माविनना ‘राम’ पावला?
काँग्रेसमधून भाजपात आलेल्या मंत्री माविन गुदिन्होंचे हिंदू प्रेम गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने उफाळून येत आहे. आपण मूळ हिंदू असल्याचा आपल्याला सार्थ अभिमान असल्याचे म्हणत असतानाच, भगवी वस्रे परिधान करून रामाची पूजा करतानाचे त्यांचे फोटो प्रसिद्ध झाले. त्यानंतर काहीच दिवसांनी त्यांनी आपण रामजन्मभूमीसंदर्भात चित्रपटाची निर्मितीही करीत असल्याचे जाहीर केले. हिंदू धर्म, प्रभू राम यांच्या जोरावर राजकारण करीत असलेल्या भाजपच्या माजी मुख्यमंत्री स्व. मनोहर पर्रीकर यांनी २७ वर्षांपूर्वी काँग्रेस सरकारात मंत्री असलेल्या गुदिन्होंवर वीज दरात सवलत दिल्याचा आरोप करीत न्यायालयात खटला दाखल केला होता, त्यातून गुदिन्होंची सहिसलामत सुटका झाली आहे. याला कारण गुदिन्होंची रामभक्ती तर नसावी?
तवडकर यांचा उत्साह
रमेश तवडकर यांना जनसेवेचा उत्साह आहे. मागे अनुसूचित जाती जमाती आयुक्त असतानाही त्यांनी आयोगाला नावारुपाला आणले होते. आताही खातेवाटप व्हायचे असताना त्यांनी मंत्रालयातील आपल्या कार्यालयाचा ताबा घेतला. त्यांना खाती कोणती मिळतील हे नंतर समजेलच पण काम करण्यास आपण किती अधीर आहे, हे त्यांनी कृतीतून दाखवून दिले आहे. मंत्री मंत्रालयात भेटत नाहीत, अशी तक्रार होत असतानाच तवडकर यांनी खातेवाटपाआधीच मंत्रालयात येणे सुरू करून वेगळा आदर्श घालून दिल्याची चर्चा आहे.
माविन सुटले; पण
माविन गुदिन्हो यांना न्यायालयाने वीज दर सवलत प्रकरणात निर्दोष ठरवले असले तरी भाजपच्या गोटातून त्याचे म्हणावे, तसे जल्लोषी स्वागत झालेले नाही. तो जल्लोष त्यांना आपल्या मतदारसंघात जाऊन अनुभवावा लागला आहे. भाजपचा एखादा मंत्री अशा गाजलेल्या खटल्यातून सुटला असता तर भाजपच्या बड्या नेत्याने पत्रकार परिषद घेत न्याय व्यवस्थेवरील विश्वास असल्याचे पालुपद लावले असते. येथे मूळ तक्रारदार स्व. मनोहर पर्रीकर होते. त्यामुळे काय प्रतिक्रीया द्यावी, याविषयी भाजपमध्ये द्विधा स्थिती होते. त्यापेक्षा गप्पच बसावे, असा पोक्त विचार केला गेल्याचे दिसून येत आहे.
दुसऱ्या मंत्र्याकडील खाते हवे
नव्याने शपथविधी झालेल्या रमेश तवडकर व दिगंबर कामत यांचे खातेवाटप अडण्यामागे एका वजनदार खात्याची केलेली मागणी कारणीभूत ठरल्याची चर्चा सत्ताधारी वर्तुळात आहे. राजकीयदृष्ट्या पाच मतदारसंघात प्रभावशाली असलेल्या या मंत्र्यांकडील ते खाते आपल्याला मिळावे, अशी इच्छा व्यक्त करण्यात आली आहे. मुख्यमंत्री आपल्याकडे असलेल्या खात्यांपैकी काही वजनदार खाती देण्यास तयार आहेत पण तेच खाते हवे याचा आग्रह धरण्यात आल्याने पेच निर्माण झाल्याचे सांगण्यात येत आहे. त्याचमुळे खातेवाटप लांबणीवर पडत चालल्याचे आता उघडपणे सत्तेच्या वर्तुळात बोलले जाऊ लागले आहे.
