Goa Statehood Day debate  Dainik Gomantak
गोवा

गोवा सांभाळणे हाच धर्म...

घटक राज्‍यदिन विशेष : गोमन्तक टीव्हीसाठी ‘सडेतोड नायक’ कार्यक्रमातील सूर

दैनिक गोमन्तक

पणजी : गोवा मुक्‍तीच्‍या 25 वर्षांनंतर 1987 मध्ये दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांच्‍या काळात गोव्‍याला घटक राज्‍याचा दर्जा मिळाला. त्‍यानंतर राज्‍याला खऱ्या अर्थाने स्‍वायत्तता लाभली. निर्णय घेण्याचे स्‍वातंत्र्य मिळाले. विधानसभा अस्‍तित्‍वात येऊन आमदारांची संख्या वाढली. तसेच एक राज्‍यसभा खासदारपदासह दोन लोकसभा खासदार लाभले. गेल्‍या 35 वर्षांत गोव्‍याचा अनेक अंगांनी विकास झाला, प्रगती झाली.

पण याचा लाभ गोमंतकीय आणि गोव्‍याला झाला का? या विषयावर चर्चा झाली. या चर्चेत गोमन्‍तकचे संपादक-संचालक राजू नायक, ज्‍येष्ठ विधिज्ञ क्‍लिओफात आल्‍मेदा कुतिन्‍हो, ज्‍येष्ठ पत्रकार देविका सिक्‍वेरा, युवा सामाजिक कार्यकर्ते युगांक नाईक आणि भाजपचे प्रवक्‍ते ॲड. यतीश नाईक यांनी सहभाग घेतला.

घटक राज्‍याच्‍या दर्जामुळे गोव्‍याला स्‍वतः निर्णय घेण्याचे स्‍वातंत्र्य मिळाले. प्रगती आणि विकासाची दालने खुली झाली, पण राज्‍याला लाभलेल्‍या लोकप्रतिनिधींना त्‍याचा लाभ करून घेता आला नाही. आपली भाषा, संस्‍कृती, इतिहास, निसर्ग, पर्यावरण याच्‍या संरक्षणार्थ आजवर एकही राजकीय पक्ष अथवा राजकीय नेता उभा राहिला नाही, असे मत ॲड. क्‍लिओफात कुतिन्‍हो यांनी व्‍यक्‍त केले.

साक्षरतेत वाढ

शिक्षण क्षेत्राविषयी आपल्‍याला काय वाटते? असा सवाल राजू नायक यांनी यावेळी केला. यावर ॲड. कुतिन्‍हो म्‍हणाले, गोवा मुक्‍त झाल्‍यानंतर भाऊसाहेब बांदोडकरांनी राज्‍यातील गावागावांत शाळा उभारल्‍या. ग्रामीण भागांसह दुर्गम भागांत प्राथमिक शिक्षणाची सोय केली. घटक राज्‍याचा दर्जा मिळाल्‍यानंतर राज्‍याला विद्यापीठ मिळाले. अनेक शिक्षण संस्‍था उभारल्‍या. उच्चशिक्षणाची सोय झाली. साक्षरतेचे प्रमाण वाढले. पण आपला उच्चशिक्षित तरुण नोकरी, उद्योगासाठी देशाबाहेर गेला, आजही जात आहे. गोमंतकीय युवकांना त्‍यांच्‍या योग्‍यतेनुसार गोव्‍यातच नोकरी-व्‍यवसाय संधी उपलब्‍ध करून देणे आवश्‍यक असल्‍याचे ते म्‍हणाले. यावर युगांक नाईक म्‍हणाले, आपले राज्‍य छोटे आहे. अनेक कारणांमुळे आणि छोट्या-मोठ्या कामांसाठी येथे येणाऱ्या परप्रांतीयांची संख्या वेगाने वाढली. गेल्या दोन-तीन पिढ्या येथे गेलेले बिगरगोमंतकीय आता कायदेशीरपणे गोमंतकीय झाले आहेत. यामुळे सरकारी नोकरी असो किंवा उद्योग व्‍यवसाय यामध्ये प्रचंड स्‍पर्धा निर्माण झाली आहे. यामुळे अनेक युवकांना बाहेर जावे लागत आहे. हे चित्र कुठेतरी बदलण्याची गरज असल्‍याचे ते म्‍हणाले.

आपल्‍या राजकीय विचारधारा भलेही वेगवेगळ्या असोत, धार्मिक अधिष्ठान वेगळे असो, सामाजिक परिस्‍थिती कशीही असो पण धर्म, जात-पात, पंथ या पलिकडे जाऊन आपला निसर्ग, भाषा, संस्‍कृती, इतिहास, पर्यावरण आणि आपला गोवा आपल्‍या भावी पिढीसाठी सांभाळणे हाच आपला सर्वात मोठा धर्म ठरेल, असे ठाम मत राजू नायक आणि उपस्‍थित मान्‍यवरांनी यावेळी व्‍यक्‍त केले.

