'जेनझी' आणि निवडणूक
विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागताच आता सर्वच राजकीय पक्षांनी ‘जेनझी’ मतदारांना आकर्षित करण्यासाठी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. या शर्यतीत भाजपच्या युवा मोर्चाने मात्र बाजी मारल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. विरोधक अजूनही तरुणांपर्यंत पोहोचण्याचे मार्ग शोधत असताना, भाजपने ‘मुख्यमंत्री चषक’ स्पर्धेच्या माध्यमातून थेट तरुणाईच्या मैदानात उडी घेतली आहे. २०२२ च्या निवडणुकीत या स्पर्धेतून ४५ हजार तरुणांना जोडल्याचा चांगला फायदा पक्षाला झाला होता. त्याच यशस्वी फॉर्म्युल्याचा वापर करत, यंदा तब्बल १ लाख तरुणांना सहभागी करून घेण्याचे मोठे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. आता भाजपच्या या ‘गेमप्लॅन’ला विरोधक कसे प्रत्युत्तर देतात, याकडेच सर्वांचे लक्ष लागले आहे.
संकेतची आज ‘फोव पे चर्चा’
सावर्डे मतदारसंघात ‘युनायटेड फोर्स सावर्डे’ या बॅनरखाली सहा इच्छुक एकत्र आले असले तरी भाजपचे युवा नेते संकेत आर्सेकर यांनी आपली धडपड बंद केलेली नाही, असे वाटते; कारण संकेत आर्सेकर यांनी सावर्डे मतदारसंघात आपले दुसरे कार्यालय सुरू केले असून आज या कार्यालयाचे उद्घाटन ठेवले आहे. सध्या दिवाळीचा माहोल असल्याने त्यांनी सावर्डेच्या लोकांशी संवाद साधण्यासाठी चक्क ‘फोव पे चर्चा’ ठेवली आहे. दिवाळीच्या निमित्ताने फोवांचा फराळ करता करता मतदारसंघातील समस्या आणि इतर बाबींवर चर्चा केली जाणार आहे. दिवाळीचे हे फोव संकेतला सत्तेचे सोपान चढवणारे ठरतील का? पाहावे लागेल बुवा!
मांद्रेतील शांतता
माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी भाजपमध्ये फेरप्रवेश केल्यानंतर मांद्रेत मोठे पडसाद उमटलेले नाहीत. आमदार जीत आरोलकर यांनी युती धर्म सर्वांना पाळावाच लागेल; आपणही तो पाळेन, असे सांगत सामंजस्याची भूमिका घेतली आहे. आरोलकर यांच्याविरोधात पार्सेकर व माजी आमदार दयानंद सोपटे एकत्र आल्याचे चित्र असले तरी अद्याप जाहीर ठिणगी पडलेली नाही. चिथावणीखोर वक्तव्येही दोन्ही बाजूंकडून अद्याप टाळली गेली आहेत. विधानसभा निवडणूक जवळ येत जाईल, तसे या शांततेला गालबोट लागेल, हे सांगण्यासाठी कोणत्याही राजकीय पंडिताची गरज नाही. मात्र, याला सुरवात कोण करतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
पोलिसांचा धाक आहे का?
आताच्या पोलिसांचा धाक कुणालाच राहिलेला नाही. चोर आता खुद्द पोलिसांच्याच घरी चोरी करतात आणि तेही चोर पोलिसांना सापडत नाहीत. बरे चोरांचे सोडा, गावातील युवकही पोलिसांना फारसे मीठ घालत नाहीत, हे सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडीओतून दिसून आले आहे. मोटरसायकल घेऊन ड्रॅग रेस करत असल्याचा हा व्हिडीओ असून यातील एक युवक मोटरसायकलचा फॅन्सी सायलेन्सर फातोर्डा वाहतूक पोलिस कार्यालयावर फेकतो, असे या व्हिडिओत दाखविले आहे. आता हा व्हिडिओ कुणी आणि का शूट केला ते कळू शकले नाही; पण या युवकांच्या मनांत पोलिसांविषयी नेमके काय आहे, ते मात्र नक्की कळून येते.
