Ranji Trophy 
गोवा

Ranji Trophy: रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेत गोव्याला अजूनही गोलंदाजीची चिंता...

मातब्बर पंजाबविरुद्धचा सामना आजपासून पर्वरीत

Kishor Petkar

Ranji Trophy: रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेत गोव्याचा संघ आतापर्यंत तीन सामने खेळला आहे, परंतु त्यांची गोलंदाजीतील चिंता कायम आहे. या पार्श्वभूमीवर मातब्बर पंजाबच्या आक्रमक फलंदाजांना रोखण्याचे आव्हान शुक्रवारपासून (ता. २६) असेल.

गोवा व पंजाब यांच्यातील एलिट क गटातील चार दिवसीय सामना पर्वरी येथील मैदानावर खेळला जाईल. पंजाब व त्रिपुरा यांच्यात आगरतळा येथे झालेल्या मागील सामन्याला खराब हवामानाचा फटका बसला. चार दिवसांत फक्त ४५.५ षटकांत खेळ झाला होता.

अनिर्णित लढतीत डाव अपूर्ण राहिल्यामुळे दोन्ही संघांना प्रत्येकी एक गुण मिळाला. साहजिकच मनदीप सिंगच्या नेतृत्वाखालील संघाला गोव्यात अनुकूल निकाल अपेक्षित असेल. सध्या तीन सामन्यानंतर पंजाबचे फक्त दोन गुण असून तेवढेच सामने खेळलेल्या गोव्याचे चार गुण आहेत.

यजमानांची महागडी गोलंदाजी

गोव्याविरुद्ध प्रतिस्पर्धी संघांनी चार डावांत ३४ विकेटच्या मोबदल्यात १६१२ धावा नोंदविल्या आहेत. गोव्याचे वेगवान-मध्यमगती गोलंदाज साफ निष्रभ ठरले आहेत. सारा भार फिरकी गोलंदाजांना वाहावा लागत आहे.

डावखुरा दर्शन मिसाळ (२४.१४च्या सरासरीने १४ विकेट) व ऑफस्पिनर मोहित रेडकर (२९.५०च्या सरासरीने १२ विकेट) यांनी एकत्रितपणे २६ गडी बाद केले आहेत. डावखुरा वेगवान अर्जुन तेंडुलकरने तीन सामन्यांत फक्त तीन विकेटसाठी २४८ धावा मोजल्या आहेत. कर्नाटकविरुद्ध लक्षय गर्ग व विजेश प्रभुदेसाई यांना वगळून फेलिक्स आलेमाव व हेरंब परब या वेगवान गोलंदाजांना संधी देण्यात आली होती. कर्नाटकविरुद्धच्या अनिर्णित लढतीत खेळलेला संघच पंजाबविरुद्ध कायम राहतो, की बदल होणार याबाबत निर्णय गोव्याच्या संघ व्यवस्थापनाला अभ्यासपूर्वक घ्यावा लागेल.

यापूर्वीच्या अनुभवावरून खेळपट्टी कोरडी राहण्याचे संकेत आहेत. त्यामुळे अतिरिक्त वेगवान गोलंदाज की फिरकी गोलंदाज हा निर्णयही महत्त्वाचा ठरू शकतो. फलंदाज राहुल त्रिपाठी परतल्यामुळे समर दुभाषीऐवजी के. व्ही. सिद्धार्थ यष्टिरक्षक व फलंदाज अशी दुहेरी भूमिका निभावू शकतो.

खेळपट्टी बदलली

पर्वरी मैदानावर नव्यानेच तयार करण्यात आलेल्या लाल मातीच्या खेळपट्टीवर चंडीगडविरुद्धचा अनिर्णित सामना झाला होता. त्या खेळपट्टीवर गोलंदाजांना विशेष साथ मिळाली नव्हती. गोव्याच्या ७ बाद ६१८ या घोषित धावसंख्येला उत्तर देताना चंडीगडने ४७९ धावांचे उत्तर देत फॉलोऑन टाळला होता.

पंजाबविरुद्धच्या सामन्यासाठी खेळपट्टी बदलली आहे. शुक्रवारपासून काळी मातीच्या जुन्या खेळपट्टीवर सामना होणार आहे. पंजाबने पर्वरीतील या मैदानावर सात वर्षांपूर्वी ६३५ धावांचा डोंगर उभारला होता.

गोव्याची मदार सुयशवर

चंडीगडविरुद्ध पर्वरी येथे १९७ धावांची खेळी केल्यानंतर सुयश प्रभुदेसाईचे नाबाद शतक (१४३) गोव्यासाठी कर्नाटकविरुद्ध दुसऱ्या डावात निर्णायक ठरले होते. त्यामुळे १७७ धावांची पिछाडी भरुन काढत गोव्याने सामना अनिर्णित राखला.

गोव्याची फलंदाजी सुयशच्या चांगल्या फॉर्मवर अवलंबून आहे. सलामीला खेळणाऱ्या २६ वर्षीय फलंदाजाने तीन सामन्यांतील पाच डावात दोन शतकांसह ९६.५०च्या सरासरीने ३८६ धावा केल्या आहेत. यंदा रणजी स्पर्धेच्या तिसऱ्या फेरीनंतर सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांत चेतेश्वर पुजारा (४४४ धावा) याच्यानंतर सुयश दुसऱ्या क्रमांकावर आहे.

दोन्ही संघ

गोवा ः ईशान गडेकर, मंथन खुटकर, सुयश प्रभुदेसाई, राहुल त्रिपाठी, के. व्ही. सिद्धार्थ, स्नेहल कवठणकर, दर्शन मिसाळ (कर्णधार), दीपराज गावकर (उपकर्णधार), मोहित रेडकर, समर दुभाषी, अर्जुन तेंडुलकर, विजेश प्रभुदेसाई, लक्षय गर्ग, हेरंब परब, फेलिक्स आलेमाव, अमूल्य पांड्रेकर.

पंजाब ः मनदीप सिंग (कर्णधार), प्रभसिमरन सिंग, अभिनव शर्मा, सनवीर सिंग, नेहाल वधेरा, मयांक मार्कंडे, सिद्धार्थ कौल, बलतेज सिंग, विश्वनाथ प्रताप, प्रेरीत दत्ता, नमन धीर, जस्सिंदर सिंग, अनमोल मल्होत्रा, सुखविंदर सिंग, अनमोलप्रीत सिंग, वशिष मेहरा.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Fianance Scam: गोव्यात आजवरचा सर्वात मोठा आर्थिक घोटाळा; गुंतवणुकीच्या नावाखाली 50 जणांना 130 कोटींचा गंडा

Mayem Fire Incident: वायंगिणी-मयेत आगीचा तांडव! 30 लाख रुपयांचे नुकसान; शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज

Cash For Job: आमच्यावर पोलिसांमार्फत पाळत! सरदेसाई, पालेकरांचा सनसनाटी आरोप

Rashi Bhavishya 25 November 2024: उद्योजकांसाठी आजचा दिवस खास, मिळणार मोठी डील... तुमच्या राशीत दडलंय काय?

Ranbir Kapoor: राज कपूर फिल्म फेस्टिव्हलची घोषणा! IFFI 2024 मध्ये रणबीरने केलं जाहीर

SCROLL FOR NEXT