...काँग्रेस उत्पलसोबत राहणार?
पणजी मनपा निवडणुकीत भाजप पुरस्कृत मंत्री बाबूश मोन्सेरात यांच्या पॅनलचा पराभव करण्यासाठी माजी मुख्यमंत्री स्व. मनोहर पर्रीकर यांचे सुपुत्र उत्पल पर्रीकर ‘आमी पणजेकार’ नावाने पॅनल उभे करीत आहेत. या पॅनलच्या महापौरपदाचा चेहरा काँग्रेस नेते सुरेंद्र फुर्तादो असून काँग्रेसने या पॅनलला पूर्ण पाठिंबा दिलेला आहे. मनपा निवडणूक पक्षीय पातळीवर होत नसल्याने भाजपविरोधी पक्षांच्या नेत्यांनी एकत्र येत वैयक्तिकरीत्या ‘आमी पणजेकार’ पॅनल दिल्याचा दावा उत्पलसह काँग्रेस नेतेही करीत आहेत. परंतु, या घडामोडींमुळे आणि खुद्द उत्पलनी काँग्रेसचा पाठिंबा घेतल्यामुळे पणजीसह राज्यभरात खळबळ माजलेली आहे. त्यातच विधानसभा निवडणूक अवघ्या तेरा महिन्यांवर येऊन ठेपल्याने त्या निवडणुकीत काँग्रेसकडून उत्पलना पाठिंबा मिळेल, अशी चर्चा सुरू झाली आहे.
सगळ्यांचा एकत्र जल्लोष
म्हापसा शहरात काल कार्निव्हल मिरवणूक झाली. त्यानिमित्त शहरात सांस्कृतिक मेजवानीचा कार्यक्रम रंगला. यावेळी संगीताच्या तालावर सत्ताधारी व विरोधक एकत्र नाचताना व व्हिडिओ काढताना दिसले. काहींनी हे रिल्स आपल्या सोशल मीडियावर पोस्ट देखील केले. एरवी पालिका मंडळ बैठकीत एकमेकांवर तोंडसुख घेणारे हे नगरसेवक काल मात्र एकत्र पार्टी करताना दिसल्याने हा चर्चेचा विषय बनला. आगामी मे महिन्यात पालिका निवडणुका होणार आहेत.. त्यामुळे कदाचित सर्वांनी आपले हेवेदावे विसरून पुन्हा एकत्र येण्याचा विचार केला असावा! कारण, यातील प्रत्येकजण पुन्हा नगरसेवक बनण्यास इच्छुक आहेत. त्यामुळेच राजकारण बाजूला ठेवून प्रत्येकाचा आपले हितसंबंध सुधारण्याचा प्रयत्न असावा, कारण शेवटी राजकारणात आधार प्रत्येकास हवा असतो अन् पॅनलची साथ पण.
विद्यार्थी पंचायत यात्रा!
राज्यात अनेक यात्रा होतात, सरकार तुमच्या दारी, असे उपक्रम राबविण्यात येतात. परंतु गोवा विद्यापीठात अनेक वर्षानंतर सत्ता आलेल्या एनएसयूआय आणि गोवा फॉरवर्डच्या पॅनलने नवी उपक्रम हाती घेतलाय. गोवा विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयांमध्ये जात विद्यार्थ्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी विद्यार्थी पंचायत यात्रेचे आयोजन केले आहे. या यात्रेत विद्यार्थी मोकळ्या मनाने त्यांच्यापाशी व्यक्त होत आहेत. राज्यातील अनेक महाविद्यालयांमध्ये योग्य पिण्याच्या पाण्याची सुविधा देखील उपलब्ध नाहीत. याची जाणीव करून देत आहेत. महाविद्यालयांतील समस्या सोडविण्यासाठी महाविद्यालय प्रशासनाला विद्यार्थी मंडळाने १५ दिवसांची मुदत दिली आहे, परंतु जर प्रशासनाने कारवाई झाली नाही, तर एनएसयुआय आणि गोवा फॉरवर्ड काय भूमिका घेणार याकडे विद्यार्थ्यांचे लक्ष लागले आहे. विद्यार्थी पंचायत यात्रा सत्ताधाऱ्यांच्या नाकी नऊ आणणार असल्याचे चित्र दिसत असल्याची चर्चा आहे.
