पणजी: राजभवनाचे नवे दरबार सभागृह मंत्री शपथविधीच्या निमित्ताने खचाखच भरले असले तरी त्यात मूळ भाजप कार्यकर्त्यांची अनुपस्थिती ठळकपणे जाणवली. मंत्री दिगंबर कामत व रमेश तवडकर यांंना मानणारा मोठा वर्ग राज्यभरात आहे.
त्याचे दर्शन यानिमित्ताने झाले. तरीही शपथविधी सोहळ्यावर भाजपची नव्हे तर या दोन्ही नेत्यांची छाप होती. नवा दरबार सभागृह वापरात आल्यापासूनचा आजचा कार्यक्रम हा गर्दीचा उच्चांक मोडणारा ठरला.
राजभवनातील पार्किंग व्यवस्था अपुरी पडल्याने राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्थेकडून राजभवनाकडे जाणाऱ्या रस्त्याच्या एका बाजूला गाड्या पार्क कराव्या लागल्या. ब्रिटीश दफनभूमीकडे जाणाऱ्या रस्त्याचा वापरही पार्किंगसाठी करण्यात आला.
सभागृहातही वेगळे चित्र नव्हते. अधिकारी, आमदार यांच्यासाठी आरक्षित आसनांवर अनेकांनी कब्जा केला होता. ग्रामीण भागातून पहिल्यांदाच राजभवनात पाय ठेवणाऱ्यांची संख्या बऱ्यापैकी होती. कामत यांचा सर्व क्षेत्रात लोकसंग्रह आहे. त्यांना शुभेच्छा देण्यासाठी अनेक क्षेत्रातील मान्यवर वाट वाकडी करून राजभवनात पोचले होते.
शपथविधी सोहळा झाल्यानंतर पुढील तासभर दोन्ही मंत्र्यांना मंचावरच शुभेच्छा स्वीकारत थांबावे लागले यावरून गर्दीची कल्पना येऊ शकते. या गर्दीमुळे सभागृहाबाहेर केलेली चहापानाची व्यवस्थाही कोलमडून पडली तेथे मोठी रांग लागली. काहींनी चहापानासाठी अर्धातास वाट पहावी लागेल हे पाहून तेथून काढता पाय घेणे पसंत केले.
राज्यपालपदी पुसापती अशोक गजपती राजू हे आल्यानंतरचा हा पहिला शपथविधी सोहळा होता. राजभवनाचे सचिव अर्जुन मोहन हेही नवे. तरीही त्यांनी या सोहळ्याचे नेटके आयोजन केल्याचे दिसून आले. शेवटी नव्या मंत्र्यांसह राज्यपाल व मुख्यमंत्र्यांचे छायाचित्र टिपताना तवडकर यांच्या चेहऱ्यासमोर दोन मायक्रोफोन येत होते. ते त्यांनाच दूर करावे लागले, हा प्रसंग सोडला तर इतर ठिकाणी आयोजनात नाव ठेवण्यासारखे काही नव्हते.
धेंपे उद्योग समूहाचे अध्यक्ष श्रीनिवास धेंपे हे पत्नी पल्लवी यांच्यासह शपथविधी सोहळ्यास उपस्थित होते. दिगंबर कामत यांना शुभेच्छा देण्यासाठी ते आले होते. कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी ते कामत यांच्याच मागे दुसऱ्या रांगेत बसले होते. डॉ. दिव्या या आल्यावर काहीवेळ पल्लवी यांच्यासोबतच्या आसनावर बसल्या पण पहिल्या रांगेतील रमेश तवडकर मंचावर गेल्यावर त्या विश्वजीत यांच्या बाजूच्या आसनावर बसल्या. बराचवेळ श्रीनिवास व विश्वजीत बोलत बसले होते.
आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांचे सभागृहात पत्नी आमदार डॉ. दिव्या यांच्यासह आगमन झाले. ते तडक सभागृहाच्या पहिल्या रांगेत आले. त्यांनी पाहिले की त्याचवेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष दामू नाईक हे तिसऱ्या रांगेत बसलेले भाजपचे प्रदेश खजिनदार संजीव देसाई यांच्याकडे जात आहेत. विश्वजीत तातडीने तिथे गेले व त्यांच्याशी हस्तांदोलन केले. ते बोलत पहिल्या रांगेत आले आणि तिथेच स्थानापन्न झाले. दामू हेही पहिल्या रांगेत विराजमान झाले.
सभागृहाच्या पायऱ्यांवर पाय ठेवल्यापासून पहिल्या रांगेपर्यंत पोचण्यासाठी एरव्ही ३० सेकंदांचाही वेळ लागणार नाही. दिगंबर कामत यांनी हस्तांदोलन करत पुढे जाणे पसंत केल्याने त्यांना यासाठी तब्बल चार मिनिटे लागली. ते सभागृहात आल्यावर तेव्हापासून ते बसलेल्या ठिकाणी जाऊन त्यांचे अभिनंदन करण्यासाठीही अनेकांनी धाव घेतली होती. त्यामुळे त्यांना बराच वेळ उभे रहावे लागले.
रमेश तवडकर हेही पहिल्या रांगेत होते. त्यांचे चाहते येऊन त्यांच्यासोबत छायाचित्र टिपत होते. त्यामुळे त्यांनाही उभे रहावे लागले. शपथविधी झाल्यानंतर मंत्री माविन गुदिन्हो, विश्वजित राणे आदींनीही त्यांच्यासोबत छायाचित्रे टिपली. तवडकर यांना छायाचित्रांसाठी मोठी मागणी असल्याचे दिसून आले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.