पहिला मजला गजबजणार
मंत्रालयातील पहिल्या मजल्यावर पुन्हा वर्दळ दिसू लागणार. १८ जून रोजी गोविंद गावडे यांना मंत्रिमंडळातून काढून टाकल्यानंतर त्यांचे कार्यालय सुनेसुनेच होते. आलेक्स सिक्वेरा महिनाभराहून अधिक काळ दिल्लीत उपचार घेत होते. त्यावेळी त्यांच्या कार्यालयात कर्मचारी असले तरी फारशी वर्दळ नसायची. आता ही दोन्ही कार्यालये सर्वसाधारण प्रशासन खात्याकडून नव्या दोन मंत्र्यांना म्हणजे रमेश तवडकर व दिगंबर कामत यांना देण्यात आल्याने पहिल्या मजल्यावर पुन्हा वर्दळ वाढेल, असे दिसते.
माविनना ‘राम’ पावला?
काँग्रेसमधून भाजपात आलेल्या मंत्री माविन गुदिन्होंचे हिंदू प्रेम गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने उफाळून येत आहे. आपण मूळ हिंदू असल्याचा आपल्याला सार्थ अभिमान असल्याचे म्हणत असतानाच, भगवी वस्रे परिधान करून रामाची पूजा करतानाचे त्यांचे फोटो प्रसिद्ध झाले. त्यानंतर काहीच दिवसांनी त्यांनी आपण रामजन्मभूमीसंदर्भात चित्रपटाची निर्मितीही करीत असल्याचे जाहीर केले. हिंदू धर्म, प्रभू राम यांच्या जोरावर राजकारण करीत असलेल्या भाजपच्या माजी मुख्यमंत्री स्व. मनोहर पर्रीकर यांनी २७ वर्षांपूर्वी काँग्रेस सरकारात मंत्री असलेल्या गुदिन्होंवर वीज दरात सवलत दिल्याचा आरोप करीत न्यायालयात खटला दाखल केला होता, त्यातून गुदिन्होंची सहिसलामत सुटका झाली आहे. याला कारण गुदिन्होंची रामभक्ती तर नसावी?
दळवींचा बाँम्ब
फोंडा पालिकेच्या दोन दिवसांपूर्वी झालेल्या बैठकीत मोठा गोंधळ उडाला. कारण होते, कचरा गोळा करणाऱ्या कंत्राटदाराला मुदतवाढ. आता ही मुदतवाढ बेकायदेशीर असल्याचा दावा करून माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक आणि भाजपचे राज्य सचिव विश्वनाथ दळवी यांनी आवाज उठवला. अशाप्रकारे सुमारे दीड कोटी रुपयांच्या कामाची निविदा न काढता संबंधित कंत्राटदाराला मुदतवाढ देणे नियमबाह्य असून असा प्रकार फोंडा पालिकेने केल्यास आपण पालिका संचालकांकडे तक्रार दाखल करणारच शिवाय दक्षता खात्याकडेही दाद मागू, असा बाँम्बच विश्वनाथ दळवी यांनी टाकला आहे, त्यामुळे पाहुया या धमकीवजा इशाऱ्याचा काही परिणाम होतो का...! ∙
गावडे पर्यायाच्या शोधात!
पक्षशिस्तीचा भंग केल्याचा दावा करीत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनाआधी गोविंद गावडेंना मंत्रिमंडळातून वगळले, तेव्हापासून आक्रमक वृत्तीचे गावडे शांत झालेत. अधिवेशन काळात आमदार या नात्याने त्यांनी लोकांचे प्रश्न मांडले. काही प्रश्नांच्या चर्चेवेळी ते सरकारवर अशापद्धतीने तुटून पडले की गावडे सत्ताधारी भाजपचे आमदार आहेत की विरोधी? असाही प्रश्न पडला. त्यांना हटवून आता मुख्यमंत्र्यांनी त्यांचे राजकीय विरोधक असलेल्या आणि त्यांच्याच समुदायातल्या रमेश तवडकर यांना मंत्रिमंडळात घेतल्याने गावडेंची तळपायाची आग मस्तकात गेल्याशिवाय राहिली नसेल, हे नक्की. आता आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपकडून उमेदवारी मिळणार नाही, हे गृहित धरून गावडेंनी राजकीय पर्याय शोधण्यास सुरुवात केल्याची चर्चा आहे. त्यामुळे गावडे काँग्रेसचा मार्ग अवलंबणार की, अपक्ष म्हणून लढण्याचा विचार करणार, याकडे अनेकांचे लक्ष आहे.
उपसरपंच नाही, उप-शिकारपंच!
