प्रदेशाध्यक्षपदाच्या शर्यतीत आपण नसल्याचा निर्वाळा सदानंद शेट तानावडे यांनी दिला आहे. यापूर्वी काही मंत्री आणि आमदारांनी प्रदेशाध्यक्षपदी तानावडेच हवेत. ते सर्वांना बरोबर घेऊन जात आहेत, अशी मल्लिनाथी केल्याने तानावडे यांचे नाव प्रदेशाध्यक्षपदाच्या शर्यतीत असल्याचा गैरसमज होण्यास वेळ लागला नाही. आता मात्र तानावडे यांनी नव्यांना संधी मिळाली पाहिजे, त्यांना कर्तृत्व सिद्ध करता आले पाहिजे असे सांगत या पदाच्या शर्यतीत नसल्याचे सांगितल्याने आता सातपैकी कोणाचे नाव केंद्रातून जाहीर होणार आहे, याकडे सातहीजणांचे डोळे लागलेले असणार आहेत. या शर्यतीत माजी आमदार दामू नाईक, दयानंद मांद्रेकर, दिलीप परुळेकर, दयानंद सोपटे, बाबू कवळेकर, नरेंद्र सावईकर आणि गोविंद पर्वतकर हे सातजण आहेत. काहीजणांनी म्हापशाला जाऊन श्री बोडगेश्वराचे दर्शन घेऊन कदाचित गाऱ्हाणे गायिलेही असेल. त्यामुळे देव कोणाला पावतोय, हे पहावे लागेल. ∙∙∙
पर्यटकांना नजरेसमोर ठेवून महोत्सव होणे आवश्यक आहे. स्थानिकांमध्ये त्याचे जास्त अप्रूप राहत नाही. एखाद्या महोत्सवाला गेले नाही म्हणून काही बिघडत नाही. परंतु गोव्यात आलेल्या पर्यटकांना त्या-त्या महिन्यात होणाऱ्या महोत्सवांची माहिती उपलब्ध करून दिल्यास, त्याचे नियोजन ते करू शकतात. दरवर्षीप्रमाणे कांपाल येथे ‘मेगा फिश फेस्टिव्हल’ होत असतो, त्याचे अप्रूप अधिकतर लहान मुलांना असते. परंतु खास करून पर्यटकांना या महोत्सवाकडे वळविण्याचे कौशल्य खात्याला करावे लागेल. परंतु असे महोत्सव करताना पर्यटकांसाठी इतर ठिकाणांपेक्षा या ठिकाणी मासळीचे विविध पदार्थ, वेगवेगळी मासळी त्यांच्यासाठी ती हॉटेलपेक्षाही स्वस्तात उपलब्ध करून द्यायला हवी. दररोज राज्यात शेकडो टन मासळी जेटींवर येते, त्यामुळे ही मासळी खाद्यपदार्थांच्या माध्यमातून उपलब्ध झाली, तर असे महोत्सव पर्यटकांच्या पसंतीस पडू शकतात. त्यामुळे खात्याने यापुढे याचा विचार करण्यास काही हरकत नाही. ∙∙∙
‘स्मार्ट’ पणजीतील डॉन बॉस्को हायस्कूल नजीक असलेली वाहतूक सिग्नल यंत्रणा रविवारी सायंकाळी ओव्हर ‘स्मार्ट’ बनली. एकाचवेळी हिरवा व लाल दिवा पेटू लागल्याने वाहनचालक मात्र गांगरले. एक तर कोणतीही कल्पना न देता रस्ते जागोजागी खोदले आहेत, त्यात वाहतूक पोलिस तालांव देत आहेत. हा गैरशिस्तीचा ‘सिग्नल’ नव्हे का?
