Health campaign In Goa Dainik Gomantak
गोवा

Goa Updates: 'आहारावर नियंत्रण ठेवून आरोग्य सांभाळा'

‘गोमन्तक’तर्फे आरोग्य शिबिर: सीआयएसएफ जवानांना तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला

दैनिक गोमन्तक

वास्को: आहार-विहार, आचार-विचार यावर नियंत्रण ठेवले, तर आयुष्यात आरोग्यविषयक तक्रारी उद्भवणार नाहीत. तसेच आपल्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी वर्षातून निदान दोनदा आरोग्य तपासणी करून घेणे अत्यंत गरजेचे आहे, असा निर्वाणीचा सल्ला पुणे येथील ह्रदयरोग तज्ज्ञ डॉ. ऋतुपर्ण शिंदे तसेच आहार तज्ज्ञ डॉ. मनिषा बंदिष्टी यांनी दिला.

दै. ‘गोमन्तक’तर्फे केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या (सीआयएसएफ) जवानांसाठी आयोजित ‘आरोग्य जागृती आणि काळजी’ या विषयावर आरोग्य शिबिराचे आयोजन ‘गोवा शिपयार्ड’मध्ये गुरुवारी करण्यात आले.

यावेळी डॉ. शिंदे व डॉ. बंदिष्टी यांनी केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या जवानांना आपल्या आरोग्याचे रक्षण करण्यासाठी कोणत्या प्रकारची काळजी घ्यावी या विषयावर व्याख्यान दिले. यावेळी ह्रदयरोग तज्ज्ञ डॉ. ऋतुपर्ण शिंदे यांनी हृदयरोगावर महत्त्वाचा सल्ला देताना ह्रदयरोग का जडतो व ते कशामुळे होतो याची महत्त्वपूर्ण माहिती दिली.

पूर्वी ह्रदयविकार हा वयस्क माणसांना होत होता अशी समजूत होती, पण आता फार कमी वयाच्या माणसांनाही तो जडतो. याचे मुख्य कारण म्हणजे आपल्या आहारात झालेले बदल. व्यायामाची कमतरता, मनावर ताण घेणे तसेच बदललेल्या जीवनशैलीमुळे हृदयविकाराच्या रोगाला आमंत्रण मिळत असल्याचे ते म्हणाले. त्यासाठी चरबीयुक्त आहाराचे सेवन करणे सिगारेट ओढणे यावर नियंत्रण ठेवणे अत्यंत गरजेचे असल्याचे डॉ. शिंदे यांनी सांगितले. तसेच यावर नियंत्रण ठेवण्यासाठी नियमित व्यायाम करणे तितकेच गरजेचे असल्याचे ते म्हणाले. यावेळी त्यांनी जवानांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर दिले.

याप्रसंगी आहार तज्ज्ञ डॉ. मनिषा बंदिष्टी यांनी आपल्या आरोग्यावर होणाऱ्या दुष्परिणामांविषयी माहिती देताना यातून आपण कसे वाचू शकतो, कोणता आहार घेतल्याने आरोग्य सुरक्षित राहू शकते व कोणते आहार आरोग्यासाठी घातक ठरू शकतात याची माहिती दिली. आपली दिनचर्या व्यवस्थित ठेवली, तर सगळे व्यवस्थित चालते. त्यासाठी आरोग्य तपासणी करून घेणे गरजेचे आहे. आरोग्याकडे दुर्लक्ष केल्यास ते कितपत घातक ठरू शकते हे आपणास कळणारसुद्धा नसल्याचे त्या म्हणाल्या. आरोग्याच्या तक्रारी सहज न घेता त्यावर मात करण्यासाठी ताण-तणाव, सिगारेट, मद्यप्राशन यापासून दूर राहण्याचा सल्ला यावेळी डॉ. बंदिष्टी यांनी दिला.

आरोग्य जागृती कार्यक्रमाची सुरवात हृदयरोग तज्ज्ञ डॉ. ऋतुपर्ण शिंदे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आली. यावेळी व्यासपीठावर आहार तज्ज्ञ डॉ. मनिषा बंदिष्टी, दै. ‘गोमन्तक’चे संपादक-संचालक राजू नायक, केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाचे कमांडर प्रताप पुंडेजी तसेच सकाळ समूहाचे मुख्य कार्यपालन अधिकारी महेंद्र पिसाळ, गोवा शिपयार्डच्या सुरक्षा विभागाचे विभागीय महाव्यवस्थापक रुपेश कुमठेकर, बहाद्दुरजी व मुकेश सुभेदार उपस्थित होते. या आरोग्य जागृती शिबिराचा सुमारे 200 जवानांनी लाभ घेतला. दै. ‘गोमन्तक’चे संपादक-संचालक राजू नायक यांना प्रास्ताविक करून उपस्थित मान्यवर व जवानांचे स्वागत केले, तर बहाद्दुरजी यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले.

