. यापूर्वी आम आदमी पक्षातून बाहेर पडलेले पॉल लोबो यांना काँग्रेस उमेदवारी देईल अशी अपेक्षा होती; मात्र त्यांच्याऐवजी दुसऱ्या उमेदवाराला उभे करण्याचा निर्णय घेतल्याचे समजते.

निवडणुकीवर लक्ष केंद्रित करा

पुढील महिन्यात होणाऱ्या जिल्हा पंचायत निवडणुकीवर लक्ष केंद्रीत करण्याबरोबर मतदारयादी पुनरावलोकनाच्या कामाबाबत पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी सजग रहावे, असे आवाहन काँग्रेसच्या नेत्यांनी आज सोमवारी पक्षीय कार्यकारिणीच्या बैठकीत पदाधिकाऱ्यांना केले.

गोवा चेंबर ऑफ कॉमर्स ॲण्ड इंडस्ट्रीजच्या सभागृहात झालेल्या या बैठकीच्‍या व्यासपीठावर प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर, विरोधी पक्षनेते युरी आलेमाव, वरिष्ठ उपाध्यक्ष एम. के. शेख, कार्यकारी सदस्य, प्रदेश काँग्रेस प्रतिनिधी आणि गटाध्‍यक्षांची उपस्थिती होती.

पाटकर यांनी या बैठकीविषयी ‘गोमन्तक’ला सांगितले की, जिल्हा पंचायत निवडणुकीबाबत रणनीती आखण्यासाठी पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. शिवाय राज्यातील प्रत्येक बूथ अध्यक्षांनी आपापल्या गटात पक्षाची भूमिका आणि राज्यातील सरकारचे विविध पातळीवरील अपयश सांगावे. केंद्रीय नेते राहुल गांधी यांनी बोगस मतदारांविषयी सुरू केलेल्या अभियानानुसार राज्यातील बोगस मतदारांबाबत सजगता बाळगणे महत्त्वाचे आहे.

युरी यांनीही राज्यातील भाजप सरकारचे कायदा व सुव्यवस्था राखण्यात अपयश, त्याचबरोबर राज्याशी निगडित असलेल्या विविध मुद्यांवर सरकारची झालेली पिछेहाट यावर प्रकाश टाकला.

कलाकारांसाठी काय करणार? जाहीरनाम्यात सांगा

प्रत्येक निवडणुकीत उमेदवार विविध आश्वासने देतात, पण कलाकारांच्या मूलभूत प्रश्नांकडे कोणीही लक्ष देत नाही. आगामी जिल्हा पंचायत आणि विधानसभा निवडणुकीतील संभाव्य उमेदवारांनी आपल्या जाहीरनाम्यात कलाकारांसाठी ठोस योजना नमूद कराव्यात, अशी मागणी मांद्रेचे माजी सरपंच व विद्यमान पंच प्रशांत ऊर्फ बाळा नाईक यांनी केली आहे.

पेडणे हा कलाकारांचा तालुका म्हणून ओळखला जातो. येथील अनेक कलाकारांनी राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर नाव कमावले आहे. मात्र त्यांना अद्याप योग्य व्यासपीठ, मानधन आणि सन्मान मिळालेला नाही, अशी खंत नाईक यांनी व्यक्त केली. पेडणे तालुक्यात आजपर्यंत रवींद्र भवनसारखा प्रकल्प साकारलेला नाही. या तालुक्यातून मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, सभापती झाले, पण कलाकारांना हक्काचं व्यासपीठ मिळालं नाही. सरकारकडून त्यांना अपेक्षित सहकार्य मिळत नाही, असे नाईक यांनी म्‍हटले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pooja Naik: "पोलिसांना थोडा वेळ द्या", CM सावंतांकडून 'नवीन FIR'चे आदेश; नोकरी घोटाळा प्रकरणी तपासाची दिशा बदलणार?

Ranji Trophy 2025: दिल्लीला नमवून जम्मू-काश्मीरने रचला इतिहास! ऐतिहासिक विजयाचा 'रन चेस' ठरला खास, 96 वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं

Rohit Sharma Dance Video: 'मेरे यार की शादी है' गाण्यावर रोहित शर्माचा डान्स, वेडिंग फोटोशूटदरम्यानचा व्हिडिओ व्हायरल

Goa Governance: 'गोमंतकीयांच्या समस्या आता AI सोडवणार'! मुख्यमंत्र्यांचे सूतोवाच; 90% तक्रारींचा 2 दिवसांत निवारणाचा दावा

Islamabad Blast: दिल्लीनंतर इस्लामाबाद हादरले! कोर्टाबाहेर जोरदार स्फोट तर वझिरीस्तानमध्ये आत्मघाती हल्ला; 12 ठार, 25 जखमी

SCROLL FOR NEXT