पणजी: गोव्याच्या पर्यटन क्षेत्राला २०२५ च्या पहिल्या सहामाहीत अभूतपूर्व यश लाभले असून, जानेवारी ते जून या सहा महिन्यांच्या कालावधीत राज्यात ५४.५५ लाखांहून अधिक पर्यटकांनी भेट दिली आहे. अत्यंत कडक उन्हाळा असूनही गोव्याच्या पर्यटन आकडेवारीने विक्रमी भरारी घेतली आहे.
पर्यटन संचालनालयाच्या प्राथमिक आकडेवारीनुसार, ५१.८४ लाख देशांतर्गत, तर २.७१ लाख आंतरराष्ट्रीय पर्यटक या कालावधीत गोव्यात आले. जानेवारी महिना सर्वाधिक गर्दीचा ठरला, ज्यात १०.५६ लाख पर्यटक आले.
त्यापाठोपाठ मे (९.२७ लाख) आणि फेब्रुवारी (९.०५ लाख) महिन्यांनी महत्त्वाची नोंद केली. जून महिन्यातही ८.३४ लाख पर्यटक गोव्यात आले, जे उन्हाळ्याच्या शेवटच्या टप्प्यावरही पर्यटनाचे स्थैर्य दर्शवते. मान्सून पर्यटन, हेरिटेज वॉक, वेलनेस रिट्रिट्स आणि इनलॅण्ड ट्रेल्स यांसारख्या नवनवीन अनुभवांसह गोवा आता केवळ किनाऱ्यांचे नव्हे, तर सर्वांगीण पर्यटनाचे केंद्र म्हणून ओळखले जाऊ लागले आहे.
पर्यटन संचालक केदार नाईक म्हणाले, ‘गोव्यातील पर्यटकवाढ ही आमच्या बहुआयामी धोरणात्मक दृष्टिकोनाचे फलित आहे. देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठांमध्ये सुरू केलेल्या प्रचार मोहिमा, ‘पुनरुत्पादित पर्यटन’ या छत्राखाली राबवलेले नाविन्यपूर्ण उपक्रम, व्यापार प्रदर्शनांमधील उपस्थिती आणि वारसा व नैसर्गिक पर्यटनाचा समावेश यांमुळे गोव्याची प्रतिमा विविध अनुभवांचे ठिकाण म्हणून बळकट झाली आहे.
१यंदा युरोप, मध्य पूर्व आणि आग्नेय आशियामधून विदेशी पर्यटकांची वाढ लक्षणीय राहिली. याचे श्रेय उत्कृष्ट विमानसेवा जोडणी, सुरळीत प्रवास अनुभव आणि दर्जेदार सेवा व्यवस्थेला दिले जात आहे.
२ राज्य सरकारने पायाभूत सुविधांमध्ये केलेल्या सुधारणांमुळे वाढती पर्यटक संख्या नियंत्रित आणि समाधानकारक रीतीने हाताळणे शक्य झाले आहे.
३नव्या हॉटेल सुविधा, सुधारित वाहतूक व्यवस्थापन, स्थानिक संस्कृतीचा समावेश असलेले महोत्सव व क्रीडा स्पर्धा यांमुळेही विविध वर्गातील पर्यटक गोव्याकडे आकर्षित झाले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.