Vijai Sardesai: फातोर्ड्याचे आमदार विजय सरदेसाई यांनी बोर्डा - मडगाव येथील सरकारी मल्टीपर्पज हायस्कूलच्या प्रकल्प बांधकामाच्या पहिल्या टप्प्याच्या कामाची पाहणी केली व आढावा घेतला. सरकारकडून कंत्राटदाराला आर्थिक पाठबळ मिळत नसल्याचे हे बांधकाम लांबणीवर पडले आहे.
या प्रकल्पाचे काम 2019 मध्ये सुरू झाले. मात्र नंतर निवडणुकीसाठीच्या स्ट्रॉंग रुमच्या कामामुळे, कोविड महामारीमुळे व न्यायालयीन खटल्यामुळे हा प्रकल्प आतापर्यंत पूर्ण व्हायला हवा होता, पण जवळ जवळ दीड वर्षांचा विलंब झाला आहे.
हा प्रकल्प जीएसआयडीसीतर्फे बांधण्यात येत असला, तरी कंत्राटदाराला सरकारकडून नियमीत आर्थिक पाठबळ मिळत नाही. त्यांनी सादर केलेल्या बिलांची रक्कम फेडली जात नाही. त्यामुळे हा प्रकल्प पूर्ण होण्यास आणखी विलंब होण्याची शक्यता आमदार सरदेसाई यांनी व्यक्त केली.
अंदाजे दहा हजारपेक्षा जास्त चौरस मीटर जागेत सरकारी मल्टीपर्पज हायस्कूल व उच्च माध्यमिकची जुनी इमारत आहे. शिवाय महाविद्यालयाची नवीन इमारत आहे. जुन्या इमारतीत आयटीआय शिक्षणाची व्यवस्था आहे.
या प्रकल्पाच्या पहिला टप्प्यातील कामासाठी 25.73 कोटी रुपये खर्च होणार आहेत. त्यातील कंत्राटदाराने जवळ जवळ दहा कोटी रुपयांचे काम पूर्ण केले आहे. या पहिल्या टप्प्यात 37 वर्ग, दोन प्रयोगशाळा, शिक्षकांसाठी खोलीची व्यवस्था आहे. एकदा हा प्रकल्प पूर्ण झाला, तर जुन्या इमारतीतील पहिली ते बारावीचे वर्ग तसेच आयटीआयचे वर्ग नव्या इमारतीत स्थलांतरीत केले जातील.
दुसऱ्या टप्प्यात जुनी इमारत मोडून तिथे नवी इमारत बांधण्यात येईल व त्यात केवळ आयटीआय वर्गांची व प्रयोगशाळेची व्यवस्था केली जाईल. शिवाय सभोवताली फुटबॉल, क्रिकेट मैदाने, चालण्यासाठी ट्रॅकची व्यवस्था करण्यात येणार आहे. या कामाला अंदाजे 45 कोटी रुपये खर्च येणार असल्याची माहिती आमदार सरदेसाई यांनी दिली.
‘मुख्यमंत्र्यांनी काम पूर्ण करण्यास प्राधान्य द्यावे’
हा प्रकल्प जीएसआयडीसीतर्फे जरी बांधण्यात येत असला, तरी शिक्षण खाते, तांत्रिक शिक्षणाचा संबंध येतो. तसेच अर्थ खात्याचाही संबंध येतो. ही तीन्ही खाती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याकडे असल्याने त्यांनी या प्रकल्पासाठी कुठलीही आडकाठी न आणता सुरळीत पूर्ण करण्यास प्राधान्य द्यावे, असे आमदार विजय सरदेसाई म्हणाले.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.