सासष्टी: भारतीय जनता पक्षाला सत्तेतून हटवण्यासाठी सर्व विरोधी पक्षांनी एकत्र येणे ही काळाची गरज आहे. तमाम गोमंतकीयांची सुद्धा हीच इच्छा आहे. जिल्हा पंचायत निवडणुकीच्या निकालावरून तरी सर्व विरोधी पक्षांनी धडा घेतला पाहिजे. आपण सर्व विरोधी पक्षांच्या महायुतीसाठी प्रयत्न करणार आहे. आम आदमी व रेव्होल्युशनरी गोवन्स पक्षाने सुद्धा युतीत सामील होणे आवश्यक आहे व त्यांच्यासाठी युतीसाठी आमचे दरवाजे कायम उघडे आहेत, असे विरोधी पक्ष नेते युरी आलेमाव यांनी आज मडगावात पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले.
‘आप’चे स्थानिक आमदार युतीसाठी तयार होते. मात्र त्यांच्या नवी दिल्लीतील नेत्यांनी घोळ घातला. यापुढे तरी त्यांच्या दिल्लीतील नेत्यांनी शहाणपणा दाखवावा, असे आवाहन युरी आलेमाव यांनी केले.
गोव्याचे संरक्षण करण्यासाठी जे काही करता येईल ते करण्याची आपली तयारी आहे. मैत्रिपूर्ण लढतीसाठी आपण राजी नाही. जिल्हा पंचायत निवडणुकीत मैत्रिपूर्ण लढतीच्या नावाखाली आम्हाला कमीत कमी चार ते पाच जागा गमवाव्या लागल्या. जर या जिंकल्या असत्या तर दोन्ही जिल्हा पंचायती आमच्या ताब्यात आल्या असत्या, असेही युरी आलेमाव यांनी सांगितले.
जिल्हा पंचायत निवडणुका आमच्यासाठी मुळीच प्रयोग नव्हता. आम्ही जिंकण्याच्या इराद्याने निवडणुकीत उतरलो होतो. या निवडणुकीतील निकालावर सर्व पक्षांनी आत्मचिंतन करण्याची गरज आहे व आपण ती करणार आहे.
सर्व विरोधी पक्षांच्या महायुतीसाठी लवकरात लवकर प्रयत्न होणे आवश्यक आहे. वेळकाढू पणा अजिबात चालणार नाही यावर आलेमाव यांनी भर दिला. कॉंग्रेस पक्ष हा मुख्य विरोधी पक्ष आहे. त्यामुळे युतीसाठी आम्ही पुढाकार घेणार आहोत असेही आलेमाव यांनी शेवटी सांगितले.
सत्ताधाऱ्यांनी कोट्यवधीचा चुराडा केला!
भारतीय जनता पक्षावर टीका करताना युरी आलेमाव यांनी सांगितले की, सत्ताधारी पक्षाने निवडणुकीत कोट्यावधी रुपयांचा चुराडा केला. सरकारी यंत्रणेचा वापर केला.
त्यांनी गोवा फॉरवर्ड पक्षाचे सुद्धा अभिनंदन केले. या पक्षाने प्रत्येक ठिकाणी चांगली लढत दिली, असे सांगितले. रिवण मधील त्यांचा उमेदवार केवळ १९ मतांनी पराभूत झाला. सांगेच्या आमदारासाठी ही धोक्याची घंटा असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.