मोरजी: पेडणे तालुक्यातील एकूण २० ग्रामपंचायती आणि एक नगरपालिका असलेल्या क्षेत्रामध्ये अवकाळी पावसाने जोरदार सुरुवात केल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. त्यात मान्सूनपूर्व कामे वेळेवर केली नसल्याने गटार व्यवस्थेचे तीनतेरा वाजल्याचे दिसून आले.
कासारवर्णे पंचायत क्षेत्रातील गटार न उपसल्यामुळे पाणी सध्या रस्त्यावरून वाहत आहे. या भागातील बसथांब्यांच्या ठिकाणी रस्त्यावरून ढोपरभर पाणी साचले आहे. पेडणे तालुक्यात गटार व्यवस्था कोलमडल्याचे चित्र दिसून येते. काही ठिकाणी रस्ते रुंद करत असताना गटार व्यवस्था नाहीशी केलेली आहे. काही गटारांमध्ये रस्त्याचे नव्हे तर घरांचे, हॉटेलांचे सांडपाणी सोडण्याचा प्रकार मोठ्या प्रमाणात घडत आहे.
पेडणे बाजारपेठेत गटारामध्ये सांडपाण्याचे अनेक पाईप दिसतात. याकडे पेडणे पालिकेने अजूनपर्यंत लक्ष दिलेले नाही. घरातील सांडपाणी, घाण पाणी यासाठी एखादी जागा उपलब्ध करून दिली नसल्याने घरमालक, हॉटेल व्यावसायिक थेट आपले सांडपाणी गटारांमध्ये पाईपद्वारे सोडत असल्याचे चित्र दिसते.
पेडणे पालिकेच्या मासळी मार्केटमध्ये सध्या मोठ्या प्रमाणात पाणी भरत असून या मार्केटमध्ये मासे विक्रेत्यांनाही नीटपणे बसता येत नाही. यावर पालिका मंडळही उपायोजना करत नाही. या मासळी मार्केट बाजार व्यापाऱ्यांमुळे वर्षाला लाखो रुपये महसूल मिळत असतो; परंतु या बाजारपेठेतील व्यापारांच्या समस्या, त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी पालिका मंडळाला वेळ नाही. त्यामुळे नागरिक नाराजी व्यक्त करतात.
हनाटीवाडा-धारगळ येथील रस्त्यावर गेले तीन-चार दिवस पडत असलेल्या मुसळधार पावसाचे पाणी साचून राहिल्यामुळे येथील नागरिकांना खूप समस्यांना सामोरे जावे लागत आहे. या रस्त्याच्या बाजूला असलेली गटारे बंद असल्यामुळे हे पाणी साचत असल्याचे येथील समाजकार्यकर्ते सिद्धार्थ कानुळकर यांनी सांगितले. मोपा विमातळकडे जाणाऱ्या जुन्या रस्त्याला लागूनच हा रस्ता आहे. तरी याकडे कुणीही लक्ष देत नसल्यामुळे येथील ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली आहे. धारगळ ग्रामपंचायतीने त्वरित येथील गटारे उपसून पाण्याला वाट करून द्यावी, अशी मागणी येथील स्थानिक नागरिकांनी केली आहे.
अवकाळी पावसाने रगाडा नदी प्रवाहित झाली आहे. त्यामुळे मधलावाडा-साकोर्डा रगाडा नदीवर बांधण्यात येणाऱ्या पुलाच्या बांधकामात अडथळे आले आहेत. नदीला अचानक आलेल्या पाण्यामुळे वाहतुकीसाठी केलेला पर्यायी सर्व्हिस रोड पाण्याखाली गेल्याने या मार्गावरीव वाहतूक बंद करण्यात आली आहे.''त्यामुळे वाहन चालकांची प्रचंड गैरसोय झाली आहे. वाळपई- मोले या मार्गावरील वाहतूक बोळकर्णे-देऊळमळमार्गे वळविण्यात आली आहे. परिसरातील पादऱ्यांना पुलावरुन ये-जा करण्यासाठी पुलाच्या दोन्ही बाजूनी शिडी लावून तात्पुरती सोय केली आहे.
गेल्या आठवड्यापासून पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे सांगे परिसरातील शेतीबागायतीचे अतोनात नुकसान झाले असून कुरपे, भाटी, विलियण व काले भागातील शेतकऱ्यांना याचा जबरदस्त फटका बसल्याची माहिती सांगे येथील विभागीय कृषी अधिकारी अग्रेश शिरोडकर यांनी दिली. या भागातील शेतकऱ्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार आपण या भागाची नुकतीच पाहणी केली असून साधारण पाच ते सहा हेक्टर जमिनीतील शेतीचे शंभर टक्के नुकसान झाले असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, नेत्रावळी पंचायत क्षेत्रातील शेतकऱ्यांनी वेळीच आपले उभे पीक कापल्याने त्यांना नुकसानीपासून संरक्षण मिळाल्याची माहितीही त्यांनी दिली.
