
Fake IAS Saurabh Tripathi Arrested: आधुनिक तंत्रज्ञान आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून होणाऱ्या फसवणुकीचे प्रकार दिवसेंदिवस अधिक गुंतागुंतीचे होत असताना, एका धक्कादायक घटनेने संपूर्ण देशाचे लक्ष वेधले आहे. सौरभ त्रिपाठी नावाच्या एका व्यक्तीने तब्बल चार वर्षांपासून स्वतःला बनावट आयएएस (IAS) अधिकारी भासवून अनेक राज्यांमध्ये आपले जाळे विणले होते.
बिहारपासून सुरु झालेला त्याचा हा फसवणुकीचा खेळ दिल्ली, गोवा आणि उत्तर प्रदेशपर्यंत पसरला होता. मोठ्या राजकीय नेत्यांपासून ते प्रशासकीय अधिकाऱ्यांपर्यंत सर्वांशी ओळख वाढवून त्याने एक बनावट ‘अधिकारी’ म्हणून स्वतःची ओळख निर्माण केली. मात्र एका व्यापाऱ्याच्या सतर्कतेमुळे त्याचा पर्दाफाश झाला आणि तो पोलिसांच्या जाळ्यात अडकला.
'दैनिक भास्कर'ने दिलेल्या वृत्तानुसार, सौरभ त्रिपाठी हा मूळचा मऊ, उत्तर प्रदेश येथील रहिवासी आहे. त्याचे गाव बिहारच्या सीमेला लागून असल्याने त्याने आपल्या फसवणुकीची सुरुवात बिहारमधूनच केली. बिहारमध्ये मोठ्या संख्येने आयएएस अधिकारी तयार होतात, या गोष्टीचा फायदा घेत त्याने सुरुवातीला बिहारमध्ये तैनात असलेल्या अर्धा डझनहून अधिक आयएएस अधिकाऱ्यांशी जवळीक साधली. त्यांची ओळख करुन तो सरकारी बैठका आणि कार्यक्रमांमध्ये सहभागी होऊ लागला. हळूहळू त्याने बिहारच्या प्रशासकीय वर्तुळात आपले स्थान निर्माण केले आणि याच आधारावर त्याने दिल्लीपर्यंत आपले नेटवर्क विस्तारले.
सौरभ त्रिपाठीने आपली बनावट ओळख खरी वाटावी यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले. त्याचा संपूर्ण दिनक्रम एखाद्या वरिष्ठ अधिकाऱ्यासारखाच होता. त्याचा रुबाबदारपणा पाहून कोणीही सहज फसू शकेल असा तो वावरत असे. तो प्रवासासाठी बंदूकधारी अंगरक्षक आणि निळ्या दिव्यांच्या गाड्यांचा ताफा वापरत असे. यामुळे लोकांवर त्याचा मोठा प्रभाव पडत असे आणि लोक त्याला खरोखरच एक वरिष्ठ अधिकारी समजत असत. तो लखनऊमधील शालीमार वन वर्ल्ड अपार्टमेंटमध्ये दरमहा 60 हजार रुपये भाड्याच्या आलिशान फ्लॅटमध्ये राहत होता. त्याची पत्नी बी.टेक असून एका मोठ्या कंपनीत नोकरी करते. दोन मुलांसह हे कुटुंब याच फ्लॅटमध्ये राहत होते.
उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) अनेक जिल्ह्यांमध्ये सरकारी कार्यक्रमांमध्ये तो प्रमुख पाहुणा म्हणून सहभागी झाला होता. व्यासपीठावर तो एका आयएएस अधिकाऱ्याप्रमाणे बसत, भाषण देत आणि आयोजकांना सांगायचा की, तो दिल्लीत कार्यरत असून लवकरच उत्तर प्रदेश केडरमध्ये परतणार आहे.
केवळ एवढ्यावरच न थांबता, त्याने गोवा आणि उत्तराखंडसारख्या राज्यांच्या मुख्यमंत्री आणि राज्यपालांसारख्या उच्चपदस्थ व्यक्तींसोबतही फोटो काढले. हे फोटो तो सोशल मीडियावर पोस्ट करत असे, ज्यामुळे त्याच्या बनावट ओळखीला आणखी बळकटी मिळत होती. याशिवाय, उत्तराखंडमधील बेतालघाट येथे भारत सरकारचा कॅबिनेट सचिव म्हणून तो एका सरकारी कार्यक्रमातही सहभागी झाला होता. अशा प्रकारे, त्याने बिहार, दिल्ली, गोवा आणि उत्तर प्रदेशमध्ये आपले फसवणुकीचे जाळे विणले.
सौरभने फसवणुकीसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचाही वापर केला. त्याने NIC आणि GOV डोमेन वापरुन बनावट ईमेल आयडी तयार केले. हे दोन्ही डोमेन सरकारी कामकाजासाठी वापरले जातात. याच ईमेल आयडीमधून तो विविध मंत्रालये आणि विभागांशी पत्रव्यवहार करत असे. त्याने स्वतःला कॅबिनेट स्पेशल सेक्रेटरी म्हणून दर्शवले होते. आपल्यासाठी एक खास पीए (PS - Personal Secretary) असल्याची बतावणी करत, त्याने त्याच्या नावानेही एक बनावट ईमेल आयडी तयार केला होता.
