Goa Taxi Operators : वाहतूक विभागाने आमच्या टॅक्सींचे फिटनेस प्रमाणपत्रासह पासिंग तातडीने करावे, अशी मागणी गोव्यातील टॅक्सीचालकांनी केली. डिजिटल मीटरचे वार्षिक शुल्क भरण्याची तयारी टॅक्सीचालकांनी दाखवली असून मीटर कार्यान्वित करण्याची विभागीय प्रक्रिया सुरू झाल्याचे त्यांनी सांगितले.
विविध टॅक्सी संघटनांच्या अनेक टॅक्सीचालकांनी जुन्ता हाऊस पणजी येथील वाहतूक विभागाच्या कार्यालयात टॅक्सी डिजिटल मीटरची स्थिती काय आहे आणि त्यांच्या टॅक्सींचे पासिंग त्वरित केले जाईल का, अशी विचारणा करण्यासाठी थेट पणजी कार्यालयात धडक दिली.
त्यानंतर पत्रकारांशी बोलताना टॅक्सीचालकांच्या एका प्रतिनिधीने सांगितले की, डिजिटल टॅक्सी मीटरचे व्यवस्थापन करण्यासाठी वाहतूक विभागाकडे नियंत्रण कक्ष किंवा पायलट रूम नाही. या मीटरवर दिलेले पॅनिक बटण काम करत नाही.
आम्हाला आज एका अधिकाऱ्याने सांगितले की हे डिजिटल मीटर कार्यान्वित करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यामुळे आता आमच्या टॅक्सींचे फिटनेस प्रमाणपत्रासह पासिंग विभागाने तातडीने करावे, अशी आमची मागणी आहे. टॅक्सीचालकांनी डिजिटल मीटरच्या देखभालीचे वार्षिक शुल्क नंतर भरण्याची तयारीही दर्शवली.
वाहतूक संचालक अनुपलब्ध
टॅक्सी डिजिटल मीटरबाबत विभागाकडून तोडगा काढण्यात येईल, असे आश्वासन वाहतूक संचालकांनी 15 दिवसांपूर्वी दिले होते. त्यामुळे स्थिती जाणून घेण्यासाठी आम्ही टॅक्सीचालक वाहतूक संचालकांना भेटायला आलो होतो; पण ते त्यांच्या कार्यालयात उपलब्ध नव्हते, असे टॅक्सीचालकांच्या एका प्रतिनिधीने सांगितले.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.