मडगाव नगरसेवक कार्निव्हल मूडमध्ये
मडगावात येत्या रविवारी कार्निव्हल मिरवणूक होणार आहे. या पालिकेची मुदत आता लवकरच संपणार असून, अनेक नगरसेवकांसाठी हा शेवटचा कार्निव्हल ठरू शकतो.त्यामुळे कदाचित असावे. पालिकेचे बहुतांश सध्या कार्निव्हल मूडमध्ये आहेत. अनेकांना आपल्या भवितव्याविषयी चाहूल लागली आहे. सार्वजनिक बांधकाम मंत्री दिगंबर कामत यांनी मडगाव पालिकेच्या पुढील निवडणुकीत ‘मेरिट’ बघून आम्ही उमेदवारी देऊ, असे स्पष्ट संकेत यापूर्वीच दिल्याने बाबाच्या गटातील अनेक नगरसेवकांचे धाबे दणाणले आहे. उमेदवारी मिळू यासाठी हे नगरसेवक देव पाण्यात बुडवून बसले आहेत.
कुंकळ्ळीत सुरू झालाय वेगळाच शिगमा!
शिगम्याला अजून काही दिवस बाकी आहेत. मात्र, कुंकळळीत वेगळाच शिगमा सुरू झाला आहे. सरकारच्या पर्यटन खात्यातर्फे आयोजित करण्यात येत असलेल्या शिमगोत्सवावरून कुंकळ्ळीत वाद सुरू झाला आहे. कुंकळ्ळी नगरपालिका मंडळाने उदेश देसाई यांची शिमगोत्सव समितीच्या अध्यक्षपदी निवड केली होती म्हणे. मात्र, आमदार युरी आलेमाव यांनी उदेश देसाई यांच्या नावाला विरोध केल्यामुळे पालिकेला विश्वासात न घेता नवीन समिती निवडल्यावरून वादाला सुरवात झाली. शोमगोत्सव समितीचा हा वाद शिगेला पोहोचला असून नगरसेवक उदेश देसाई यांनी पूर्वीच्या समितीवर गंभीर आरोप केले आहे. पालिकेच्या बैठकीत असताना नव्याने निवडलेल्या समितीच्या सदस्यांना उदेश देसाई यांच्यावर हल्ला केल्याचा आरोप नगरसेवक देसाई यांनी केला आहे. शिगमा सुरू होण्यापूर्वीच कुंकळ्ळीत नवाच शिगमा सुरू झाला आहे.
राधारावांचे दोन गोवा!
राधाराव ग्रासियस यांनी नेहमीच गोव्यात ख्रिस्ती लोकांना दुय्यम वागणूक दिली जात आहे, असा आरोप केला आहे. गोवा हिंदू आणि ख्रिस्ती या दोन धर्मामध्ये वाटला गेला आहे, असे ते नेहमीच म्हणतात. दोन दिवसांपूर्वी माजी सभापती तोमाझिन कार्दोझ यांच्या पुस्तक प्रकाशनावेळी बोलताना त्यांनी हा मुद्दा पुन्हा उपस्थित केला. सगळे गोंयकार एक तर गोवा महाराष्ट्रात विलीन करण्याची मागणी झालीच, कशी असा सवाल त्यांनी केला. त्याशिवाय हिंदूचे धार्मिक आणि सांस्कृतिक साहित्य मराठीत असल्यामुळे जर राजभाषा कायद्यात मराठीला सहभाषेचा दर्जा मिळतो, तर ख्रिस्ती लोकांचे धार्मिक आणि सांस्कृतिक साहित्य रोमी कोकणी भाषेत असूनही रोमीला मराठी सारखा सहभाषेचा दर्जा का मिळत नाही? हा त्यांचा सवाल आहे. यावर मराठी गोटातील प्रतिक्रिया काय असतील बरे!
