Goa Ranji Coach
Goa Ranji Coach File Photo
गोवा

Goa Ranji Coach: मुंबईचे विनोद राघवन गोव्याचे रणजी प्रशिक्षक; ‘जीसीए’कडून नियुक्ती

Kishor Petkar

Goa Ranji Coach: मुंबईतील अनुभवी क्रिकेट मार्गदर्शक विनोद राघवन यांची गोव्याच्या रणजी क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी गोवा क्रिकेट असोसिएशनने (जीसीए) बुधवारी नियुक्ती केली. याशिवाय सगुण कामत, स्वप्नील अस्नोडकर, रॉबिन डिसोझा, शदाब जकाती या गोव्याच्या माजी रणजी संघ कर्णधारांकडेही महत्त्वाची जबाबदारी देण्यात आली.

वेगवान गोलंदाज असलेले विनोद राघवन नव्वदच्या दशकात मुंबईकडून खेळले. तेथील क्लब क्रिकेटमध्येही त्यांनी ठसा उमटवला. मुंबईतील वयोगट क्रिकेट मार्गदर्शक या नात्यानेही त्यांनी दीर्घकाळ काम केले आहे. गतमोसमात फलंदाजी प्रशिक्षक असलेले मुंबईतील प्रशांत शेट्टी यांची रणजी संघाच्या सहाय्यक प्रशिक्षकपदी नियुक्ती केल्याची माहिती जीसीए सचिव रोहन गावस देसाई यांनी दिली.

गोव्यातर्फे रणजी क्रिकेट स्पर्धेत सर्वाधिक गडी बाद केलेला डावखुरा फिरकी गोलंदाज शदाब जकाती याच्याकडे जीसीएने गोलंदाजीतील महत्त्वाची जबाबदारी दिली आहे. शदाब जीसीएसाठी गोलंदाजी सल्लागार असेल.

सगुण कामत १९ वर्षांखालील, स्वप्नील अस्नोडकर २३ वर्षांखालील, रॉबिन डिसोझा १६ वर्षांखालील संघाचा प्रशिक्षक असेल. गोव्याची माजी महिला क्रिकेटपटू फ्रीडा परेरा १९ वर्षांखालील महिला संघाची, तर सेबी फर्नांडिस १५ वर्षांखालील महिला संघाचा प्रशिक्षक असेल.

महिलांसाठी दिग्गज फलंदाजी सल्लागार

गोव्यातील महिला क्रिकेट फलंदाजी दर्जेदार व्हावी यासाठी जीसीएने महिला क्रिकेट सल्लागारपदी दिग्गज मार्गदर्शकाची नियुक्ती केली आहे. मुंबईचे उमेश पटवाल हे गोव्याच्या सीनियर महिला क्रिकेट संघाचे सल्लागार असतील.

त्यांच्यापाशी क्रिकेटमधील मार्गदर्शनाचा दीर्घानुभव आहे. ते नेपाळ क्रिकेट संघाचे माजी मुख्य प्रशिक्षक असून अफगाणिस्तान संघाचे फलंदाजी प्रशिक्षक म्हणूनही काम पाहिले आहे. आयपीएल स्पर्धेत खेळलेल्या कोची टस्कर्स संघाचे ते सहाय्यक प्रशिक्षक होते.

गोव्याच्या विविध संघांचे प्रशिक्षक

रणजी क्रिकेट संघ : मुख्य प्रशिक्षक : विनोद राघवन, सहाय्यक प्रशिक्षक: प्रशांत शेट्टी

जीसीए गोलंदाजी सल्लागार: शदाब जकाती

१९ वर्षांखालील संघ : मुख्य प्रशिक्षक : सगुण कामत, सहाय्यक प्रशिक्षक : शैलेंद्र सनगर

२३ वर्षांखालील संघ : मुख्य प्रशिक्षक : स्वप्नील अस्नोडकर

१६ वर्षांखालील संघ : मुख्य प्रशिक्षक : रॉबिन डिसोझा, सहाय्यक प्रशिक्षक : राहुल केणी

सीनियर महिला संघ फलंदाजी सल्लागार : उमेश पटवाल

१९ वर्षांखालील महिला संघ : मुख्य प्रशिक्षक : फ्रीडा परेरा

१५ वर्षांखालील महिला संघ : मुख्य प्रशिक्षक : सेबी फर्नांडिस

‘विजयी मानसिकता, चांगले निकाल अपेक्षित’

आगामी मोसमासाठी नियुक्त केलेल्या प्रशिक्षकांकडून संघात विजयी मानसिकता आणि चांगले निकाल यांची अपेक्षा आहे, असे जीसीए सचिव रोहन गावस देसाई यांनी सांगितले. ‘‘रणजी प्रशिक्षकपदी नियुक्त केलेल्या विनोद राघवन यांच्यापाशी दीर्घानुभव आहे.

त्यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबईने १९ वर्षांखालील विनू मांकड करंडक एकदिवसीय, तसेच कुचबिहार करंडक क्रिकेट स्पर्धा सलगपणे जिंकलेली आहे. गोव्यातर्फे दीर्घकाळ रणजी क्रिकेट खेळलेल्या माजी खेळाडूंनी राज्य क्रिकेटमध्ये योगदान देण्याची इच्छा व्यक्त केली.

मी सचिव बनल्यानंतर त्यांनी त्यादृष्टीने माझ्याशी संपर्क साधला होता. त्यांना येथील क्रिकेटची चांगली जाण आहे, त्यामुळे त्यांच्याकडे ज्युनियर क्रिकेटची जबाबदारी देण्यात आली आहे,’’ अशी माहिती रोहन यांनी दिली.

गोव्यातील महिला क्रिकेटच्या कक्षा रुंदावत आहेत. निवड चाचणीस आलेल्या मुलींची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. मात्र त्यांची फलंदाजीतील दृष्टिकोन बदलणे अत्यावश्यक आहे आणि यासाठीच दीर्घानुभवी उमेश पटवाल यांच्याकडे महिला क्रिकेट फलंदाजीची जबाबदारी देण्यात आल्याचे जीसीए सचिवाने नमूद केले.

गोव्यातील क्रिकेट प्रशिक्षणात एकवाक्यता आणि समजूतदार वातावरण राहावे या उद्देशाने मुंबईतील प्रशिक्षकांची निवडीस प्राधान्य दिल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Top News: चोर्ला घाट अपघातात तरुण ठार, कन्‍हैयाकुमार मृत्यूप्रकरणी खूनाचा गुन्हा नोंद; राज्यातील ठळक बातम्या

Goa Education: गोव्यात आता ITI मध्ये करता येणार दोन नवे कोर्स, 15 जुलैपासून सुरुवात; CM नी दिली महत्वाची माहिती

Bicholim News: कारवर कोसळले झाड; बैलासह म्हशीची सुटका

Assagao Demolition: आसगाव प्रकरणात CM आणि लोबो दाम्पत्याचा हस्तक्षेप! वकिलाचा युक्तीवाद, पूजाला जामीन मिळणार का?

Goa News: ...आणि मुख्यमंत्रीही झाले वारकरी !

SCROLL FOR NEXT