पोलिस खात्यातील अधिकाऱ्यांत सध्या दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. कारण उत्तर गोव्यात वरिष्ठ पोलिस ऑफिसरने म्हणे, सर्व पोलिस उपअधीक्षक, निरीक्षक यांना तशी तंबीच दिली आहे. कारण अनेक गुन्हेगारी प्रकरण व पोलिस खात्याशी निगडित माहिती प्रसार माध्यमांपर्यंत पोहचत असल्याने हा अधिकारी सध्या प्रचंड वैतागला आहे. त्यामुळे आपल्या अखत्यारीतील सर्व डीवायएसपी, पीआय यांना अधिकाऱ्याने अप्रत्यक्ष धमकी दिली आहे! तसेच संबंधितांचे मोबाईल फोन टॅपिंग करण्यास सुरुवात केली आहे. मुळात प्रश्न असा पडतो की, हा पोलीस अधिकारी नक्की गुन्हे लपवून काय साध्य करू पाहात आहे, की आपला ट्रॅक रेकॉर्ड चांगला ठेवण्याची ही केविलवाणी धडपड! कारणं काहीही असली तरी या अधिकाऱ्याने पीआय व डीवायएसपी यांची पूर्णतः झोप उडवून दिली आहे. सर्वच बारीक-सारीक गोष्टींमध्ये हा अधिकारी हस्तक्षेप करू लागल्याने सध्या उत्तर गोव्यातील कायदा-सुव्यवस्था बिघडली असून जनतेला पोलिसांकडून न्याय मिळणे अवघड बनले आहे. ∙∙∙
‘सांग सांग भोलानाथ,पाऊस पडेल का? शाळेमध्ये तळे साचून सुट्टी मिळेल का? हे जुने बालगीत आपण ऐकले असणार. गोमंतकीय मुलांना मात्र भोलानाथाला न विचारताच सुट्टी मिळत असल्यामुळे मुले आणि त्यापेक्षा जास्त आमचे शिक्षक खुश. राज्यात पावसाचे थैमान असल्याच्या अंदाजावरून शिक्षण खात्याने राज्यातील शाळांना सुट्टी जाहीर केली. मात्र सरकारने सुट्टी जाहीर केली आणि पाऊस थांबला. गेल्या वर्षीही असेच झाले होते. शाळांना सुट्टी दिल्यामुळे आता शिक्षण खात्यावर टीका व्हायला लागली आहे. वेधशाळेचा अंदाज चुकला की झिंगडे साहेबांचा हिशोब चुकला, असा प्रश्न जनतेला पडला आहे. राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार विजेत्या एका सेवा निवृत्त मुख्याध्यापकाने पावसाचे कारण सांगून शाळेला सुट्टी देणे गैर असल्याचे म्हटले आहे. पाऊस आला की शाळांना सुट्टी देण्याचा निर्णय कोण घेतो? त्याला निकष काय आहेत? मुलांना पावसाचा आनंद लुटायला नको का? असे प्रश्न पालकच विचारू लागलेत. साहेबांनो पावसाला घाबरून शाळा बंद ठेवणे अनुचित नाही का? ‘अंदाज पंचे धाहो दसे’ हा प्रकार बरा नव्हे. ∙∙∙
गोव्यात शंभर वर्षे जुन्या अशा काही इमारती आहेत व त्या अजूनही धडधाकट आहेत. कारण त्यांची देखभाल व डागडुजी वेळेवर व काळजीपूर्वक केली गेली आहे. सरकारी मालकीचे काही निवासी गाळेही तसेच धडधाकट आहेत तर अगदी हल्ली बांधलेले गाळे मोडकळीस आलेले आहेत ही वस्तुस्थिती आहे. अर्थात त्याला बांधकामाचा दर्जाही कारणीभूत आहे, असे त्या क्षेत्रांतील जाणकार सांगत आहेत. पणजीतील जुन्ता हाऊस ही राजधानीतील बहुमजली इमारत ही खरे तर सरकारसाठी अभिमानाची वास्तू . मुक्तीनंतर साठ वर्षांपूर्वी ती बांधली गेली होती. प्रमख कार्यालये या वास्तूंत होती. पण आता म्हणे ती डबघाईस आलेली असून धोकादायक जाहीर केल्याने ती रिकामी करण्याच्या हालचाली सुरु आहेत. ती डबघाईस आली की, तिच्या डागडुजीकड़े दुर्लक्ष करून डबघाईस आणली गेली अशी चर्चा सुरु आहे. अशा जुन्या इमारती पाडून तेथे नवे प्रकल्प आणण्यामागे कोणाचे हितसंबंध तर नाहीत ना असा संशयही अनेकांना येत आहे. ∙∙∙