‘व्यायाम हेच आरोग्याचे औषध’

आपले आरोग्य व्यवस्थित ठेवण्यासाठी व्यायाम हेच आरोग्याचे औषध आहे. व्यायामामुळेच आपण ‘चलेंगे तो दूर तक चलेंगे'' हेच ब्रीदवाक्य मनात ठेवून त्याप्रमाणे वाटचाल केल्यास आपले उर्वरित आयुष्य कोणत्याही आरोग्यविषयक कटकटीशिवाय जगू शकता. मधुमेहासारखा रोगही हृदयविकारासाठी घातक ठरू शकतो. त्यासाठी खाण्याअगोदर आपणास किती खायचे आहे याचा विचार करणे तितकेच गरजेचे आहे. दुसऱ्याची काळजी घेताना आपलीही काळजी घेणे गरजेचे असून वेळेवर आरोग्य तपासणी करून आपल्या आरोग्याची काळजी घ्या, असा निर्वाणीचा सल्ला ह्रदयरोग तज्ज्ञ डॉ. ऋतुपर्ण शिंदे यांनी शेवटी दिला.

‘आहार बदल आयुष्यात मोठा बदल’

आजच्या घडीला योग्य आहाराबरोबर वेगवेगळ्या योग प्रकारांवर प्रकाश टाकून त्यातून मिळणारे फायदे व त्याचे प्रत्यक्षात अनुकरण केले, तर आपल्याला आरोग्याच्या तक्रारी उद्भवत नाहीत. आहारावर नियंत्रण ठेवण्यासाठी खाण्यापूर्वी आपण काय खाणार यावर नियंत्रण ठेवा व जितके जमेल तितके खा, अतिसेवन टाळा असा सल्ला आहार तज्ज्ञ

डॉ. मनीषा बंदिष्टी यांनी देताना ‘आहार बदल आयुष्यात मोठा बदल घडवू शकतात’ हे ब्रीदवाक्य नजरेसमोर ठेवून सुखी जीवन जगण्यासाठी आरोग्याची काळजी घ्या, असा निर्वाणीचा सल्लाही दिला.

‘तज्ज्ञांच्या सल्ल्याचे पालन करावे’

केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाचे कमांडर प्रताप पुंडे यांनी दै. ‘गोमन्तक’तर्फे सुरक्षा दलाच्या जवानांना आरोग्य जागृती शिबिराचे आयोजन केल्याबद्दल आभार व्यक्त केले. या शिबिराचा जवानांना तसेच त्यांच्या कुटुंबांना आरोग्याच्या दृष्टीने भरपूर फायदा होणार आहे. या शिबिरात आरोग्य सुदृढ ठेवण्यासाठी तज्ज्ञ डॉक्टरांनी अनेेक उपाय व अाहार-विहाराचे सल्ले दिले असून डॉक्टरांनी दिलेल्या सल्ल्यांचे पालन करून जवान आपले व आपल्या कुटुंबाच्या आरोग्याचे रक्षण करतील असे त्यांनी आपल्या भाषणात सांगितले. यावेळी त्यांनी पुणे येथील ह्रदयरोग तज्ज्ञ डॉ. ऋतुपर्ण शिंदे तसेच आहार तज्ज्ञ डॉ. मनिषा बंदिष्टी यांचे आभार मानले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live Updates: गोव्यानं नोंदवला सलग चौथा विजय; मोहितच्या गोलंदाजीसमोर मिझोरामचा संघ ढेर!

Rajbagh Beach: राजबाग किनाऱ्याने घेतला 'मोकळा श्वास'! पर्यटन खात्याकडून सात बेकायदेशीर बांधकामे उद्ध्वस्त

Goa Onion Rates: कांद्याने आणले डोळ्यात पाणी! नासाडीमुळे दोन दिवसात दरांमध्ये तब्बल २० रुपयांनी वाढ, जाणून घ्या सध्याचा भाव

Margao News: स्वच्छतेसंदर्भात मडगाव पालिकेचा महत्त्वाचा निर्णय; या कारणासाठी नागरिक, पर्यटकांकडून वसूल केला जाईल दंड

Cash For Job Scam: प्रिया यादवचा आणखी एक कारनामा उघड; डिचोलीतील चार बहिणींना घातला 80 लाखांना गंडा

SCROLL FOR NEXT