गोवा आणि पर्यटन हे समीकरण सर्वांनाच माहितीये. पुर्वी फक्त उन्हाळ्याची सुट्टी घालविण्यासाठी येणारे पर्यटक आता वर्षभर गोव्यात मजा लुटायला येतात. यामुळे पर्यटनाला चांगले दिवस आले आहेत. गोव्यातील समुद्रकिनारे पर्यंटकांसाठीचे खास आकर्षण असते.
पण गोव्यात अशी एक संस्था आहे जी तुम्हाला एका वेगळ्या गोवा ची सफर घडवून आणेल. ज्यांना गर्दीच्या ठिकाणी जायला आवडत नाही, ज्यांना पर्यटन करताना स्वतःच स्वातंत्र्य हवे असते अशासाठी ‘दी लोकल बीट’ नावाची संस्था गोव्यात २०१८ पासून कार्यरत आहे.
या संस्थेचे संस्थापक मॅकीन्ले बार्रेटो (Mackinley Barreto) उर्फ मॅक यांनी याबाबत सविस्तर माहिती ‘गोमंतक’ ला दिली. ते म्हणाले जेव्हा मी २०१८ च्या जूनमध्ये लोकल बीट सुरू केले तेव्हा मला हे समजले नव्हते की मी ७० आणि ८० च्या दशकातील गोव्याचे दरवाजे ठोठावत आहे.
‘अरे तो जुना, मोहक, गोवा कायमचा निघून गेला’ हे वाक्य नेहमी ऐकायला मिळायचे. यामधूनच ‘दी लोकल बीट’ चा जन्म झाला. या संस्थेला जाणून घेण्यासाठी तुम्हाला प्रथम ७० आणि ८० च्या दशकातील गोवा काय होता हे जाणून घ्यावे लागेल.
मला आणि माझ्या टीमला मुळ गोव्याचे स्वरूप समजून घेण्यासाठी काही वर्षे लागली म्हणूनच आज जेव्हा आम्ही पर्यटकांना सहलीला घेऊन जातो तेव्हा आम्ही त्यांना ७० च्या दशकातील गोव्याशी निवांत आणि खाजगी संभाषण करण्याची संधी देतो असे मॅक सांगतात.
पूर्वीचा गोवा हा खूप शांत होता. लोक दोन वेळेचे अन्न खावून सुखी असायचे. त्यावेळी आतासारखी पर्यटकांची गर्दी नसायची. मला ते प्रसंग आठवतात जेव्हा आमचे पालक आम्हाला समुद्रकिनाऱ्यावर घेऊन जात होते. एक मोठी चटई आणि समोरच दिसणारा रिकामा समुद्रकिनारा आम्हाला खूप जवळचा वाटायचा.
त्या दिवसांत माझे वडील आम्हाला त्यांच्या सायकलवर बसवून जंगलाच्या काठावर असलेल्या गोड्या पाण्याच्या झऱ्यांवर घेऊन जायचे. दुपारच्या वेळी आम्ही मुलं नवीन टेकड्यांचा, झऱ्यांचा शोध घेण्यासाठी जात असू.
कधी कधी आम्ही खाजगी मालमत्तेत घुसखोरी करून आंबे गोळा करताना पकडले गेल्यावर मालकाने आम्हाला सौम्य दटावून सोडले जाई आणि वरुन किमान 2 आंबे सदिच्छा देऊन सोडून देण्यात येई अशा आठवणींचा पाढाच मॅक यांनी वाचून दाखविला.
‘दी लोकल बीट’ मधून आम्ही पर्यटकांना निसर्गाच्या अगदी जवळ नेण्याचा प्रयत्न करतो. ज्यांनी कधीही स्विमिंग पूलमध्ये झेप घेतली नाही ते जंगलातील खडकावरून पाण्यात उडी मारतात. अर्थात, प्रत्येकाकडे लाइफजॅकेट आहे याची खात्री आम्ही करून घेतो.
एखादे नवीन ठिकाण शोधण्याकरीता आम्हाला काही आठवडे तर कधीतरी महिने लागतात. यासाठी आम्ही तिथल्या स्थानिकांशी संपर्क साधतो, माहिती प्राप्त करून घेतो. जमल्यास गावातीलच तरूणांना ‘टुरिस्ट गाइड’ होऊन आमच्या पाहुण्यांना मार्गदर्शन कारायला सांगतो.
आम्ही अशी ठिकाणे शोधतो जिथे जवळपास कुळागरे, पाण्याचे झरे किंवा एखादे कौलारू घर ज्याचासमोर शेणाने सारवलेले प्रशस्त अंगण असेल. कारण आमच्या पाहुण्यांना निसर्गाच्या कुशीत असलेल्या वेगळ्या गोव्याचा, इथल्या खाद्यसंस्कृतीचा अनुभव आम्हाला द्यायचा असतो
‘दी लोकल बीट’ फक्त एवढयावरच थांबत नाही तर ज्या गावातील तरुण ‘टुरिस्ट गाइड’ म्हणून काम करतात किंवा तेथील कुटुंब पाहुण्यांचे आदरातिथ्य करतात त्यांना व्यवस्थित मोबदला देण्याचे मोलाचे काम आम्ही करतो जेणेकरून त्यांना रोजगरची संधी प्राप्त होते हे महत्वाचे असे मॅक यांनी सांगितले.
गोव्यातील लोकांमध्ये नम्रता, सद्भावना आणि मनमिळाऊपणा भरपूर आहे. इथली खाद्यसंस्कृति देखील विशिष्ट आहे आणि हेच आमच्या पाहुण्यांना आम्ही अनुभवायला देतो. गेल्या 5 वर्षांत माझ्या टीमने राज्यभरात विविध नवीन ठिकाणे शोधली आहे जिथे आजपर्यंत कुणी पोहोचले नाही. सुप्रसिद्ध अभिनेत्री रश्मिका मंदाना, नृत्य दिग्दर्शक रेमो डिसौझा सारखे चित्रपट तारे, सेलिब्रिटी, फॅशन डिझायनर आणि सीईओ यांनी ‘दी लोकल बीट’ चा अनुभव घेतला आहे.मॅकीन्ले बार्रेटो, संस्थापक, ‘दी लोकल बीट’
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.