गोव्यात येणारे पर्यटक एकेकदा असे वागतात की, कुणाचा पायपाेस कुणाच्या पायात नाही, असे वाटावे. विशेषत: हनिमुनसाठी येणारे ‘कपल्स’ असे प्रकार अधिक करतात. याच प्रकारात मोडणारा एक व्हिडिओ सध्या ‘व्हायरल’ होत आहे आणि तोही चक्क मडगावचा. मडगावहून पणजीच्या दिशेने ‘रेंट अ बाईक’वरुन जाताना एका बाईकवर एक महिला पर्यटक चक्क उलटी बसलेली दिसत असून यासंबंधीचा हा व्हिडिओ सध्या सगळीकडे व्हायरल झालेला आहे. पर्यटकांनी कुठेही जावे पण तिथे असलेल्या स्थानिक नियमांना मान द्यावा, असे असते. पण पर्यटकांनी ताळतंत्र सोडलाच तर दोष कुणाला द्यायचा? ∙∙∙
एरवी अजगर हे झाडीत किंवा रानात सापडतात. मात्र दोन दिवसांपूर्वी एक अजगर बाणावली भागात चक्क समुद्राच्या पाण्यात विसावा घेताना आढळून आला. समुद्राच्या खारट पाण्यात कधी अजगर आत शिरलेला कुणी बघितला नाही. त्यामुळे सेलेब्रिटी मच्छिमार पेले फर्नांडिस यांनाही त्याचे आश्चर्य वाटले असावे. समुद्राच्या पाण्यात वेटोळे घालून बसलेल्या या अजगराचा एक व्हिडिओ पेेले यांनी व्हायरल केला असून यावर तुम्ही विश्वास ठेवा किंवा ठेवू नका, पण अजगरही समुद्रातील खाऱ्या पाण्यात दिसू लागले आहेत, असे त्यांनी म्हटले आहे. जमिनीवरील उष्मा वाढला म्हणून अजगरही आता पाण्यात जाऊ लागले तर नाहीत ना? ∙∙∙
सुरुवातीला मांद्रे पोलिसांकडूनच अशी माहिती बाहेर आली की रशियन महिलांचा खून केलेल्या संशयिताने अजून काही खून केले आहेत. ही माहिती ‘अप्रत्यक्ष’ होती म्हणतात, पण अप्रत्यक्ष असो की, थेट पोलिसांशिवाय ती बाहेर आलीच नसती, हे सगळ्यांनाच ठाऊक आहे. आता मात्र पोलिसांचा सूर बदललाय. अधिकृत माहितीशिवाय काही पसरवू नका, असा आदेश निघालाय. म्हणजे थोडक्यात काय, आधी सूत्रांतून जी माहिती फिरवली, तीच माहिती आता पोलिसांना अंगलट येतेय. आता पोलिस भानावर आलेले दिसतात. आधी मोठी चित्रं रंगवली गेली, आता म्हणे ‘फक्त दोनच खून’ म्हणजे आधीची चर्चा स्वतःच खोडून काढण्याची तयारी सुरू आहे. एकूण काय, आधी पोलिसांनीच चर्चा सोडली आणि आता ती आवरायला पोलिसच धावपळ करतायत. तपास चालू आहे, पण चर्चेचे काय? ∙∙∙
चिंबलमधील प्रस्तावित युनिटी मॉलविरोधात स्थानिकांनी छेडलेले साखळी आंदोलन अजूनही कायम आहे. हा प्रकल्प मागे घेतल्याशिवाय गप्प बसणार नाही, असा इशारा त्यांनी दिल्याने आणि सरकारने याबाबत लवकरात लवकर निर्णय न घेतल्यास आंदोलन आणखी तीव्र करण्याची धमकी रिव्हॉल्यूशनरी गोवन्स पक्षाने (आरजीपी) दिल्यामुळे सरकार याबाबत नेमका काय निर्णय घेणार? याकडे गोमंतकीयांचे लक्ष आहे. आता मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत याबाबत २१ जानेवारी रोजी आंदोलकांशी चर्चा करणार आहेत. त्यामुळे स्थानिक जनता आणि विरोधकांच्या दबावाला बळी पडून ते मागे हटणार? की २०१७ मध्ये टॅक्सी मालकांनी केलेल्या आंदोलन काळात जी भूमिका घेतली होती, त्याच पद्धतीची भूमिका घेणार? हे पाहण्यासाठी जनता आतूर आहे. ∙∙∙