कुडचडेचे अग्निशमन दल पडझड हटविण्यासाठी इतरत्र गेल्यामुळे सांगे ते नेत्रावळी रस्ता वाहतुकीस मोकळा व्हावा म्हणून रात्री १० वा. पाजीमळ येथे पडलेले झाड सलग तीन तास प्रयत्न करून स्थानिक रहिवासी, पोलिस कर्मचारी, वीज कर्मचारी, स्थानिक नगरसेवक मेश्यू डिकॉस्ता व इतर नागरिकांनी रातोरात हटवून रस्ता वाहतुकीस मोकळा केला.
पाजीमळ-सांगे येथील मुख्य रस्त्यावर रात्री १० वा.च्या सुमारास आकाशियाचे मोठे झाड पडल्याने वाहतूक बंद झाली. अग्निशमन दलाला संपर्क साधल्यास ते इतर ठिकाणी कार्यरत असल्यामुळे स्थानिक नगरसेवक मेश्यू डिकॉस्ता यांनी स्वतः पुढाकार घेऊन झाड हटविले. याकामी सांगे पोलिस स्थानकाचे उपनिरीक्षक प्रेमानंद नाईक, सांगे वीज कर्मचारी, ग्रामस्थ लक्ष्मण नाईक, धीरज कर्पे, फ्रान्सिक परेरा, न्यूटन फर्नांडिस, फ्रँकी, कुडचडे अग्निशमन दल यांनी सहकार्य केले.
पावसामुळे मडगावात कित्येक ठिकाणी पाणी साचून राहाण्याच्या घटना दिसून आल्या असून मडगावच्या जिल्हा इस्पितळाच्या प्रवेशद्वारावरही मोठ्या प्रमाणावर पाणी साचून राहिल्याने त्या ठिकाणाला तळ्याचे स्वरूप आले होते. प्रवेशद्वारातच गुडघाभर पाणी साचून राहिल्याने त्या पाण्यातून वाहने नेण्याची सर्कस वाहनचालकांना करावी लागत होती.
गेले तीन दिवस राज्यात पडणाऱ्या मान्सूनपूर्व पावसामुळे मोठ्या प्रमाणात झाडांची पडझड तसेच अनेक ठिकाणी पाणी साचण्याच्या घटना घडल्या. या तसेच इतर प्रकारांसंदर्भात अग्निशमन दलाचा नियंत्रण कक्ष तसेच विविध स्थानकांना आलेल्या ३२५ कॉल्सची नोंद झाली आहे, तर १९ लाखांचे नुकसान झाले आहे.
गेल्या तीन दिवसांत झालेल्या पडझडीमुळे अनेक वाहनांचे नुकसान झाले. अनेक दुचाकी व कारचे झाडे पडल्याने नुकसान झाले. या घटनांमध्ये सुमारे १९ लाखांचे नुकसान झाले आहे.
२८६ कॉल्स हे ठिकठिकाणी झाडे मोडून किंवा उन्मळून तसेच फांद्या पडून झालेल्या नुकसानीचे आहेत. मडगावात गेल्या तीन दिवसांत सर्वाधिक ३१ कॉल्सची नोंद झाली. अग्निशमन दलाच्या जवानांनी रात्रंदिवस रस्त्यावरील अडथळे तसेच घरावर पडलेली झाडे हटविण्याचे काम केले.
राज्यात २० मेपासून मान्सूनपूर्व पावसाळा सुरुवात झाली. यादिवशी सकाळी ७ ते २१ मे सकाळी ७ वाजेपर्यंत ९२ कॉल्स झाले. त्यापैकी ६६ हे झाडांच्या पडझडीसंदर्भात होते. पणजीत सर्वाधिक १० कॉल्स आले. त्यापाठोपाठ मडगाव (९) आणि कुडचडे (७) यांची नोंद झाली. इतर भागांत सरासरी ३ ते ५ कॉल्स नोंदवले आहेत.
२१ मे ते २२ मे या २४ तासांत ९१ कॉल्सची नोंद झाली. त्यापैकी ८३ कॉल्स पडलेली झाडे व साचलेल्या पाण्यासंदर्भात होते. सर्वाधिक ९ कॉल्स मडगावातील होते, तर त्याच्या मागोमाग म्हापसा (८) व काणकोण (७) यांचा समावेश आहे. इतर भागांत सरासरी २ ते ४ कॉल्सची नोंद झाली.
२२ मे सकाळी ७ ते २३ मे सकाळी ७ वाजेपर्यंत १०७ कॉल्सची नोंद झाली. त्यापैकी १०३ कॉल्स हे पडझडीचे होते. मडगावात सर्वाधिक (१३) तर त्यापाठोपाठ फोंडा (११) व काणकोण (१०) भागात कॉल्स नोंद झाले. इतर भागांत सरासरी २ ते ५ कॉल्सची नोंद झाली.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.