निवडणुकीनंतरही मतदारांची काळजी
निवडणूक तोंडावर आल्यानंतर राजकारण्यांकडून मतदारांना भेटी पोचविणे आणि इतर मदत करणे, हे तसे नित्याचेच. मात्र निवडणूक संपल्यानंतर या मतदारांकडे कुणी ढुंकूनही पहात नाहीत. पण सावर्डेचे युवा नेता संकेत आर्सेकर याला अपवाद ठरले आहेत. जिल्हा पंचायत निवडणुकीच्यावेळी सावर्डे मतदारसंघात भाजप उमेदवाराची स्थिती काही प्रमाणात धोक्यात आल्यानंतर संकेत आर्सेकर यांनी त्यात लक्ष घातले होते. तसेच धारबांदोडा येथील उमेदवार निवडून आणण्याचीही जबाबदारी त्यांच्या खांद्यावर टाकली होती. यामुळे सावर्डेतील टोनीनगर आणि धारबांदोड्यातील प्रतापनगर या भागात आर्सेकर यांनी स्वत: जाऊन मतदारांना भाजपसाठी मतदान करण्याची गळ घातली होती. आर्सेकर यांनी इतरांच्या प्रयत्नामुळे या दोन्ही मतदारसंघात भाजपचे उमेदवार जिंकून आले आणि पर्यायाने दक्षिण गोवा जिल्हा पंचायतीत भाजपची सत्ता आली. कित्येकवेळा राजकारणी ‘गरज सरो आणि वैद्य मरो’ ही भूमिका स्वीकारतात. पण आर्सेकर यांनी टोनीनगर आणि प्रतापनगर या दोन्ही ठिकाणी प्रत्यक्ष जाऊन मतदारांचे भाजपला पाठिंबा दिल्याबद्दल आभार मानले आणि बरोबर भेटवस्तूही दिल्या. याला मतदारांची काळजी घेणे असे म्हणता येणार नाही का?
जबाबदारीचे भान
मुरगाव बंदर प्राधिकरण आणि कोळसा हाताळणी करणाऱ्या कंपन्यांच्या प्रतिनिधींनी मुरगाव पालिकेच्या खास बैठकीकडे पाठ फिरवण्याचे दाखवलेले धाडस वास्कोत चर्चेचे ठरले आहे. त्यांच्या मागे कोणाची ताकद आहे, याचा अंदाज जो तो आपापल्यापरीने लावू लागला आहे. नागरिकांच्या प्रश्नांना सामोरे जाण्याऐवजी खुर्ची रिकामी ठेवण्याची ही सोय, लोकशाहीच्या आरशात नक्कीच चांगली दिसत नाही, असा टोमणाही हाणला जात आहे.
प्रियोळात बदलाचे वारे...
प्रियोळ मतदारसंघात सध्या काही तरी वेगळं शिजतंय, अशी चर्चा राजकीय वर्तुळात ऐकू येत आहे. बेतकी-खांडोळा जिल्हा पंचायत मतदारसंघातील निकालानंतर पारंपरिक चेहऱ्यांविषयी मतदारांची नाराजी उघड झाली आणि अपक्ष उमेदवार सुनील जल्मी यांच्या विजयाने अनेकांचे गणित बिघडले. मोठ्या नेत्यांचा फारसा वावर नसतानाही त्यांनी मगो-भाजप युतीच्या उमेदवारावर मात केल्याने स्थानिक पातळीवर ‘व्यक्ती विरुद्ध पक्ष’ असा नवा ट्रेंड सुरू झाल्याची चर्चा आहे. मतदारांना गोविंदही नको आणि पांडुरंगही नकोसा झालाय, त्यामुळेच विविध कार्यक्रमातही सुनील जल्मींनाच पसंदी लाभत आहे. सध्या माजी मंत्री दीपक ढवळीकर विशेष सक्रिय नसल्याने मगोचा पारंपरिक मतदार सुनील जल्मींकडे आहे. कारण प्रियोळात पक्षनिष्ठेपेक्षा स्थानिक चेहरा म्हणून जल्मींना पसंती मिळू लागली आहे. त्यामुळे जाणकार म्हणतात, हे बदलाचे वारे आहेत.