सरकारने शुक्रवारी सुट्टी दिली – कारण हवामान खात्याचा अंदाज होता की पाऊस धुमाकूळ घालणार! पण प्रत्यक्षात काय? आकाश ढगाळ पण मुसळधार पावसाचा पत्ताच नाही. हवामान खात्याचा अंदाज नेहमीच वाऱ्यावर सोडलेला वाटतो. शाळा बंद पण पाऊस स्वतःच हजेरी लावायला विसरला की काय, अशी शंका आली. शिक्षण खात्याचाही ‘पावसाळी’ सुट्टीचा तत्पर निर्णय पाहून वाटले होते की, पावसाने सगळे वाहून नेणार! पण पाऊसच रजा घेऊन गेला! काहींनी सोशल मीडियात ‘अतिवृष्टी रोखायची तर काय करावे?’ असा सवाल करून त्यावर ‘शाळांना सुट्टी द्या’, असं म्हटलंय. आहे की नामी उपाय. ∙∙∙
विधानसभा निवडणूक होण्यास अजून दोन वर्षे बाकी असली तरी नुवेचे माजी आमदार मिकी पाशेको यांनी आपण बाणावलीतून निवडणूक लढविणार असे जाहीर केले. मिकी यांचे हे वक्तव्य सध्या चर्चेत असतानाच त्यांचे एकेकाळचे ओएसडी असलेले लिंडन माेंतेरो यांनीही आपण नुवेतून निवडणूक लढविणार, अशी घोषणा केली आहे. आता लिंडन आणि मिकी यांच्या घोषणेचा एकमेकांशी काही संबंध आहे का, असा प्रश्न उभा राहू शकतो. कारण त्या दोघांचाही घोषणा करण्याचा टाईमिंग एकच आहे. यावर राजकीय विश्लेषक असलेले राधाराव ग्रासियस यांचे मत म्हणजे, मिकी आणि लिंडन हे दोघेही ‘आम आदमी पक्षा’च्या चिन्हावर निवडणूक लढविणार आहेत. राधाराव म्हणतात, वेंझी काँग्रेस पक्षात गेल्यानंतर ‘आप’ची बाणावलीची जागा रिकामी होणार आहे आणि तिथे त्यांना मिकींना सामावून घेण्यास काहीच अडचण येणार नाही. राधाराव यांनी राजकारणातील कित्येक पावसाळे पाहिले आहेत. त्यामुळे त्यांच्या या विधानाकडे दुर्लक्ष करून चालणार कसे? ∙∙∙
‘झोपलेल्याला जागे करणे सोपे असते. मात्र झोपेचे सोंग घेतलेल्याला कसे जागे करणार?’ असे एक बोध वाक्य आहे. कुंकळ्ळी नगरपालिकेला चौदा नगरसेवक आहेत. क्षमतेपेक्षा ज्यात मनुष्यबळ आहे. मोठ्या हृदयाचे अधिकारी हात आणि महत्वाचे म्हणजे पालिकेवर विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांच्या समर्थक नगरसेवकांची सत्ता आहे. असे असले तरी पालिका क्षेत्रात कामे वेळेवर होत नाहीत, अशा जनतेच्या तक्रारी आहेत. पालिकेच्या निष्क्रियतेवर वर्तमानपत्रात व समाज माध्यमांवर चर्चा रंगते. मात्र कोणाचे सोयर सुतक कोणाला नसते. परवा जेव्हा मुसळधार पाऊस पडला, त्या पावसात नदीला पूर आल्यामुळे भिवसा भागातील काही घरांत पाणी शिरले. अलाहाबाद उच्च न्यायालयाचे सेवा निवृत्त मुख्य न्यायाधीश फेर्दिन रिबेलो यांच्या घरा पुढील रस्ता पाण्याखाली गेला.अनेकदा तक्रार करूनही पालिकेने दखल घेतली नाही, म्हणून सेवा निवृत्त न्यायाधीश रिबेलो यांनी सोशल मीडियावर आपली कैफियत मांडणारी पोस्ट टाकली आणि झोपी गेलेल्या पालिकेला जाग आली. एका सोशल मीडिया पोस्टने पालिका अधिकाऱ्यांसह सगळ्या अधिकाऱ्यांची झोप उडवली. ∙∙∙
गोव्यात अनेक संघटना व संस्था अशा आहेत की तेथे अध्यक्ष वर्षानुवर्षे तोच आहे. बरे रितसर निवडणूक होऊन एकमताने ती निवड होते त्यामुळे कोणी हरकत घेण्याचे कारणही नाही. काही शिक्षणसंस्थाही या पंक्तीत येतात खरे. आता अशा संस्थांच्या आमसभेला किती जण हजर असतात तो संशोधनाचा मुद्दा ठरेल. काही बॅंकात एकाच व्यक्तीला अधिक कार्यकाळ त्या पदावर राहता येत नाही अशीही तरतूद होती. पण त्यावर कायदा तेथे पळवाटही असतेच म्हणतात. तर अशा संस्थांनी मग त्यावर उपाय म्हणून एक कार्यकाळ नामधारी दुस-या ला आणले व नंतर पुन्हा पूर्वीची व्यक्ती आणली गेली. अशा संस्थांनी गाशा गुंडाळला ही गोष्ट वेगळी. तर सांगण्याचा मुद्दा म्हणजे उटा संघटनेचे असे प्रकरण आता निबंधकांकडे पोचले. त्यावर निकाल काहीही लागो पण शेवटी प्रत्येकाचे हितसंबंध खुर्चीतच अडकलेले असतात हे खरे. ∙∙∙
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.