साखळी: साखळीत लवकरच आयुर्वेदिक आणि नॅचरोपॅथी उपचारांसाठी ५० खाटांचे इस्पितळ उभारण्यात येणार आहे. हरवळे येथील मातोश्री पद्मिनी शैक्षणिक संस्थेच्या फिजिओथेरपी व नॅचरोपॅथी महाविद्यालयात सुरू करण्यात आलेल्या ‘ओपीडी’मुळे गोव्यात प्रथमच या उपचारपद्धतींच्या विविध सुविधा उपलब्ध होणार आहेत.
या ‘ओपीडी’तून मिळणारे प्रशिक्षण आणि अनुभव यांच्या आधारे भविष्यात इस्पितळ सुरू करण्याचे नियोजन असल्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले. नॅचरोपॅथी दिनानिमित्त मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ‘ओपीडी’चे उद्घाटन करण्यात आले. यावेळी साई नर्सिंग इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष पांडुरंग कुट्टीकर, मातोश्री पद्मिनी शैक्षणिक संस्थेच्या अध्यक्षा सुलक्षणा सावंत, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. स्नेहा भागवत आदी उपस्थित होते.
या ओपीडी व डे केअर सेंटरमध्ये नॅचरोपॅथी, योग, फिजिओथेरपी, आयुर्वेद, फर्टिलिटी उपचार, गर्भसंस्कार, नेफ्रोलॉजी, अस्थिरोग, समुपदेशन, निदान सेवा, पॅथॉलॉजी आणि एक्स-रे सुविधा उपलब्ध असतील. गरजेनुसार मार्गदर्शन आणि उपचारही केले जाणार आहेत. फर्टिलिटी उपचारांद्वारे संततीप्राप्तीसाठी इच्छुकांना मार्गदर्शन करण्याची सुविधाही येथे असेल.
तज्ज्ञ मनुष्यबळ तयार होणार
गोव्यात नॅचरोपॅथी महाविद्यालय सुरू करण्याचे स्वप्न आता साकार झाले आहे. भारतीय उपचारपद्धतींशी संबंधित आयुर्वेद, अॅलोपॅथी, होमिओपॅथी, नेचरोपॅथी आणि योगिक सायन्स या अभ्यासक्रमांच्या माध्यमातून राज्यात तज्ज्ञ मनुष्यबळ तयार होईल. गोव्याबाहेरील महाविद्यालयांत प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना तीन ते चार महिने प्रतीक्षा करावी लागते. त्यांना आता राज्यातच शिक्षणाची संधी उपलब्ध झाली आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.