विनयभाई सावर्डेत सक्रिय
सध्या मीराबाग सावर्डे येथे येणाऱ्या बंधाऱ्याला विरोध करण्यासाठी स्थानिकांनी आंदोलन सुरू केले असून दोन दिवसांपूर्वी माजी राज्यसभा खासदार विनय तेंडुलकर यांनी या आंदोलकांना भेट देऊन आपला पाठिंबा त्यांना दाखविला. ग्रामस्थांच्या भावना मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या कानावर घालण्याचे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले. यापूर्वी दूधसागर धबधब्यावर गाड्या नेणाऱ्या मालकांनी बुकिंगवरून आंदोलन केले होते त्यावेळीही मध्यस्थी करण्यासाठी जर कोण धावून आले असतील तर ते विनय भाईच. वास्तविक जी भूमिका आमदारानी वठवायची असते ती भूमिका विनय तेंडुलकर वठवतात. हे सर्व पाहून त्यांच्या मनात आहे तरी काय हा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही बुवा! ∙∙∙
नगरसेवक आलेच नाहीत?
कुडचडे मतदारसंघात गोवा साधनसुविधा महामंडळाकडून काही विकासकामे हातात घेतली जाणार असून त्याचा आढावा घेण्यासाठी या महामंडळाचे अध्यक्ष मायकल लोबो काल कुडचडे येथे आले होते. अशी जेव्हा कामे हाती घेतली जातात, त्यावेळी आढावा बैठकीसाठी स्थानिक आमदारांबरोबर नगराध्यक्ष, नगरसेवकही उपस्थित राहतात. पण कालच्या बैठकीला आमदार काब्राल उपस्थित राहिले, पण नगरसेवक नव्हते. या कामात कुडचडे पालिकेच्या मालकीच्या जागेत एक प्रकल्प येत असून त्या जागेची पाहणी करण्यासाठी तरी नगरसेवक उपस्थित राहतील, अशी अपेक्षा होती. पण तिथेही कुणी नव्हते. मायकल लोबो कुडचडेत येणार याची माहिती काब्राल यांनी आपल्या नगरसेवकांना दिली नसल्याने ही अनुपस्थिती होती की, नगरसेवकांनी मुद्दामहून या कार्यक्रमाला येण्याचे टाळले? खरे कारण काय बुवा?
गोवा विद्यापीठ मेळावा, की ‘मॅनेजमेंट’?
गोवा विद्यापीठात लवकरच माजी विद्यार्थ्यांचा मेळावा होणार आहे म्हणे! जुन्या आठवणींना उजाळा, मैत्रीचे धागे पुन्हा जुळवणे अशा चर्चा रंगणार हे सगळं ठरलेलंच. पण यंदा आठवणींसोबत एक छोटंसं ‘पेमेंट गेटवे’ही आलंय. अर्जात किमान पाचशे रुपये भरावेत, ‘क्यूआर कोड स्कॅन’ करावा आणि मेळाव्यात आपली कला सादर करायची असल्यास त्याच अर्जात पर्याय खुला! म्हणजे आठवणी, कला आणि व्यवहार, तिन्ही एकाच फॉर्ममध्ये! आता अर्जाची तारीख संपली आणि चर्चा सुरू झाली नेमके किती रुपये जमा झाले? हा मेळावा आठवणींसाठी होता की अकाउंट्ससाठी? आणि जमा झालेल्या रकमेचा उपयोग नेमका कशासाठी? आता पाहायचे इतकेच, या मेळाव्यात टाळ्यांचा कडकडाट जास्त होईल की प्रश्नांचा? क्यूआर कोड स्कॅन झाला आहे, आता पारदर्शकतेचाही ‘स्कॅन’ होईल का, याचीच वाट पाहत सगळे बसले आहेत!
फोंड्यातील चोऱ्या आणि तपास...!
फोंड्यात काही ना काही होतच असतं. गोव्यात जशी गुन्हेगारी वाढली आहे, तशी फोंड्यातही वाढली आहे. मात्र फोंड्याचे पोलिस निरीक्षक विजयनाथ कवळेकर यांनी मागच्या काही प्रकरणांचा चांगला तपास लावला होता. आता कवळेकर यांची फोंड्यातून बदली झाली आहे, मात्र बदली झाल्यानंतर फोंड्यात तीन ठिकाणी मोठ्या चोऱ्या झाल्या आहेत. आता या चोऱ्यांचा तपास नव्याने रूजू होणाऱ्या पोलिस निरीक्षक मोहन गावडे यांना करावा लागणार आहे. मागच्या काळात मोहन गावडे यांनी फोंड्यातील खून प्रकरणांचा चांगला छडा लावला होता. त्यामुळे या चोऱ्यांचाही छडा नव्याने रूजू होणारे पोलिस निरीक्षक करतील, अशी आशा फोंडेकरांना आहे.
