Rice | Goa News
Rice | Goa News  Dainik Gomantak
गोवा

Goa Agriculture: भाताला हवा वाढीव आधारभाव 'खरी कुजबुज'

दैनिक गोमन्तक

सासष्टीतील शेतकऱ्यांना म्हणे सरकारने भाताचा आधारभाव वाढवून दिलेला हवा आहे व त्यांनी त्यासंदर्भात केलेली मागणी सरकार विनाविलंब मान्यही करेल यात शंका नाही. कारण राज्य व केंद्र सरकारचे उद्दिष्टच मुळी कृषी उत्पन्न दुप्पट करण्याचे आहे. ते कराच, पण त्यासाठी योग्य पावले उचला असे सगळेच म्हणतात.

सासष्टीचेच उदाहरण घेतले, तर तेथे बियाणे ते खत वगैरे सरकार पुरविते. त्याशिवाय लावणी, कापणी एवढेच नव्हे, तर मळणीसुध्दा राजकारणी पुरवीत असलेल्या यंत्रांव्दारे केली जाते. असे असूनही जर वरून त्यांना आधारभाव वाढवून हवा असेल तर मग अशा कृषी संस्कृतीचा उपयोग काय असा प्रश्न पडतो.

शर्मद सुखावले!

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सोमवारी सायंकाळी मनोरंजन संस्थेच्या परिसरात इफ्फीच्या कामाची पाहणी केली. मनोरंजन संस्थेच्या मंडळावर घेतलेल्या रायतूरकर यांनी या कामांची पूर्ण माहिती दिली.

शिवाय प्रसार माध्यमांना माहिती देताना मुख्यमंत्र्यांनी शर्मद यांना माहिती सांगण्याची संधी दिली. त्यामुळे त्यांची कॉलर कडक झाली असणारच. मडगावात दिगंबर कामत भाजपमध्ये आल्याने शर्मदबाब यांना सध्या पणजीत काम करायला मिळाल्याने सुखावले असतील.

तसे पाहिले, तर उगाच त्यांची पक्षाने मनोरंजन संस्थेवर निवड केली नाही. कदाचित शर्मद यांनी दामू नाईक यांच्याकडून काही टिप्स घेतल्या तर ते अधिक काळ पणजीत दिसतील आणि तेवढे कामत यांनाही बरेच नाही का?

हा तर आयआयटीचा लिलाव!

‘कोणी घर देता का हो घर? एका तुफानाला घर देता का?’ हा ‘नटसम्राट’ नाटकातील संवाद आपण ऐकलाच असेल. आता राज्यातील आयआयटीत शिक्षण घेणारे व शिकविणारे असाच सवाल करीत आहेत. ‘कोणी जागा देता का हो जागा?एका आयआयटीला जागा देता का?’ फरक इतकाच, की ‘नटसम्राट’मधील तो संवाद होता, हा सवाल आहे.

गोव्यात कोणीही आयआयटीला जागा देण्यास तयार नाही व जिथे सरकारी जागा उपलब्ध आहे तिथे सरकार आयआयटी नेण्यासाठी तयार नाही. कोणकोणपासून सत्तरी व सत्तरीपासून सांगे असा प्रवास केलेली आयआयटी कुठे उभी राहणार याचा पत्ता नाही. कुंकळ्ळीच्या लोकांनी एका कवडीचाही फायदा नसताना एनआयटी स्वीकारली.

मात्र, सगळेच कुंकळ्ळीकरांसारखे उदार थोडेच असतात! सरकारात मंत्री असलेले ढवळीकर आयआयटी फोंड्यात ठेवण्यास राजी आहेत. आता दुसरे एक मंत्री सुभाष शिरोडकर म्हणतात, सांगेकरांना नको असल्यास आपण आयआयटी शिरोड्यात नेण्यासाठी तयार आहे.

आयआयटीत म्हणे पाचशे नोकऱ्या तयार होणार आहेत. शिरोडकर साहेब एनआयटीत किती गोंयकार आहेत याची संख्या द्या व नंतर बोला असे विरोधक म्हणत आहेत.

‘बीएस-४’ ट्रकांमागील कोडे

कित्येक वर्षे उलटली, मडगाव नगरपालिकेचा एक कार्यकाळही संपून गेला, पण तिने ३७ लाख रुपये खर्चून घेतलेले दोन ‘बीएस-4’ ट्रक काही रस्त्यावर येण्याचे नाव घेत नसल्याने या एकंदर प्रकरणातील करता करविता कोण असा सवाल आता मडगावकर करू लागले आहेत.

लिंडन नगराध्यक्ष असताना आताच्या नगराध्यक्षांनी तावातावाने अनेक आरोप केले होते, पण अजून त्याबाबत कोणतीच हालचाल होताना दिसत नाही. नगरपालिकेत एमसीएची सत्ता असताना ही खरेदी झाली होती.

आता एमसीए अस्तित्वात नाही. त्यामुळे हे 37 लाख बुडीत खात्यात गेल्यातच जमा आहेत असे पालिकेतच आता बोलले जात आहे.

असाही सुखद धक्का...

गोव्यातील सुशिक्षित बेरोजगारांची नीती आयोगाने जाहीर केलेली संख्या मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना पटलेली नाही, ते स्वत: सुशिक्षितांकडे विचारपूस करून शहानिशा करत आहेत. याचा प्रत्यय मडगावमध्ये आदिवासी खात्याने आयोजित केलेल्या भगवान बिरसा मुंडा जयंती कार्यक्रमात आला.

यानिमित्त खात्याने पाच आदिवासी महिलांचा सन्मान केला होता. यात कुणी लोककलाकार होत्या, तर कुणी सामाजिक कार्यकर्त्या. पण मुख्यमंत्र्यांनी विशेष विचारपूस केली ती रमिता देविदास गावकर या महिलेची.