साळगावमध्ये काय होणार?
शिवोलीतील भाजप नेते आणि माजी मंत्री दयानंद मांद्रेकर यांनी भाजप सरकारमधील महामंडळाचे अध्यक्षपद सोडल्याने त्यांनी वेगळ्या राजकीय प्रवासाचा विचार केल्याचे स्पष्ट झाले आहे. आता माजी मंत्री दिलीप परुळेकर अशी नजरेत येणारी कोणती कृती करतात याकडे लक्ष लागले आहे. परुळेकर यांनी आपण पाच हजारांच्या मताधिक्याने जिंकणार, असा दावा करून मध्यंतरी लक्ष वेधले होते. त्यानंतर अन्य कोणाकडूनही प्रतिक्रिया न आल्याने तो विषय मागे पडला. मांद्रेकर यांनी लाभाच्या पदावर पाणी सोडण्याचे धाडस केले तसे परुळेकर काय करतील. उद्या मांद्रेकर यांनी वेगळी राजकीय वाट चोखाळली तर परुळेकर तसे धाडस करतील काय? याकडे भाजपसह परुळेकर समर्थकांचेही लक्ष आहे.
पेडण्यातील खुशी
मांद्रेत कमळ फुलवू, असे खुद्द मुख्यमंत्र्यांनी जाहीर केल्यानंतर पेडण्यात थोडे खुशीचे वातावरण तयार झाले आहे. युतीचे नंतर पाहू, असे मुख्यमंत्र्यांनी सांगून चर्चेस वाव दिला आहे. पेडण्यात मागची निवडणूक राजन कोरगावकर यांनी ‘मगो’च्या उमेदवारीवर लढवली होती. अद्याप ते ‘मगो’तच आहेत. भाजपची ‘मगो’सोबत युती झाली तर भाजप मांद्रे मतदारसंघ आपल्याकडे घेत पेडणे ‘मगो’ला देईल, असे काहींना वाटू लागले आहे. त्यामुळे कोरगावकर समर्थकांत थोडे आनंदाचे वातावरण तयार झाले आहे. ‘मगो’चे अध्यक्ष दीपक ढवळीकर यांनी आमदार असलेला मांद्रे मतदारसंघ ‘मगो’कडेच, असे म्हटले असतानाही पेडण्यात खुशीची लहर येणे याला काय म्हणावे?
... आणि युरी प्रकटले!
विरोधी पक्षनेतेपद हे अत्यंत महत्त्वाचे पद. सरकारला खिंडीत पकडून नेस्तनाबूत करण्याचे काम यापूर्वीचे विरोधी पक्षनेते डॉ. जॅक सिक्वेरा, बाबू नायक, ॲड. रमाकांत खलप, डॉ. काशिनाथ जल्मी व मनोहर पर्रीकर यांनी केले आहे व ते अजूनही गोमंतकीयांच्या आठवणीत आहे; परंतु विद्यमान विरोधी पक्षनेते युरी आलेमाव हे आपल्या पदाला न्याय देऊ शकलेले नाहीत, अशी लोकांची भावना आहे. म्हापसा बलात्कार प्रकरण त्यानंतर काणकोण येथील बलात्काराची घटना झाल्यानंतर खरे म्हणजे युरी आलेमावना घटनास्थळी भेट देऊन सरकारला नामोहरम करण्याची संधी होती; परंतु केवळ समाजमाध्यमांवर प्रतिक्रिया देऊन युरी आलेमाव गप्प राहिले व आज कित्येक दिवसांनी कॉंग्रेस भवनात प्रकटले.
मतदारांना प्रश्न?
