‘जय जय रामकृष्ण हरी’ असे म्हणत वेगवेगळ्या पद्धतीने काव्य, संगीत, अभिनय यांच्यासह भक्तिरसपूर्ण एकपात्री सदरीकरणाला ‘कीर्तन’ असे म्हणतात. अशा कथारूपी निवेदन सादर करणाऱ्याला ‘कीर्तनकार’ म्हणूण संबोधतात.
भारतातल्या सर्व भाषांत, सर्व प्रदेशात आणि सर्व सांप्रदायात ‘कीर्तन’ चा प्रकार आढळतो. जुन्या काळात वयस्क आणि अनुभवी व्यक्ति कीर्तनकार असायची. पण हल्लीच्या काळात लहान मुले सुद्धा कीर्तन करताना आढळतात ज्याना ‘बाल कीर्तनकार’ म्हटले जाते.
सायली रामकृष्ण गर्दे ही डिचोली मधील २३ वर्षीय युवती ‘बाल कीर्तनकार’ म्हणूण नावारूपाला आली. तिचे वडील रामकृष्ण गर्दे स्वतः एक उत्तम कीर्तनकार. त्यांना पाहुनच वयाच्या साडेतीन वर्षापासून तिने कीर्तन करायला सुरवात केली.
सायलीचे पहिले कीर्तन शिशूवाटीकेत झाले त्यावेळी सर्वांनी तिचे खूप कौतुक केले. एवढ्या लहान वयात तिला कीर्तन करताना पाहून सर्वांनाच अप्रूप वाटले होते. त्यानंतर पहिल्या इयत्ते पासूनच कथाकथन, वकृत्व अशा स्पर्धांमध्ये तिने भाग घ्यायला सुरवात केली.
प्राथमिक आणि शालेय जीवनात कथाकथन आणि वकृत्व स्पर्धेत तालुका व राज्य पातळीवर सलग पहिले बक्षीस तिने पटकाविले. यासोबतच इयत्ता ५ वी पासून एकपात्री अभिनय आणि स्वगत स्पर्धेतसुद्धा भाग घेऊन तिथे प्रथम क्रमांक मिळविला आहे.
६ वी इयत्तेत असताना शणै गोंयबाब कथामाला या कोंकणी कथाकथन स्पर्धेत देखील तालुका पातळीवर पहिले बक्षीस तिला प्राप्त झाले. पहिल्या इयत्तेपासून सुरू केलेली बक्षीस परंपरा दहावी होईपर्यंत, सलग १० वर्षे कथाकथन, वकृत्व स्पर्धांमध्ये तालुका तसेच राज्य पातळीवर प्रथम क्रमांक मिळविण्याचा विक्रम सायलीने केलेला आहे.
२०१६ साली दहावी पूर्ण झाली आणि या बक्षीस परंपरेत खंड पडला तो तिच्या शारीरिक दुखण्यामुळे. घरातल्या बाथरूम मध्ये पडल्याने तिच्या पाठीच्या मणक्याला जबर मार बसला. १ वर्षे पूर्णपणे अंथरूणाला खिळून काढले. तशातच ११ वी च्या कला शाखेची परीक्षा तिने घरी राहूनच दिली.
वर्षभर सगळे डॉक्टर करून काहीच उपयोग झाला नाही. शेवटी मडगाव येथील विनायक महाजन ह्यांनी फक्त अॅक्युप्रेशर च्या मदतीने तिला स्वतःच्या पायांवर उभं केल. त्यानंतर तिने १२ वी बोर्डची परीक्षा दिली. आजारी असतानाही फक्त लोक आग्रहास्तव तिने एक कीर्तन केले आणि वकृत्व स्पर्धेत पहिले बक्षीस मिळविले.
एवढ्या मोठ्या आजारातून बरी झाल्यावर सायलीने परत एकदा फिनिक्स पक्ष्याप्रमाणे झेप घेत कॉलेजतर्फे अनेक स्पर्धेत भाग घेत प्रथम क्रमांकाची बक्षिसे मिळविली. राज्यपातळीवर कथाकथन, वकृत्व, एकपात्री अभिनय अशा अनेक स्पर्धांमध्ये आपला ठसा कायम ठेवला.
सेंट झेवियर कॉलेजमध्ये कला शाखेचे पदवीधर शिक्षण घेत असताना विविध कार्यक्रमाचे निवेदन, ‘अध्ययन फाऊंडेशन’ तर्फे गोव्यातील शालेय मुलांसाठी वकृत्व तसेच कथाकथन कार्यशाळा आणि अनेकदा युवा महोत्सवात सहभाग घेतला आहे. काही ठिकाणी परीक्षकाची देखील भूमिका बजावली आहे.
लहानपणापासूनच जबरदस्त पाठांतर असल्याने विविध नाटकांमध्ये सायलीने काम केले आहे. ९ वी मध्ये शिकत असताना प्रसिद्ध मराठी नट अमोल कोल्हे यांच्यासोबत ‘शिवपुत्र शंभुराजे’ या नाटकात देखील काम करण्याची संधी तिला मिळाली.
२०२१ साली कला आकादमीच्या एकांकिका स्पर्धेत ‘मर्सिया’ या नाटकासाठी उत्कृष्ट अभिनयाचे पारितोषिक सायलीला मिळाले आहे. तसेच गोव्यासोबतच महाराष्ट्र आणि कर्नाटक मध्ये देखील तिला कीर्तनासाठी बोलविले जाते.
गोवा विद्यापीठात मराठीतून एम.ए. ही पदव्युत्तर शिक्षण घेत असलेल्या सायलीला लेखनाची आवड आहे. पत्रलेखन, कविता तसेच मुलाखती घ्यायला आवडतात. यावेळी तिला पुढे प्राध्यापिका होण्याची इच्छा असल्याचे तिने ‘गोमंतक’ शी बोलून दाखविली.
कीर्तनाची सुरवात बाबांकडून झाल्याने, तिचे प्रथम गुरु वडील आहेत आणि त्यानंतर दत्तदास बुआ घाग यांच्यासारख्या कीर्तनकरांची कीर्तने एकून ती स्वतःची तयारी करते. वाचन, संशोधन, आजूबाजुला घडणाऱ्या गोष्टींचे निरीक्षण ह्या कीर्तनाच्या दृष्टिकोनाने महत्वाच्या गोष्टी आहेत.
सुरवातीला ७ वी पर्यन्त कीर्तने शब्दश: पाठ केली. नंतर जेव्हा कळायला लागले की स्वतःचे काहीतरी वेगळेपण असायला हवे तेव्हा नामवंत कीर्तनकारांची कीर्तने एेकायला सुरवात केली. दूरदर्शन तसेच आकाशवाणी वर देखील कीर्तनं करण्याची संधी मिळाल्याचे सायलीने सांगितले.
“आयुष्यात आपल्या आवडीचे काम करावे ज्याने आपल्याला आनंद मिळतो. कीर्तनातील परंपारिकता जशीच्या तशीच आहे. हल्ली त्यात राष्ट्रीय कीर्तन परंपरेची भर पडली आहे जी चांगली गोष्ट आहे. ज्यातून राजकारण कींवा इतिहास सांगतात. नारदिय कीर्तन परंपरेत लोकांचे विषय वास्तवात मांडायला मिळतात. आजकाल कीर्तनाला तरुण पिढी श्रोते बनून येताना दिसतोय. हा श्रोता वाढत गेला पाहिजे.”ह. भ. प. सायली गर्दे, कीर्तनकार
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.