कोटी कोटींची उड्डाणे
एकीकडे केंद्राकडून घेतलेल्या कर्जाची रक्कम प्रत्येक वर्षी वाढत असताना गोवा सरकार विविध महोत्सवांत रंगत चालले आहे. तिकडे कला व संस्कृती खाते, तर अशा महोत्सवांसाठी कोणाकडून प्रस्ताव येतात का याचीच प्रतीक्षा करताना दिसते. महाशिवरात्रीच्या निमित्ताने धारबांदोडा येथे ‘अभंग रिपोस्ट’ कार्यक्रम आयोजित करून त्यावर म्हणे दोन कोटी तर मोपा येथे आयोजित केलेल्या फॉर्म्युला -४ या उपक्रमाच्या सुविधांवर ५४ कोटी खर्च केले. त्यांतून गोव्याला नेमका कोणता फायदा झाला, अशी पृच्छा माध्यमांवरून केली जात आहे. तेवढ्याने भागले नाही, तर त्यानंतर अबूधाबी येथे गेल्यावेळी मुख्यमंत्री डॅा. सावंत यांनी या शृंखलेतील फॅार्म्युला-१ ही स्पर्धा भविष्यांत गोव्यात आयोजित करण्याचे संकेत दिल्याने अनेकांचे डोळे विस्फारले आहेत. हे नेमके काय? व कोणासाठी चालले आहे, असे प्रश्न ते आता करू लागले आहेत.
हरमलचे सुपुत्र
हरमलमध्ये वेश्या व्यवसाय प्रकरणी कारवाई झाली. त्यामुळे गावाचे नाव खराब झाले. याबाबत माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकरांना फारच खंत वाटते. काहीजण तर म्हणतात, हरमलचा सुपुत्र पुन्हा लोकांमध्ये सक्रिय दिसू लागलाय, ही फक्त खंत आहे, की नव्या राजकीय पर्वाची चाहूल? गावातील चहाच्या टपऱ्यांवर चर्चा रंगली आहे, की लोकांना मदत करणारे नेते म्हणून पुन्हा एकदा प्रतिमा उजळवण्याचा प्रयत्न सुरू आहे का? दरम्यान, कार्यकर्त्यांमध्येही हलकीशी चर्चा होती. “साहेबांना गावाचे नाव वाईट झाल्याचे दुःख आहे, पण आता गावाचे नाव पुन्हा उजळवण्याची संधीही आहे!” खंत, सहानुभूती आणि राजकीय गणित हरमलमध्ये सध्या सगळंच ‘मिश्किल’ अंदाजात चर्चेत आहे!
विकासाच्या गुळगुळीत गप्पा
पेडणे ते हरमल हा रस्ता म्हणजे सध्या विकासाच्या गप्पांना दिलेले जिवंत उत्तरच म्हणावे लागेल. दोन वर्षांपासून खड्ड्यांच्या संगतीने नांदणारा हा रस्ता आता रस्ता कमी आणि अडथळा शर्यतीचा सरावपटू जास्त वाटतो. दुचाकीस्वार दररोज जीव मुठीत धरून प्रवास करतात; हेल्मेटसोबत धैर्याचीही गरज भासते. चारचाकीवाल्यांनी तर सस्पेन्शन बदलणे हा जणू वार्षिक सोहळाच मानला आहे. रस्त्यालगतच्या घरांमध्ये धुळीचे असे साम्राज्य पसरले आहे की रोज झाडलोट करणे हा रहिवाशांचा नवा उद्योगच झाला आहे. झाडे, कुंपणे, अंगणाला सगळ्यांनी जणू धुळीचा गणवेश परिधान केला आहे. पावसाळ्यात चिखल, उन्हाळ्यात धूळ आणि उरलेल्या काळात खड्डे, असा सर्वसमावेशक विकास आराखडा तयार करण्यात आला असावा, अशी शंका येते. खेदाची बाब म्हणजे या रस्त्याकडे लक्ष द्यायला अजून तरी प्रशासनाला वेळ मिळालेला नाही. कदाचित उद्घाटनासाठी फीत कापण्यासारखा काही नवीन प्रकल्प तयार झाल्यावरच या रस्त्याची आठवण होईल. तोपर्यंत पेडणेकरांनी “स्वयं-अनुभवातून रस्ता सुधारणा” हा प्रयोगच सुरू ठेवावा लागणार, असे बोलले जात आहे. ∙∙∙
काणकोणात कोणाची ताकद!
