पणजी: राज्यात मागील दोन-तीन दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे. गुरुवारी त्याने आणखी जोर धरला. त्यामुळे अनेक ठिकाणी पडझडीच्या घटना घडल्या. रस्त्यावर पाणी साचणे, वाहतुकीला अडथळा निर्माण होणे असेही प्रकार घडले. ग्रामीण भागात वीजपुरवठा खंडित झाल्याने लोकांची गैरसोय झाली.
बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने पुढील काही दिवसांत पावसाची तीव्रता कायम राहण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. मागील २४ तासांत राज्यात सरासरी १.४१ इंच पावसाची नोंद झाली. आतापर्यंत राज्यात एकूण २७.५१ इंच पाऊस पडला आहे. अपेक्षित ३८.९३ इंचांच्या तुलनेत २९.४ टक्के तूट अद्याप कायम आहे.
राजधानी पणजी ‘स्मार्ट सिटी’तील रस्ते पाण्याखाली गेले. काही ठिकाणी तर रस्ता कुठे आहे, हे कळणे कठीण झाले. पाटो परिसरात वारंवार पाणी साचण्याची समस्या गंभीर बनली आहे. आरबीआय इमारतीच्या बांधकामस्थळावरून पंपाद्वारे पाणी बाहेर सोडले जात असल्याने परिसरात पाणी साचण्याची स्थिती निर्माण झाली.
या भागात सरकारी तसेच खासगी कार्यालये असल्याने मोठ्या प्रमाणात वाहतूक असते. मात्र पावसामुळे वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागली. ग्रामीण भागात मोठी पडझड झाली. झाडे वीजवाहिन्यांवर कोसळल्याने वीजपुरवठा खंडित झाला.
कुठे, काय घडले?
पर्वरी गोवा क्रिकेट असोसिएशनच्या क्रीडांगणाकडे जाणाऱ्या रस्त्यावर गुडघाभर पाणी.
पणजीहून म्हापशाला जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर गिरी येथे पाणी साचल्याने वाहतूक कोंडी.
म्हावळिंगे येथील हरिजनवाड्याजवळील घरावर कोसळले आंब्याचे झाड.
गोठणवाडा-सालेली येथे घरावर झुकलेले धोकादायक काजूचे झाड हटविले.
पिसुर्ले पंचायतीजवळ, तिस्क-उसगाव येथील गोवा स्टेट बँकेजवळ झाडे कोसळली.
सापेंद्र येथे प्राथमिक शाळेजवळ वीजवाहिन्यांवर कोसळले झाड.
अग्निशमन दलाला ५१ कॉल्स
मागील २४ तासांत अग्निशमन दलाला एकूण ५१ कॉल्स आले. त्यामध्ये आगीशी संबंधित १, आपत्कालीन स्थितीचे ४ आणि हवामान व पावसाशी संबंधित ४६ कॉल्सचा समावेश होता. या घटनांमध्ये सुमारे ९ लाख रुपयांचे नुकसान झाले, तर २० लाख ६५ हजार रुपयांची मालमत्ता वाचविण्यात अग्निशमन दलाला यश आले.
सांगेत सर्वाधिक ३.९४ इंच कोसळला
मागील २४ तासांत राज्यात सर्वाधिक पाऊस सांगे येथे ३.९४ इंच नोंदविण्यात आला. त्यानंतर फोंडा (२.७८), वाळपई (१.८६), काणकोण (१.७७), धारबांदोडा (१.६६), साखळी (१.५८), म्हापसा (१.२७), दाबोळी (१), केपे (०.७९), मडगाव (०.७८), जुने गोवे (०.७७) व मुरगावात ०.४५ इंच पाऊस पडला.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.