मांद्रेचे ‘मगो’चे आमदार जीत आरोलकर भाजपमध्ये प्रवेश करणार आणि त्यांनाच उमेदवारी मिळणार, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे. मात्र, दयानंद सोपटे उमेदवारीसाठी आग्रही असून, जीत यांच्यासाठी काम करणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. लक्ष्मीकांत पार्सेकरांच्या पुनरागमनामुळे उमेदवारीचा पेच वाढला आहे. जीत यांच्या विजयासाठीच पार्सेकरांना पक्षात घेतले नसावे ना? असा प्रश्न आता मतदारांना पडला आहे.
युरींची कुंकळ्ळीत शेवटची निवडणूक?
कुंकळ्ळी मतदारसंघात आजपर्यंत कोणताही आमदार हॅट्ट्रिक करू शकलेला नाही. आजपर्यंत कोणीही आमदार तीनवेळा निवडून आलेला नाही. युरी आलेमाव यांच्या वडिलांनी मतदारसंघात भरपूर विकास केला. अनेकांना नोकऱ्या दिल्या. मात्र, तिसऱ्यावेळी ते तेरा मतांनी हरले. आरेसिओ डिसोझा, मानू फर्नांडिस सगळे तिसऱ्या वेळी जिंकण्यात अपयशी ठरले. विद्यमान आमदार युरी आलेमाव यांची ही दुसरी निवडणूक. युरी या निवडणुकीत जिंकले किंवा हरले तरी त्यांची ही कुंकळ्ळीत शेवटची निवडणूक ठरणार, अशी चर्चा आतापासूनच सुरू झाली आहे.
मासळीवरही संशयाचे धुके
सडलेल्या चिकनवरील कारवाईनंतर आता खवय्यांच्या ताटात पडणाऱ्या ‘ताज्या’ मासळीवरही संशयाचे धुके पसरले आहे. परराज्यातून येणारी मासळी नेमकी कधी पकडली जाते आणि ती कशी साठवली जाते, याबाबत मोठी गुप्तता पाळली जाते. हॉटेल्स आणि बाजारात ‘ताजी’ म्हणून विकली जाणारी मासळी खरोखरच ताजी असते की अनेक दिवस बर्फात किंवा फ्रिजरमध्ये ठेवून अथवा फॉर्मेलिनचा वापर करत ती ताजी असल्याचा देखावा केला जातो? असा सवाल आता मत्स्यप्रेमींच्या मनात निर्माण होऊ लागला आहे. चिकनप्रमाणेच अन्न व औषध प्रशासनाने आता या मासळी बाजाराची आणि मोठ्या हॉटेल्सच्या फ्रिजरचीही झाडाझडती घ्यावी. लोकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या या ‘कोल्ड स्टोरेज’च्या खेळाचा पर्दाफाश करणे गरजेचे असल्याचे मत नागरिक व्यक्त करत आहेत.
गोव्यात पाणीबाणीचा धोका वाढतोय!
एखाद्या समस्येचे वेळेवर निराकरण न केल्यास त्याचे परिणाम भयानक होऊ शकतात. येणाऱ्या काळात गोव्यात पाणी समस्या तीव्र होण्याचा धोका आहे. गोव्याच्या राज्यपालांनी यावर सावध राहण्याचा इशारा दिला आहे. गोव्यात यंदा अल्प पाऊस पडला. आतापासूनच विहिरी कोरड्या पडायला लागल्या आहेत. नद्या व नाले सुकायला लागले आहेत. मार्च, एप्रिल व मे महिन्यात परिस्थिती हाताबाहेर जाण्याचा धोका आहे. जलस्रोत खाते व पेयजल खात्याने सक्रिय होण्याची गरज आहे. बांधकाम व गाड्या धुण्यासाठी तसेच इतर कामांसाठी पिण्याच्या पाण्याचा उपयोग त्वरित थांबविण्याची गरज आहे. दक्षिण गोवा जिल्हा पंचायतीने दक्षिणेतील सर्व विहिरी साफ करण्याची विनंती जलस्रोत खात्याला केली आहे, ती त्वरित अमलात आली पाहिजे. अन्यथा गोव्यात पाणीबाणी होण्याचा धोका आहे.