दरम्‍यान, प्रशासकीय यंत्रणेविषयी मात्र उपस्‍थित मान्‍यवरांनी एकमत नोंदवले. सर्वसामान्‍य नागरिकांना चांगली सेवा देणे हे प्रशासनाचे कर्तव्‍य आहे. पंचायत सचिव असो किंवा जिल्‍हाधिकारी, थेट लोकांशी संबंधित असलेल्‍या प्रत्‍येक सरकारी आणि कर्मचाऱ्यांनी लोकांशी नम्रतेने वागायला हवे. तसेच त्‍यांना तातडीची सेवा द्यायला हवी, असे मत मान्‍यवरांनी व्‍यक्‍त केले. यावेळी प्रेक्षकांनी विचारलेल्‍या प्रश्‍नांना मान्‍यवरांनी दिलखुलासपणे उत्तरे दिली

विकास खुंटला

घटक राज्‍याच्‍या दर्जामुळे केंद्राकडून विविध क्षेत्रांसाठी मिळणारा निधी बंद झाला. यामुळे अनेक क्षेत्रांचा विकास खुंटला. महत्त्वाचे नवे स्रोत गोव्‍यात आले नाहीत. तसेच राजकीय सत्ता राष्ट्रीय पक्षांच्‍या हातात गेल्‍याने बहुतांश निर्णय दिल्लीतून होऊ लागले. आजची परिस्‍थिती पाहता राज्‍याचा मुख्यमंत्री, मंत्री इतकेच काय मोठमोठ्या प्रकल्‍पांबाबतचे निर्णयही दिल्लीतून होताना दिसत आहेत. आत्ता जे काही सुरू आहे ते पाहता गोवा केंद्रशासित प्रदेश होता, त्‍यावेळीच बरा होता, असे वाटू लागल्‍याचे ॲड. कुतिन्‍हो म्‍हणाले.

विकासासाठी तडजोड : युगांक नाईक म्‍हणाले, राजकीय पक्ष कुठलाही असो, बहुतांश राजकीय नेत्‍यांनी राज्‍याचे लचके तोडण्यात धन्‍यता मानली आहे. गोमंतकीय आणि गोव्‍याचा फारसा विचार न करता होणारा विकास आपल्‍याला नेमके कुठे नेणार हे येणारा काळच ठरवेल. विकासकामे आणि विकासप्रकल्‍प राबवत असताना काही तडजोडी कराव्‍या लागतात. वाढती लोकसंख्या, वाढते पर्यटन अशा गोष्टींचा विचार करता पायाभूत सोयी-सुविधांमध्ये वाढ करणे अपरिहार्य ठरते. अशावेळी थोडीफार डोंगरकापणी केली किंवा झाडे तोडली म्‍हणून ओरडण्यात अर्थ नाही, असे मत ॲड. यतीश नाईक म्‍हणाले.

दोघांत समान भावना

गोव्‍याचे पहिले मुख्यमंत्री भाऊसाहेब बांदोडकर आणि तत्‍कालीन विरोधी पक्षनेते जॅक सिक्‍वेरा यांच्‍यात तात्त्विक मतभेद होते. पण गोव्‍याविषयी आणि गोमंतकीयांविषयी दोघांचीही भावना समान होती. विचारधारा वेगळ्या असल्‍या तरी दोघेही नेते आदर्शवादी होते, असे मत देविका सिक्‍वेरा यांनी व्‍यक्‍त केले. सध्याचे राजकारण आणि समाजकारण पाहता लोकप्रतिनिधींकडे कसलाही आदर्श असल्‍याचे दिसत नाही. गोव्‍याची अस्‍मिता राखण्याऐवजी राजकीय नेते स्‍वतःचे आणि पक्षाचे भले करण्यात व्‍यग्र असल्‍याचे त्‍या म्‍हणाल्‍या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Crime: दोन सह्या करुन विवाह उरकला, काही दिवसातच नवदेवाने विचार बदलला; लैंगिक अत्याचारप्रकरणी फोंड्यातील तरुणाला अटक

IFFI 2024 मध्ये लोकसंस्कृतीद्वारे देशाची एकता, अखंडतेचे दर्शन! दवर्लीत होणार खुले फिल्म स्क्रिनिंग

Nithya Menen At IFFI: 'तरीही त्या व्यक्तीसोबत काम करणे कर्तव्यच'; अभिनेत्री नित्या मेनन सहकलाकारांबद्दल नेमके काय म्हणाली..

IFFI 2024: ‘ट्रेन’ संकल्पनेतून भारतीय सिनेमाची ‘सफर’! कॅमेऱ्याच्या प्रवेशद्वाराचे विशेष आकर्षण

Manoj Bajpayee At IFFI: 'वेळेत पूर्णविराम आणि संवादात मौन हवे'; मनोज वाजपेयीने सांगितले अभिनेत्यांबाबतीत दोन टप्पे

SCROLL FOR NEXT