Santosh Trophy: गोव्याने पाच वर्षांनंतर संतोष करंडक 77 व्या राष्ट्रीय सीनियर पुरुष फुटबॉल स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला.
सोमवारी उपांत्यपूर्व लढतीत त्यांनी दिल्लीवर पिछाडीवरून 2-1 फरकाने मात केली. अरुणाचल प्रदेशमधील युपिया-इटानगर येथील गोल्डन ज्युबिली स्टेडियवर सामना झाला.
सामन्याच्या आठव्याच मिनिटास कॉर्नर फटक्यावरील भेदक हेडिंगद्वारे साहिल कुमार याने दिल्लीला आघाडी मिळवून दिली.
सुरवातीच्या धक्क्यातून सावरत गोव्याने २०व्या मिनिटास बरोबरी साधली. कॉर्नर फटक्यानंतर ज्योबर्न कार्दोझ याने गोलची नोंद केली. २९व्या मिनिटास लॉईड कार्दोझ याने दिल्लीचा बचाव भेदत गोव्याला २-१ अशी आघाडी मिळवून दिली. हाच गोल अखेरीस निर्णायक ठरला.
सहा वेळच्या माजी विजेत्या सेनादलानेही उपांत्य फेरी गाठली. सोमवारी अगोदर झालेल्या उपांत्यपूर्व लढतीत सेनादलाने रेल्वे संघावर २-० फरकाने मात केली.
अपराजित मालिका कायम
यंदाच्या संतोष करंडक राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेत गोव्याचा संघ सलग 10 सामने अपराजित आहे. प्राथमिक फेरीत तीन विजय व एक बरोबरी, नंतर मुख्य फेरीत दोन विजय व तीन बरोबरी अशी कामगिरी केल्यानंतर आता गोव्याने उपांत्यपूर्व लढतही जिंकली. एकंदरीत त्यांनी यावेळच्या मोहिमेत आतापर्यंत सहा विजय व चार बरोबरीची नोंद केली आहे.
अखेर प्रतीक्षा संपुष्टात
गोव्याने संतोष करंडक स्पर्धेत पाच वेळा विजेतेपद, तर आठ वेळा उपविजेतेपद मिळविले आहे. मात्र २०१८-१९ मध्ये लुधियाना येथे उपांत्य फेरीत पंजाबकडून हार पत्करल्यानंतर गोव्याला या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत अखेरच्या चार संघांत स्थान मिळविता आले नव्हते.
२०२१-२२ मध्ये पश्चिम विभागातून गोव्याला मुख्य फेरीसाठी पात्रता मिळविता आली नव्हती, तर २०२२-२३ मध्ये मुख्य फेरी गाठल्यानंतर सर्व लढतीत पराभवाची नामुष्की आली होती.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.