काय, आंबावलीत मराठीप्रेमी?
कोकणीला राजभाषेचे स्थान मिळाले आहे. कोकणी आठव्या परिशिष्टात पोहोचली आहे. कोकणी लेखकांना ज्ञानपीठ पुरस्कार मिळतो. असे असले तरी गोव्यातून कोकणी-मराठी वाद संपता संपत नाही. कोकणीबरोबर मराठीलाही राजभाषेचा दर्जा द्यावा म्हणून मराठीप्रेमी रस्त्यावर उतरले आहेत. पंचायतीत यासंदर्भात ठराव घेतले जातात. कुंकळ्ळी मतदारसंघातील आंबावली ही पंचायत ‘एसटी’बहुल लोकसंख्या असलेली पंचायत. या पंचायत क्षेत्रात ख्रिस्ती लोकांची संख्या मोठी. असे असतानाही आंबावली पंचायत मंडळाने मराठीला राजभाषेचा दर्जा द्यावा, अशी मागणी करणारा ठराव मंजूर केला, ही गोष्ट नक्कीच धाडसाची आहे.
पोलिसांच्या यशावर नेत्यांचा डोळा!
म्हापसा पोलिसांनी गंभीर गुन्ह्याचा अहोरात्र तपास करून संशयिताला जेरबंद केले आणि सोशल मीडियावर त्यांच्या कामगिरीचे कौतुक सुरू झाले. एरव्ही पोलिसांच्या तपासाला विलंब झाला की टीकेची झोड उठवणारे आता मात्र पोलिस ठाण्याच्या पायऱ्या झिजवत आहेत. फुलांचे गुच्छ, अभिनंदन आणि पोलिसांसोबत छायाचित्रे काढण्याची जणू स्पर्धाच लागली आहे. विशेष म्हणजे, आगामी निवडणुकीसाठी गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेले इच्छुकही या गर्दीत आघाडीवर आहेत. पोलिसांच्या कामगिरीचे कौतुक करणे योग्यच; पण त्यासाठी एवढी धावपळ कशाला? कौतुक पोलिसांचे की स्वतःच्या चेहऱ्याच्या प्रसिद्धीचे? असा प्रश्न आता म्हापशात दबक्या आवाजात विचारला जात आहे.
‘मुखिया’ असे असावेत!
जो आपल्या अनुयायांसाठी मार्ग तयार करतो, मार्ग दाखवतो व स्वतः त्या मार्गाने प्रथम चालतो तो खरा नेता, अशी नेत्याची व्याख्या सांगितली जाते. दक्षिण गोवा जिल्हा पंचायतीला असाच सगळ्यांना मान्य असलेला व एकही विरोधक नसलेला अध्यक्ष लाभल्याची भावना आम्ही नव्हे दक्षिण गोव्याचे जिल्हा पंचायत सदस्य व्यक्त करतात. दक्षिण गोवा जिल्हा पंचायतीचे अध्यक्ष सिद्धार्थ गावस देसाई यांच्या कार्यपद्धतीवर सर्व ‘झेडपी’ खुश आहेत. एवढेच नव्हे, अधिकारी व कर्मचारीही सिद्धार्थ यांचे गुणगान करतात. मृदू स्वभावाच्या अध्यक्षांनी स्थानिक स्वराज्य संस्थेत एक खास उदाहरण घालून दिले आहे, त्याचे सगळेच कौतुक करतात. आता पाहूया सिद्धार्थच्या या कामामुळे त्यांना प्रमोशन मिळते की नाही ते!
पंचायत सचिवांचे अधिकार वाढले!
