पणजी: राज्यातील पाणी चोरी आणि गळती रोखण्यासाठी ‘फ्लो मीटर्स’ बसवण्यासह पुढील तीन ते चार महिन्यांत २७६ किमी अंतरातील जीर्ण पाईपलाईन बदलण्यात येईल, अशी हमी पाणीपुरवठा मंत्री सुभाष फळदेसाई यांनी गुरुवारी विधानसभा सभागृहात बोलताना दिली. आमदार व्हेंझी व्हिएगस यांनी प्रश्नोत्तराच्या तासाला उपस्थित केलेल्या प्रश्नाला ते उत्तर देत होते.
राज्याला सध्या प्रत्येक दिवशी ६९५ एमएलडी पाण्याची गरज आहे. त्यातील ६३३ एमएलडी पाण्याचा पुरवठा होतो. सद्यस्थितीत प्रत्येक दिवशी ६२ एमएलडी पाण्याची कमतरता भासत आहे. अनेक भागांमध्ये पाण्याची टंचाई आहे. मोठ्या प्रमाणात पाण्याची चोरी होत आहे. अनेक ठिकाणच्या पाईपलाईन ४० वर्षांच्या जुन्या आहेत. त्या बदलण्यात तसेच पाण्याची चोरी रोखण्यात खात्याला अपयश आल्याचा ठपका आमदार व्हिएगस यांनी ठेवला होता.
त्यावर बोलताना मंत्री फळदेसाई म्हणाले, जीर्ण पाईपलाईन तसेच चोरीमुळे पाण्याची नासाडी होत आहे. राज्याला पाणीपुरवठा करण्यासाठी सुमारे ६ हजार किमी अंतरात पाईपलाईन टाकण्यात आलेली आहे. त्यातील दोन हजार किमी अंतरातील पाईपलाईन जीर्ण झालेली आहे.
त्यात बिघाड होऊन पाण्याची नासाडी होत आहे. त्यामुळे पुढील तीन ते चार महिन्यांत या दोन हजार किमीपैकी २७६ किमी अंतरातील पाईपलाईन बदलण्यात येणार आहे. उर्वरित पाईपलाईन बदलण्याचे काम अर्थसंकल्पातील आर्थिक तरतुदींनुसार पुढील तीन वर्षांत टप्प्याटप्प्याने हाती घेण्यात येईल. परंतु, केंद्र सरकारने यासाठी आर्थिक साहाय्य केल्यास पुढील दीड वर्षात सर्वच ठिकाणची जीर्ण पाईपलाईन बदलण्यात येईल.
पाण्याची चोरी, गळती रोखण्यासाठी ८०० फ्लो मीटर्स बसवण्यासंदर्भात काही वर्षांपूर्वी निविदा जारी करण्यात आलेल्या होत्या; पण काही कारणांमुळे ते काम पुढे गेलेले नव्हते. पुढील काळात असे फ्लो मीटर्स बसवून पाण्याची चोरी आणि गळतीवर नियंत्रण ठेवले जाईल, असेही मंत्री फळदेसाई यांनी सांगितले. आमदार वीरेश बोरकर, कार्लुस फेरेरा, क्रूझ सिल्वा यांनीही चर्चेत भाग घेऊन आपापल्या मतदारसंघांतील पाण्याची समस्या सभागृहासमोर आणली.
एका बाजूला जनतेला पाणी मिळत नसताना सरकार मात्र मेगा प्रकल्प तसेच स्विमिंग पूलसाठी आवश्यक तितक्या पाण्याचा पुरवठा करीत आहे. त्याचा फटका जनतेला बसत असल्याचा दावा विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी केलेला होता.
त्यावर प्रकल्पांसाठी अभ्यास करून आणि पाण्याची उपलब्धता लक्षात घेऊन तीन महिन्यांत एक हजार एमएलडी पाणी पुरवले जाते. पाण्याच्या कमतरतेमुळे गेल्या काही वर्षांत सरकारने अनेक लहान प्रकल्पांना पाणी दिलेले नाही. त्यांनी स्वत:हून पाण्याची व्यवस्था केल्याचेही मंत्री फळदेसाई यांनी नमूद केले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.