पणजी: गोव्याच्या मिठागरांत पसरलेली शुभ्र पांढरी चादर म्हणजे केवळ मीठ नव्हे, तर शतकानुशतकांची परंपरा, घामाचा गंध आणि किनारी संस्कृतीचे अजरामर प्रतीक आहे. आता या परंपरेला भौगोलिक दर्शक या राष्ट्रीय शिक्क्याची दारे खुली झाली आहेत.
जीआय टॅग म्हणजे केवळ उत्पादनाला शिक्का नाही, तर गोव्याच्या परंपरेला नवीन आयुष्य, मिठागर चालवणाऱ्यांना रोजगार आणि आरोग्याला नवा आत्मविश्वास आहे. गोव्याचे मीठ आता खारट नाही, तर गोड अभिमानाची चव घेऊन येत आहे.
विज्ञान व तंत्रज्ञान परिषदेतील समन्वयक अधिकाही दीपक परब यांनी दिलेल्या माहितीनुसार, आगरवाडा, रायबंदर, बेती, नेवरा, शिरदोण, कुडका, नुवे, राय, लोटली, वेळसाव, सांकवाळ, कुठ्ठाळी, साल्वादोर द मुंद, सुकूर, मयडे, हळदोणे येथे मीठ उत्पादन केले जायचे. आता बहुतांश ठिकाणी मिठागरे बंद पडत चालली आहेत. जीआय मानांकन म्हणजे भौगोलिक दर्शक शिक्का मिठाला मिळाला तर ही पारंपरिक मिठागरे वाचवण्याच्या प्रयत्नांना बळ मिळेल असे चित्र निर्माण झाले आहे.
जीआय टॅग म्हणजे
ओळखीचा शिक्का
जगातल्या प्रत्येक प्रदेशाची स्वतःची एक खासियत असते – मग ती दार्जिलिंगची चहा असो वा कोल्हापुरी चप्पल. हाच ठसा ओळखतो जीआय टॅग. हा शिक्का मिळाल्यावर उत्पादन केवळ त्या प्रदेशाशीच बांधले जाते, त्याची नक्कल होऊ शकत नाही आणि त्याच्या दर्जाला कायदेशीर मान्यता मिळते. आता गोव्याच्या मिठालाही अशीच ओळख मिळण्याची वेळ आली आहे.
आरोग्यदायी मिठाकडे वाटचाल
आजच्या काळात सूक्ष्म प्लास्टिक व पाण्यातील अशुद्धतेमुळे मिठाचे शुद्धीकरण ही एक आव्हानात्मक बाब आहे. शासनाने योग्य तंत्रज्ञान वापरून मिठागरातील पाणी गाळून शुद्ध करण्याची पावले उचलल्यास स्थानिक मीठ पुन्हा एकदा आरोग्यदायी आणि विश्वासार्ह पर्याय ठरेल. गोव्याचा नागरिक आपल्या थाळीत पुन्हा आपलेच मीठ पाहील, हेच खरे यश ठरेल.
गोव्याच्या हस्तकलेलाही मान
गोव्याची तांबे-पितळेची कलाकुसर असलेला लामणदिवा, मोराच्या नृत्याची आकृती व फुलांच्या नक्षीदार समया यांनाही जीआय टॅग मिळवण्यासाठी अर्ज करण्यात आले आहेत. यामुळे गोव्याची कलात्मक ओळख राष्ट्रीय पातळीवर उजळून निघेल.
मिठागर - खारफुटीच्या कुशीतले रत्न
गोव्याचे मिठागरे खाड्यांच्या किनारी, खारफुटीच्या झाडांनी वेढलेल्या कुशीत वसलेली आहेत. समुद्राच्या लाटांसोबत येणारी खनिजमिश्रित हवा, सूर्याच्या तापाने उकळणारे खारे पाणी आणि मिठागरकरींच्या श्रमाचे दाणे – यांतून जन्मतो गोवा आगराचा मीठ. या मिठात नैसर्गिक खनिजे आणि पोषक घटक भरलेले असल्याचा संशोधकांचा अंदाज आहे, जे आरोग्यासाठीही उपयुक्त ठरू शकतात.
परंपरेच्या संवर्धनाची गरज
काळाच्या ओघात अनेक मिठागरे ओस पडत आहेत. एकेकाळी गावोगावी ऐकू येणारे मिठागरातील कामाचे सूर आता विरळ झाले आहेत. परंतु जीआय टॅगमुळे स्थानिकांना नवा आत्मविश्वास मिळणार आहे. उत्पादनाला नवी बाजारपेठ लाभेल आणि पारंपरिक मिठागर जपले जातील.
मिठागर म्हणजे फक्त मीठाचे खड्डे नाहीत; ते पक्ष्यांचे थवे, माशांच्या प्रजोत्पत्तीची ठिकाणे, खारफुटीच्या जंगलांची शेजारी मैत्री – अशा संपूर्ण परिसंस्थेचे आश्रयस्थान आहेत. मिठागर वाचले तर गोव्याची किनारी जैवविविधता सुरक्षित राहील. जीआय टॅगमुळे ही जपणूक अधिक सुदृढ होईल.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.