जोर का झटका धीरे से!
गोवा सरकारच्या संगनमताने केंद्र सरकारने दाबोळी विमानतळ बंद करण्याचा जो निर्णय घेतला आहे, त्यावर अजून अधिकृत काहीही जाहीर केलेले नाही. पण आमदार विजयबाब यांच्या सांगण्यानुसार विमानतळ बंद करण्याचा निर्णय झाला आहे. पण तो हळू हळू टप्प्या-टप्प्याने जाहीर केला जाईल. एकदम निर्णय जाहीर केला तर लोकांना मोठा धक्का बसेल, हा धक्का कमी करण्यासाठी सरकार एवढ्यात निर्णय जाहीर करणार नाही. जोर का झटका धीरे से लगे, अशातला हा प्रकार आहे, असे विजयबाब सांगतात. खरं-खोटं सरकारलाच माहीत नाही का?
... तर दुकान बंद करावे लागेल!
पालिका निवडणुका जस जशा जवळ येत आहेत, तसतसे वातावरण रंगताना दिसत आहे. २०२१ साली विजयबाब व दिगंबरबाब यांनी एकत्र येऊन मडगाव पालिकेत सत्ता काबीज केली होती. आता दिगंबरबाब भाजपवासी झालेत. एक वेळ मडगावात भाजपची स्थिती होती, तशी आता कॉंग्रेसची झाली आहे. आता फातोर्ड्याला ‘फॉरवर्ड’ नेत असलेले विजयबाब नगरपालिका निवडणुकीच्या निमित्ताने मडगावात आपला पाया मजबूत करण्याच्या प्रयत्नांत आहेत. या संदर्भात विचारले तर ते सांगतात, जर यावेळी आपण मडगावात आलो नाही, तर आपले दुकान बंद करावे लागेल. म्हणजे मडगावात पालिका निवडणुकीत विजयबाब आपले उमेदवार ठेवणार, हे नक्की. आता पाहू कोण या गटातून त्या गटात व त्या गटातून या गटात माकड उड्या मारतात ते! काही तरी चांगले घडो, हीच मडगावकरांची अपेक्षा.
नगरसेवकाचा पाणउतारा!
बाबूश मोन्सेरात यांचे चार वर्षे कट्टर समर्थक असल्याचा दावा करणाऱ्या एका नगरसेवकाचा आता बराच हिरमोड झाला आहे म्हणे. त्याचा प्रभाग महिला राखीव झाल्याने त्याच्या पुन्हा नगरसेवक बनण्याच्या इच्छा-आकांक्षावर पाणीच फेरले गेले आहे. काही झाले तरी बाबूश आपल्याला उमेदवारी देणार, असे त्याला वाटत होते. काही समर्थकांना घेऊन त्या नगरसेवकाने मिरामार कार्यालय गाठल्यानंतर बाबूश यांनी म्हणजे त्याचा ज्या शब्दात पाणउतारा केला, त्याची चर्चा सध्या प्रभागात सुरू झाली आहे. त्या नगरसेवकाबरोबर जे नागरिक गेले होते, त्यांनाही म्हणे काही शाब्दिक बोलीचा प्रसाद द्यायचा तोही त्यांच्याकडून मिळाला असावा, असे त्यांच्या चेहऱ्यावरून तरी वाटत होते. त्याला कारणही तसेच आहे, प्रभाग महिला राखीव होणार असल्याचे समजताच नगरसेवकाचा तोल गेला आणि त्यांनी जे काही बोलायचे, ती वाच्यता बाबूश समर्थकांसमोर केली आणि वरील ‘तियात्र’ घडायचे ते घडले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.