राजकीय पटलावर काही मंत्र्यांना डिच्चू देऊन नव्या दमाच्या आमदारांच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ घालण्यात येणार अशा बातम्या अनंक दिवसांपासून झळकत आहेत. मात्र, मुख्यमंत्री आपण त्या गावचेच नाहीत असे भासवून मंत्रिमंडळात बदल आता नाही असे सांगून वेळ मारून नेत आहेत. प्रदेशाध्यक्ष पदासाठी सात नावे पुढे आली. मात्र, जुने ते सोने म्हणत प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांचीच वर्णी लावण्याचे घाटत आहे. मात्र, कोणाला डिच्चू देऊन कोणाच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडणार आणि मंत्रिमंडळातील कोणावर संक्रांत येणार हे गुलदस्त्यातच आहे. त्यामुळे भाजप कार्यकर्त्यांत उत्सुकता आहे. पौष महिना चंद्रग्रहण किंवा सुर्यग्रहणामुळे अशुभ मानला जातो. मात्र, चांगल्या कामासाठी हा महिना शुभ मानला जातो. प्रकाशाची आराधना करण्याचा हा महिना आहे. त्यामुळे भाजपला या महिन्यात नव्या प्रकाशाची वाट सापडेल अशी आशा काही श्रद्धाळू कार्यकर्ते व्यक्त करू लागले आहेत. ∙∙∙
कला अकादमीची ‘अ’ गट राज्यस्तरीय नाट्य स्पर्धा पणजी येथील मास्टर दीनानाथ मंगेशकर नाट्यगृहात जोशात चालू आहे. या नाट्यगृहात प्रकाश योजनेसाठी जी सामग्री वापरण्यात आली आहे, ती रवींद्र भवन, राजीव गांधी कला मंदिर इत्यादींकडून उसनवारी करून घेतली आहे असे जरी कला अकादमीने सांगितले असले तरी ते अर्धवट सत्य आहे. स्वतःचे तोंड वाचवण्यासाठी त्यांना तसे करावे लागले. खरी गोष्ट ही आहे की उपरोल्लेखित नाट्यगृहातून मागवण्यात आलेल्या दिव्यांची संख्या अपुरी असल्याने खासगी कंत्राटदाराकडूनसुद्धा दिवे मागवले गेले आहेत. नूतनीकरणात घोळ केलेल्या कला अकादमीला अशी खऱ्याखोट्याची कसरत का करावी लागते? ‘पडलो तरी नाक वर’ हीच प्रवृत्ती त्याला कारणीभूत नाही ना? ∙∙∙
सांगे मतदारसंघातील विकास प्रकल्प का रखडले? यावर आता सांगेत चर्चा रंगायला लागली आहे. प्रकल्प अपूर्ण राहण्यामागे मुख्यमंत्र्यांनी शंभर कारणे सांगितली. मुख्यमंत्री म्हणतात, की पूर्वीच्या टर्म मध्ये सुभाष फळदेसाई यांना जनतेने पराभूत केले म्हणून विकासकामे रखडली. विकासकामे राखण्यात जमीन संपादन, वन खात्याचे कायदे असे अनेक विषय जबाबदार असल्याचे मुख्यमंत्री सांगतात. मात्र, आपले सरकार असताना आपला आमदार असताना सांगेच्या पुलाचे काम का रखडले? काजू गोटो रस्त्याचे काम सुरू करण्यास वेळ का लागला? पंचायत प्रकल्पाचे काम का अडले? मुख्यमंत्री साहेब याला कोण जबाबदार? असे आम्ही नव्हे सांगेची जनता विचारीत आहे. ∙∙∙
काँग्रेस पक्ष नेहमीच गोवा मुक्ती लढा, जनमत कौल, घटक राज्य तसेच कोकणी राजभाषेसाठी योगदान दिल्याचा दावा करतो. काँग्रेसचे नेते पंडित नेहरू, इंदिरा गांधी व राजीव गांधींच्या गोव्यासाठी दिलेल्या योगदानाची संधी मिळेल तेव्हा आठवण करून देतात. याला अपवाद ठरलाय तो काँग्रेस पक्षाने सांतआंद्रे मतदारसंघात आयोजित केलेला ‘ओपिनियन पोल डे’. गोव्यात जनमत कौल १६ जानेवारी १९६७ रोजी झाला होता, परंतु काँग्रेसच्या नेतृत्वाला कदाचित याचा विसर पडला असावा. गोवा प्रभारी अंजलीताई, प्रदेशाध्यक्ष अमितराव, आमदार कार्लुसबाब तसेच गिरीशरावांची उपस्थिती असणाऱ्या या कार्यक्रमाचे आयोजन १४ जानेवारीला करून काँग्रेस नेतृत्वाने एका नव्या वादाला तोंड फोडलेय हे मात्र नक्की. ∙∙∙
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.