गोवा विद्यापीठात महिला अभ्यास पदव्युत्तर विषयात सुवर्णपदक मिळविलेली ही महिला अजून बेरोजगार आहे हे लक्षात येताच मुख्यमंत्र्यांनी तिला आपल्या कार्यालयात येऊन भेटायची व्यासपीठावरूनच सूचना केली.

त्यांनी आपणहून बोलावले म्हणून त्या महिलेला सुखद धक्का बसलाच, पण सभागृहातील उपस्थितही मुख्यमंत्र्यांनी सुशिक्षित बेरोजगारांचा मुद्दा बराच मनावर घेतलेला पाहून सुखावले.

हा बोरकर कोण?

नागरी पुरवठा खात्याचे धान्य परस्पर बाहेर काढून हा चोरीचा माल दुसऱ्या राज्यांना विकणारी टोळी राज्यात अस्तित्वात असण्याचे संकेत मिळू लागले आहेत. या प्रकरणात बोरीचा संबंध आहे.

तेथील एक भामटा हा माल मिळवून विकण्याचे काम करीत होता. त्याचे काही स्थानिक राजकारण्यांशी संबंध आहेत. इतरही बऱ्याच उचापतींमध्ये तो गुंतला असल्याची शक्यता आहे. अद्याप पोलिस त्याचे नाव देत नाहीत, परंतु सदर बोरकरवर पोलिसांचे लक्ष आहे आणि हा माल बोरीतीलच एका गोदामात आणण्याचे त्याचे प्रयत्न चालले होते.

यापूर्वीही खात्याशी संबंधित चोरीमध्ये त्याने सहभाग घेतला असल्याची चर्चा आहे. अनेक गावांमध्ये असे उचापतखोर लोक असतात. स्थानिक राजकारण्यांशी संबंध ठेवून आपले ईप्सित साध्य करण्यात ते तरबेज बनले आहेत.

या प्रकरणात सरकारची प्रतिष्ठा धोक्यात आली असल्याने या बोरकरच्या मुस्क्या आवळल्या जाणार काय? याची चर्चा सध्या बोरीत चालू आहे.

खाण लिलाव प्रक्रिया धीम्यागतीने

राज्यातील खनिज खाणी सुरू होण्याची सध्या खाण अवलंबित चातकाप्रमाणे वाट पाहात आहेत, पण अजून खाणी सुरू होण्याची चिन्हे काही दिसत नाहीत. सध्या खाण खात्याने लिलावाची प्रक्रिया सुरू केल्याचे म्हटले आहे, पण ही प्रक्रिया एवढी धीम्यागतीने सुरू आहे.

त्यामुळे हे काम कधी संपेल याचा काही भरवसा नाही, अशा प्रतिक्रिया खाण अवलंबितांकडून व्यक्त होत आहेत. सध्या तर खाणींचा विषय काढला की मुख्यमंत्री लगेच म्हणतात आत्ता सुरू होतील खाणी, पण या खाणी कधी सुरू होतील, हे खुद्द मुख्यमंत्र्यांनाच माहीत नाही ही त्यातील गोम आहे.

प्रकाश म्हणतात, पुढचा मुख्यमंत्री एसटीचा!

‘शिता फुडें मीठ खावप’ अशी कोकणीत एक म्हण आहे. आपले काही प्रकाशझोतात नसलेले राजकारणी हातात माईक आला व पुढे लोक दिसले की काहीही बोलतात. उटा म्हणजे युनायटेड ट्रायबल्स असोसिएशन अलायन्स या अनुसूचित जमातीच्या संघटनेने या समाजाचे विचारवंत बिरसा मुंडा यांची जयंती साजरी केली.

यावेळी समाजाचे नेते माजी मंत्री व भाजपचे ज्येष्ठ नेते प्रकाश वेळीप यांनी एक विधान केले, ज्याला उपस्थित समाजातील लोकांनी दादही दिली. प्रकाश म्हणाले, की जर अनुसूचित जमातीतील ख्रिस्ती व हिंदू एसटी समाज एकत्र आला, तर 2027 मध्ये गोव्याचा मुख्यमंत्री ख्रिस्ती होण्यापासून कोणीही अडवू शकणार नाही.

प्रकाश सरांच्या या विधानाला गोविंद गावडे, उदय गावकर यांच्या बरोबर अनेकांनी दाद दिली. मात्र, हिंदू व ख्रिस्ती एसटीला एकत्र आणण्यापूर्वी प्रकाश सरांनी गोविंद गावडे व रमेश तवडकरांना एकत्र आणावे व उदयने उटावर जे लिहिले आहे त्यावर चर्चा करावी आणि नंतरच एसटी चा मुख्यमंत्री बनविण्याची स्वप्ने पाहावीत असे आम्ही नव्हे समाज माध्यमांवर एसटी समाजाचे युवकच विचारीत आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Loksabha Election 2024 : दोन्‍ही जागा ‘इंडिया’च जिंकणार! विरियातो फर्नांडिस

Siolim News : देशाच्या अधोगतीस काँग्रेस जबाबदार : मुख्यमंत्री प्रमोद सावंत

Goa News : राज्यात ७० टक्क्यांहून अधिक मतदान अपेक्षित! सदानंद शेट तानावडे

Crime News : काणकोणात बारचालकाचा संशयास्पद मृत्यू; मृतदेहाजवळ गावठी बॉम्ब, काडतुसेही सापडल्याने तर्कवितर्क

Santhacruz Health Centre : सांताक्रुझ येथील शहरी आरोग्य केंद्रात औषधांचा तुटवडा; रुग्णांना मारावे लागतात हेलपाटे

SCROLL FOR NEXT