Goa School : प्राथमिक शाळा सुरू होऊन जवळपास दोन महिने होत आहेत. पण अद्याप शाळांतून साधनसुविधा पुरवण्यात शिक्षण खाते अपयशी ठरले आहे. पावसानेही यंदा इंचाची पंचाहत्तरी कधीच पूर्ण केली असून अवघ्या काही दिवसांत तो निश्चितपणे शंभरी गाठणार आहे. पण शिक्षण खात्याने अद्याप प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना रेनकोटचे वितरण केले नाही. त्यामुळे काही मुले रेनकोट नसतानाच भिजत शाळेत ये-जा करीत आहे. गणवेशाचाही अद्याप थांगपत्ता नाही, अशी माहिती पालकांनी दिली.
अद्याप टेंडर पास झाले नसावे, कंत्राटदाराने बोली लावली नसावी. अशा दिरंगाई कारभारात यंदाही रेनकोट वेळेत मिळणार नाही, हे जवळ जवळ पक्के झाले आहे. जेव्हा रेनकोट उपलब्ध होतील, तेव्हा पाऊस परतीला गेलेला असेल, अशी संतप्त प्रतिक्रिया पालक वर्गांतून व्यक्त होत आहे.
ज्या पालकांना शक्य होते, त्यांनी मुलांना रेनकोट दिले, पण गरीब, कष्टकरी आहेत, त्यांच्या मुलांचे काय? सरकारी यंत्रणाच्या आंधळेपणामुळे प्राथमिक शिक्षणाचा बट्ट्याबोळ होत आहे. या समस्येकडे लोकप्रतिनिधीचेंही दुर्लक्ष आहे दुर्दैव आहे, अशी व्यथा एका ज्येष्ठ शिक्षकाने व्यक्त केली.
प्राथमिक शाळांतून गणवेशही दिला जातो. यंदा पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्यदिन जवळ आला, तरीही अद्याप राज्यात कुठेही विद्यार्थ्यांना गणवेश दिलेला नाही. गणवेश देणार की नाही, बाबतही संदिग्धता आहे. मुळातच भागशिक्षणाधिकाऱ्यांकडून शाळांचे मूल्यमापन होत नाही. त्यामुळे सगळीकडे मनमानी कारभार सुरू आहे, असे पालकांचे मत आहे.
गेल्या वर्षीचे रेनकोट कुठे?
गेल्या वर्षी कोविडमुळे पावसाळ्यात शाळांच बंद होत्या, पण रेनकोटबाबतच्या अंदाजपत्रकातील त्या तरतुदीचे काय झाले? किमान यंदा शाळा सुरू झाल्यामुळे पहिल्या आठवड्यातच रेनकोट देणे शक्य होते.
दरम्यान सरकारला शिक्षणाचे काहीही पडलेले नाही. शिक्षणमंत्र्यांचे आपल्या खात्याकडे दुर्लक्ष झालेले आहे. त्यामुळे रेनकोट वाटप, पुस्तके वाटपाकडे हेळसांड होत असून संबधित मंत्री आपला अजेंडा राबवण्याचा प्रयत्न करीत आहेत. कदाचित ते पावसाळा संपल्यावर रेनकोटचे वाटप करतील, असा आरोप गिरीश चोडणकर यांनी केला आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.