सोमवारी आल्तिन्हो येथे सरकारी अधिकार आणि कर्मचाऱ्यांची एक बैठक सरकारी कार्यालयात पार पडली. बैठक म्हणजे फाईल्स, फाईल्स म्हणजे चर्चा, आणि चर्चा म्हणजे चहा असा अलिखित सरकारी नियम आहे. पण यावेळी नियमच मोडला गेला म्हणे! चहा-पाण्याची सोय कुठेच दिसली नाही. चहा दिला की नाही, यावर अजूनही फाईल उघडलेलीच आहे. बैठक संपताच काही कर्मचारी थेट हॉटेलकडे वळले, म्हणून या चर्चेला उधाण आले आहे. एकूण काय, बैठकीपेक्षा चहा नसण्याचीच बाब जास्त चर्चेत आली. सरकारी कामकाज चालू आहे, पण कॅन्टीनची घंटा मात्र वाजली नाही... इतकंच! ∙∙∙
चांगल्या व सेवाभावी बुजुर्गांच्या आशीर्वादात ताकत असते व असे आशीर्वाद सार्थकी लागतात, असे म्हणतात. युरी आलेमाव येत्या विधानसभेच्या निवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवारीवर निवडून येवो व मुख्यमंत्री बनोत, असा जाहीर आशीर्वाद कुंकळ्ळीतील एक ज्येष्ठ व रुग्णसेवी धन्वंतरी डॉ. प्रकाश कुऱ्हाडे यांनी युरी यांना एका कार्यक्रमाच्या व्यासपीठावरून दिला. युरी यांच्या वडिलांना ज्योकिम यांना ही याच डॉक्टरांनी काही वर्षांपूर्वी मंत्री होवो, असा आशीर्वाद दिला होता व तो खरा ठरला होता. आता वीस वर्षानंतर त्याच जागेवरून त्याच डॉक्टरांनी युरी यांना मुख्यमंत्री होवोत, असा आशीर्वाद दिल्याने डॉ. कुऱ्हाडे यांचा जाहीर आशीर्वाद आता चर्चेचा विषय बनलाय. आता पाहूया हा कठीण आशीर्वाद खरा ठरतो का? ∙∙∙
मडगावात गेल्या काही वर्षात सौंदर्यीकरणाच्या नावाने काही कोटी खर्च केले गेले. त्यातील काही कामे अजूनही चालू आहेत खरी. ती कधी पूर्ण होतील त्याची प्रतिक्षा माडगावकर करताना दिसतात. त्यातील अनेक कामे दर्जेदार नसल्याचे आरोप सावियो कुतिन्हो वरचेवर करताना दिसतात. पण मुद्दा तो नाही तर एकीकडे हे सौंदर्यीकरण चालू असतानाच मडगावांतून जाणाऱ्या पूर्व बगल रस्त्यावर घोळ ते मारुती मंदिर दरम्यान टाकल्या जाणाऱ्या कचऱ्यामुळे त्या परिसराला जो ओंगळपणा आलेला आहे, त्याकडे संबंधित नेते व यंत्रणा का लक्ष देत नाहीत, असे प्रश्न आता केले जाऊ. लागले आहेत. मडगावच्या बाबांकडे ‘साबांखा’ खाते असल्याने. हा मुद्दा जास्त करून उपस्थित केला जात आहे. हे प्रकार असेच चालू राहिल्यास हे सौंदर्यीकरण काय कामाचे हे मात्र खरे. ∙∙∙
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.