पंचायत संचालनालयाने पंचायत सचिवांच्या पदाला आता चांगलीच ताकद दिल्याची चर्चा आहे. पंचायत मंडळाकडे असलेले काही महत्त्वाचे अधिकार आणि जबाबदाऱ्या आता सचिवांकडे वर्ग करण्यात आल्याने सत्तेचे पारडेही सचिवांच्या बाजूने झुकल्याचे चित्र आहे. त्यामुळे पंचायत सचिवांचे वजन वाढले की पंचायत मंडळाचे कमी झाले, अशी चर्चा रंगू लागली आहे. मात्र, खरी उत्सुकता आहे ती या वाढलेल्या अधिकारांचा वापर नेमका कसा होणार याची! विशेषतः किनारपट्टी भागातील पंचायत कारभाराचे किस्से पाहता, सचिवांच्या हातात अधिकार आले म्हणजे आता विकासकामांना वेग येणार की काहींच्या सोयीसुविधांना, हे पाहणेच औत्सुक्याचे ठरणार आहे; कारण अधिकार मिळणे वेगळे आणि त्याचा योग्य वापर होणे वेगळे, नाही का?
नागरिकांचा जीव टांगणीला नको
राज्यात सध्या रस्त्याच्या कडेला नजर टाकली की राजकीय नेत्यांचे बॅनरच अधिक दिसतात. काही बॅनर तर विजेच्या खांबांवर अशा पद्धतीने लटकले आहेत की ते कधी खाली कोसळतील याची शाश्वती खुद्द बॅनर लावणाऱ्यांनाही नसेल. समजा एखादा बॅनर थेट रस्त्यावर कोसळला आणि त्याचवेळी एखादा दुचाकीस्वार तेथून जात असेल, तर त्याच्या दुखापतीची जबाबदारी कोण घेणार? की नेत्यांच्या शुभेच्छांचे बॅनर नागरिकांसाठी अशुभ ठरण्याची वाट पाहायची? दिवाळी संपली असून आता नाताळ, नवीन वर्ष आणि पुढे अनेक सण-समारंभांचे निमित्त येणार आहे. त्यामुळे बॅनरबाजीला आणखी उधाण येणार हे निश्चित. मग प्रशासनानेही आधीच जागे व्हावे, अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत; कारण नेत्यांचे फोटो झळकवण्याच्या नादात सामान्य नागरिकांचा जीव मात्र टांगणीला लागू नये, एवढीच माफक अपेक्षा!
जाहिरातींचा कळस की किळस?
जाहिरातींचे युग वगैरे ठीक आहे; पण ऑनलाईन पाहायला, वाचायला जा, धुवाधार पाऊसच कोसळतो, जाहिरातींचा. व्हिडिओ पाहा, क्लायमॅक्स सीन असतानाच जाहिरात येते. मार्केटिंगच्या जगात जितकी जाहिरात करून लोकांना फसवाल, तितके यशस्वी ठराल, हे सध्याचे ब्रीद आहे. टीव्ही मालिकांत एक किळसवाणा प्रकार सुरू आहे. संहितेत गरज नसताना अगरबत्ती लावायला एकटी देव्हाऱ्यात जाते. दुसरी म्हणते - वा, किती छान दरवळ. पहिली म्हणते - दिवसभर घरात सुगंधाची वलये चालू राहतात. प्रकाशझोत त्या उदबत्तीच्या पुड्यावर टाकतात. दोन-दोन मिनिटांनी मुंबईची रस्त्यावरील वर्दळ दाखवतात. त्यात रस्त्यालगतच्या जाहिरात दिलेल्या फलकांवर फोकस असतो. आस्थापनांच्या जाहिरातीचे बॅनर पडद्यावर थेट येतात. जाहिरातमय ब्रेक आहेतच. ब्रेक असो की कथा आपण जाहिरातीच्याच अमलाखाली असतो. विटंबना वेगळी नसते.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.