Ganesh Chaturthi Dainik Gomantak
गोवा

Ganesh Chaturthi: वास्को- डिचोलीत माटोळी बाजार फुलले, सजावट साहित्य खरेदीसाठी गर्दी

फळे, भाजीसह सजावट साहित्याची खरेदी; हजारो रुपयांची उलाढाल

गोमन्तक डिजिटल टीम

Ganesh Chaturthi चतुर्थीनिमित्त डिचोलीत माटोळीचा बाजार फुलला असून, माटोळीसाठी लागणारे साहित्य बाजारात विक्रीस उपलब्ध झाले आहे. यंदा मोठ्या प्रमाणात साहित्याची आवक झालेली आहे.

माटोळीसाठी लागणाऱ्या कांगल्या, घागऱ्या आदी काही रानटी फळांचे बाजारात प्रमाण कमी असल्याचे दिसून येत असले, तरी काही ठराविक वस्तू सोडल्यास माटोळीच्या वस्तूंचे दर त्यामानाने नियंत्रणात आहेत.

डिचोलीसह सत्तरी तसेच सीमेवरील ग्रामीण भागातून माटोळीचे सामान डिचोलीच्या बाजारात उपलब्ध झाले आहे.

पारंपरिक जागेतच बाजार

यंदा बाजारातील पारंपरिक जागेत माटोळीचा बाजार भरला आहे. बँक ऑफ इंडियासमोर, गणपती पूजन मंडप परिसर तसेच बाजार संकुल परिसर या पारंपरिक जागेतच माटोळीचा बाजार भरला आहे.

आजपासून (रविवारी) गणेशभक्तांकडून माटोळीच्या सामानाची खरेदी सुरू झाली आहे. सायंकाळी झालेली वर्दळ सोडल्यास दिवसभर संथगतीने माटोळीच्या सामानाची तरी उद्यापासून खरेदीला जोर येणार आहे.

काही फळे-फुले महागली

गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा माटोळीला लागणारी काही फळे-फुले किंचित महाग झाली आहेत. माटोळीच्या बाजारात केळीचे घड प्रत्येकी २०० ते ५०० रुपये नग, सुपारीची शिपडी ५०० ते ८०० रुपये, तर कातरे आकाराप्रमाणे १०० ते ३०० रुपये एक, असोला नारळ ५० रुपये नग, नारळाची पेंड ४०० ते ७०० रुपये कांगल्या, आणये, माट्टूला, घागऱ्या ४० ते ५० रुपये घोस या दराने विकण्यात येत आहेत. श्वेतपर्ण, वाघनखे, हरण आदी रानटी पानेफुलेही महाग झाली आहेत.

तर वास्को येथील चतुर्थी बाजारालाही रविवारपासून सुरुवात झाली. चतुर्थीसाठी लागणाऱ्या माटोळी साहित्याने ही बाजारपेठ गजबजली होती. मात्र सकाळच्या सत्रात प्रतिसाद लाभला रविवार व सोमवार असे दोन दिवस चतुर्थी बाजाराची ही फेरी भरणार आहे.

शनिवारी संध्याकाळी चतुर्थीसाठी लागणारे बागायती सामान घेऊन विविध भागातून छोटे मोठे विक्रेते वास्को बाजारात दाखल झाले. माटोळीसाठी लागणारी बागायती फळे तसेच रानफळे, विविध प्रकारच्या भाज्या व अन्य साहित्याने बाजार गजबजून गेला. चतुर्थीच्या खरेदीसाठी ग्राहकांची आज रविवारी संध्याकाळी गर्दी होती.

लाडक्या गणपती बाप्पाच्या सजावटीच्या अनेक वस्तू बाजारात आल्या असून या खरेदीसाठी आज रविवारी संध्याकाळी नागरिकांची झुंबड सुरू असलेली पाहायला मिळाली. गणेश चतुर्थीला एकच दिवस शिल्लक राहिला असल्याने इतर ठिकाणी असलेले चाकरमानी गणेशोत्सवाला आपल्या मूळ घरी यायला सुरुवात केली आहे.

काहींनी शनिवारीच आपले घर गाठले. यातच घराची साफसफाई, रंगरंगोटी आता पूर्णत्वास आली आहे. तर गणपतीच्या डेकोरेशनसाठी युवकांची धावपळ वाढली आहे.

वास्कोमधील बाजारात ग्रामीण भागातून अनेक महिला, पुरुष व्यापारी विविध साहित्य घेऊन येत असतात. यात नारळ, गावठी भाजी, सुपल्या, सुपे, माटोळीला लागणारे साहित्याचे दर वाढले आहेत. मंडपाला बांधण्यासाठी लागणारी कवंडाळे, फुलोरा, हरणे या वस्तू खरेदीसाठी सुद्धा नागरिकांचा अधिक कल दिसत आहे.

गृहोपयोगी वस्तू महागल्या

वास्को बाजारपेठ इलेक्ट्रॉनिक वस्तू, पडदे, कार्पेट, गणेशोत्सवासाठी लागणारी आरास या साहित्याने सजून गेली आहे. यातच महागाईची झळ सुद्धा नागरिकांना बसत असून गृहोपयोगी वस्तू महागल्या आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Opinion: ‘घर नाही, पैसा नाही तरीही त्या दोघींच्या चेहऱ्यावर स्मितहास्य माणुसकी शिकवणारं’

IFFI 2024: इफ्फीमध्ये 'एंटरटेनमेंट, सबका हक'! तिकीट न घेता Picture Time; सिनेमागृहाची आगळीवेगळी संकल्पना जाणून घ्या

Goa Live News Today: माजी सरपंच प्रशांत नाईकांकडून प्राथमिक शाळेला लाकडी बाक प्रदान

Cash For Job Scam: अमेरिकेत नोकरी देण्याचे आमिष दाखवून लाखोंना गंडा; मडगावात दोन भामट्यांविरोधात तक्रार दाखल!

Goa CM Meet Fadanvis: मुख्यमंत्री सावंतांनी गळाभेट घेऊन फडणवीसांना दिल्या विजयाच्या शुभेच्छा

SCROLL FOR NEXT