काणकोण बसस्थानकावर आराखड्यानुसार न होणारे काम बंद पाडून माजी आमदार विजय पै खोत आणि सामाजिक कार्यकर्ते जनार्दन भंडारी यांनी आपली ताकद दाखवली आहे. खोत व भंडारी या आंदोलनाच्या निमित्ताने एकत्र आल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. काणकोण मतदारसंघात २०२७ मध्ये धक्कादायक निकाल हाती येणार अशी चर्चा गेले काही महिने आहे. अनेक घटक सुप्तपणे तेथे काम करत आहेत. काहींनी आपल्याशी संपर्क असलेल्यांना सक्रिय केले आहे. काणकोण बसस्थानकावरील आराखड्यानुसार न केलेले काम काढून टाकू, असे भंडारी यांनी म्हटले आहे. त्यामुळे काणकोणात कोणाची ताकद असा मुद्दा चर्चेत आला आहे.
कुंकळ्ळीचे पूत
कुंकळ्ळीचे दोन पूत सध्या गोव्यात माध्यमांचे केंद्र बिंदू ठरत आहेत. एक आहेत ‘इनफ इज इनफ’चे पुरस्कर्ते निवृत्त न्यायमूर्ती फर्दिन रिबेलो तर दुसरे आहेत माजी सनदी अधिकारी एल्वीस गोम्स. ते दोघेही सध्या गोवा वाचविण्यासाठी धडपडत आहेत. तिसरे आहेत विरोधी पक्षनेते युरी आलेमांव ते जरी कुंकळ्ळीचे पूत नसले, तरी तेथील आमदार आहेत. विधानसभेत व माध्यमांसमोर संपूर्ण राज्याच्या प्रश्नांना वाचा फोडतात. त्यामुळेच असेल त्यांना कुंकळ्ळीच्या प्रश्नांकडे लक्ष द्यायला सवड मिळत नसेल. पण परवा न्या. रिबेलो यांनी सध्या जटील बनत चाललेल्या कुंकळ्ळीतील वाहतूक कोंडीचा मुद्दा उपस्थित करून आपण संबंधित अधिकाऱ्यांकडे त्याबाबत बोलणार असल्याचे सांगितले. त्यामुळे अनेकांना दिलासाच मिळाला. आजवर युरी असो वा एल्वीसबाब यांचे या समस्येकडे लक्ष कसे गेले नाही? असा प्रश्नही अनेकांना पडला. हा मतदारसंघ भाजपकडे असताना स्व. पर्रिकर यांनी बाळ्ळी ते कुंकळ्ळी रस्ता चारपदरी करण्याची घोषणा केली होती, पण ती पूर्ण झाली तर नाहीच उलट सध्या तो आणखी अरुंद करण्याचे काम सुरु असल्याचा दावा अनेकांनी केला.
परवान्यांचे गुऱ्हाळ असेच चालणार!
हडफडे अग्नीकांडानंतर केवळ सरकारी यंत्रणाच नव्हेत, तर न्यायालयेही सतर्क झाल्याचे दिसून येते. किनारपट्टी भागांतील विनापरवाना बांधकामे व व्यावसायिक आस्थापने यांचा सविस्तर तपशिल सादर करण्याचा आदेश खंडपीठाने संबंधित पंचायतींना दिला आहे. पण आजवरचा अनुभव पाहिला तर कायदा असतो, तेथे पळवाटही असते या न्यायाने अशा आदेशांना काय उत्तर वा स्पष्टीकरण द्यावयाचे त्याबाबत आपल्या पंचायती तरबेज आहेत. कारण आजवर असे अनेक आदेश दिले गेले, पण प्रत्यक्षात कारवाई मात्र मोजकीच झाली, असे अशा प्रकरणांची माहिती असलेले बोलतात. यापूर्वी पदपथ व मोकळ्या जागांवरील गाडे व अतिक्रमणांबाबत एक आदेश दिला, त्यानंतर अतिक्रमणे हटविली गेली खरी. पण त्यानंतर अधिक अतिक्रमणे झाली, पण त्याकडे लक्ष कोणाचेच नाही.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.