माशेलात शिल्पा वेरेकर यांची उपसरपंचपदी निवड झाली. गावभर अभिनंदनाचा माहोल. प्रसारमाध्यमांत पहिली बातमी ब्रेक झाली आणि लगेच विविध बातम्या धडकल्या- उपसरपंच विरुद्ध अविश्वास!, अधिकारांचा गैरवापर आणि तोही तीन तासांत? की पाळण्यात बसल्यावरच चुकीचं पाऊल?, ही उपसरपंच नाही, ‘उप-शिकारपंच’ झाली बघा!, खुर्ची उष्ण आहे म्हणून कुणी बसूच देत नाही... बसला की लगेच भाजतो! अखेर लोकांनी थट्टा उडवत म्हटलं, ‘ही पंचायती नाही, ही खुर्चीची ‘कुस्ती’ आहे.’ ∙
माविन महालक्ष्मीच्या दर्शनाला
माजी वीज मंत्री तथा विद्यमान वाहतूक मंत्री माविन गुदिन्हो यांची आज एका दीर्घकालीन खटल्यातून मुक्तता झाली. त्यानंतर माविन यांनी पणजीतील महालक्ष्मी मंदिरात येऊन दर्शन घेतले. सत्तावीस वर्षे त्यांचा हा न्यायालयीन लढा सुरू होता. मनोहर पर्रीकर यांच्या काळात दाखल झालेला तक्रारीवरून त्यांच्याविरुद्ध खटला सुरू झाला. त्यामुळे माविन यांच्यावर गेली २७ वर्षे न्यायालयाची टांगती तलवार राहिली. भाजपच्या मूळ कार्यकर्त्यांना माविन यांच्याविरोधात ‘रिओपन’ झालेल्या खटल्यामुळे त्यावेळी आनंद झाला होता. आता त्यांची निर्दोष मुक्तता झाल्यामुळे त्यावेळी आनंदलेले कार्यकर्ते निश्चित दुखावले असणार. परंतु महत्त्वाची बाब म्हणजे अनेक चांगल्या कार्यक्रमाची सुरुवात मनोहर पर्रीकर ज्या महालक्ष्मीचे दर्शन घेऊन करीत, निर्दोष मुक्ततेनंतर माविन यांनी त्याच मंदिरात येऊन महालक्ष्मीचे दर्शन घेतले. यावरून भाजपच्या कार्यकर्त्यांनी जो काही अर्थ काढायचा तो त्यांनी काढावा, असेच म्हणावे लागेल.
ओंकार ईज बॅक....
पूर्वाश्रमीचे भाजपचे कार्यकर्ते आणि कुडचडेचे माजी नगरसेवक ओंकार वस्त यांनी आता सरकारी नोकरी धरल्यामुळे ते सक्रिय राजकारणापासून साहजिकच दूर आहेत. मात्र, कुडचडेच्या राजकारणातील त्यांचा प्रभाव अजूनही कमी झालेला नाही हेही, तेवढेच खरे. वीज खात्यात अभियंता म्हणून काम करणाऱ्या वस्त यांची त्याचमुळे असेल कदाचित सासष्टीतून थेट पेडणेला बदली केली होती. यामागे स्थानिक राजकारण असल्याचे सांगितले जात होते. मात्र वस्त हेही तेवढेच खमके. त्यांनी म्हणे फक्त १५ दिवसातच आपली ही बदली रद्द करुन घेत पुन्हा आपल्या पूर्वीच्या जागी ते कामाला रुजू झाले. आता ओंकार परत आले आहेत त्याचा कुडचडेतील राजकारणावर काही परिणाम होणार का?
काँग्रेस गप्प का?
माविन गुदिन्हो प्रकरणावरून कॉंग्रेसचीही कोंडी झाली आहे. वीज दर सवलत प्रकरण घडले तेव्हा गुदिन्हो कॉंग्रेसचे मंत्री होते. स्व. मनोहर पर्रीकर भाजपमध्ये. पर्रीकर यांनी तक्रार केली, पुढे न्यायालयातही विषय नेला. गुदिन्होंसकट अधिकाऱ्यांवरही पोलिस कारवाई करण्यास पर्रीकर यांनी भाग पाडले. गुदिन्होंना भाजपमध्ये प्रवेश देण्यात आला एवढेच नव्हे त्यांना भाजपच्या गाभा समितीचेही सदस्य करण्यात आले. त्यामुळे आता गुदिन्हो सुटले तर ते कॉंग्रेसचे तेव्हाचे मंत्री म्हणून निर्दोष सुटले की आताचे भाजपचे मंत्री म्हणून सुटले या द्वंद्वात कॉंग्रेसचे नेते अडकले आहेत. त्यामुळे कॉंग्रेसचा तंबू या विषयावर थंड पडल्याचे दिसते.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.