सोशल मीडियावरही (Social Media) त्याने आपली मजबूत ओळख निर्माण केली होती. सुमारे चार महिन्यांपूर्वी त्याने लिंक्डइनवर प्रोफाइल तयार केली. येथे त्याने स्वतःला 'भारत सरकारचा कॅबिनेट स्पेशल सेक्रेटरी' म्हणून दर्शवले. त्याने प्रभावशाली लोकांशी काढलेले फोटो पोस्ट करुन आपले नेटवर्क मजबूत केले. ऑक्टोबर 2023 मध्ये त्याने X (ट्विटर) वरही अकाउंट तयार करुन 'आयएएस' असल्याचा प्रचार सुरु केला. फेसबुकवरही तो वेगवेगळ्या नावांनी प्रोफाइल तयार करुन ‘आयएएस’चा टॅग वापरत होता.
सौरभ त्रिपाठी एका स्वयंसेवी संस्थेशी (NGO) जोडलेला होता. याच संस्थेच्या माध्यमातून तो वेगवेगळ्या राज्यांमध्ये होणाऱ्या बैठका आणि सरकारी कार्यक्रमांमध्ये प्रवेश मिळवत असे. या बैठकांमध्ये त्याने अनेक वरिष्ठ आयएएस अधिकारी आणि राजकारण्यांसोबत फोटो काढले आणि याच फोटोंचा वापर करुन तो लोकांची दिशाभूल करत होता.
इतके मोठे आणि पद्धतशीरपणे चालणारे हे फसवणुकीचे जाळे एका छोट्या संशयावरुन उघड झाले. सुमारे आठ दिवसांपूर्वी, लखनऊमधील एका व्यापाऱ्याने सोशल मीडियाच्या माध्यमातून सौरभ त्रिपाठीशी संपर्क साधला. बोलता-बोलता सौरभने त्याला सरकारी कामात मदत करण्याचे आश्वासन दिले. व्यापाऱ्याला त्याच्या बोलण्यावर संशय आला. त्याने ताबडतोब आपल्या एका वरिष्ठ आयएएस अधिकारी मित्राला सौरभ त्रिपाठीबद्दल माहिती दिली.
या गंभीर माहितीनंतर स्थानिक गुप्तचर युनिट (LIU) आणि पोलिसांनी तातडीने तपास सुरु केला. वजीरगंज पोलीस ठाण्याचे प्रभारी निरीक्षक राजेश त्रिपाठी यांनी तातडीने कारवाई करत सौरभला अटक केली. त्याच्या बॅगेची तपासणी केली असता, त्यात 25 पेक्षा जास्त बनावट कागदपत्रे सापडली. त्यात बनावट शासकीय ओळखपत्रे, मंत्रालयांची पत्रे आणि अनेक बनावट परवाने होते. या पुराव्याच्या आधारावर राजेश त्रिपाठी यांनी स्वतः वादी होऊन त्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला.
पोलीस आणि गुन्हे शाखेने संयुक्तपणे सौरभच्या पार्श्वभूमीची चौकशी केली. केंद्रीय मंत्रालये आणि कॅबिनेट सेक्रेटरी कार्यालयाशी संपर्क साधल्यानंतर हे स्पष्ट झाले की, सौरभ त्रिपाठी नावाचा कोणताही अधिकारी तिथे कार्यरत नाही.
सौरभ त्रिपाठीवर भारतीय दंड संहितेच्या (IPC) अनेक गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यात फसवणूक (Fraud), बनावटगिरी (Forgery) आणि सरकारी पदाचा गैरवापर (Misuse of Official Position) यांसारख्या आरोपांचा समावेश आहे. पोलिसांनी केलेल्या प्राथमिक तपासणीत त्याच्या ईमेल आयडी आणि गाड्यांवर लावलेले पासही बनावट असल्याचे समोर आले आहे. यामुळे पोलिसांना खात्री झाली की, त्याचे संपूर्ण नेटवर्क हे ठगी आणि फसवणुकीवर आधारित होते.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत अर्धा डझनहून अधिक लोकांनी पोलिसांना सांगितले की, सौरभने आयएएस अधिकारी असल्याचे भासवून त्यांच्याशी संपर्क साधला होता. त्याने या व्यापाऱ्यांना सरकारी काम मिळवून देण्याचे आश्वासन दिले होते. आता पोलिसांनी त्याच्याकडून किती रुपयांची फसवणूक झाली, याचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे. डीसीपी क्राइम कमलेश त्रिपाठी यांनी सांगितले की, सौरभच्या अटकेनंतर त्याची संपूर्ण माहिती गोळा केली जात आहे. त्याची बनावट ईमेल आयडी आणि सोशल मीडिया अकाउंट्सची तपासणी करण्यासाठी सायबर सेलची मदत घेतली जात आहे. त्याच्या बँक खात्यांचे व्यवहार आणि मालमत्तेची माहितीही तपासली जात आहे. त्याने इतर राज्यांमध्येही व्हीआयपी प्रोटोकॉलचा गैरवापर केल्याचा संशय पोलिसांना आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.