Goa Cyber Crime: सायबर फसवणूक प्रकरणी गोवा पोलिसांनी मोठी कारवाई केली. 1 कोटी 52 लाख रुपयांच्या मोठ्या सायबर फसवणूक प्रकरणात मुंबईतून एकाच्या मुसक्या आवळल्या. ऑनलाईन गुंतवणुकीच्या खोट्या आश्वासनांद्वारे फसवणूक करणाऱ्या टोळीचा हा भाग असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
दरम्यान, 26 सप्टेंबर 2025 रोजी मडगाव येथील एका तक्रारदाराने सायबर क्राईम पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या तक्रारीनुसार, 00447XXXXXXX6, 00447XXXXX718, 00919XXXXXX2, 004473XXXXX73 आणि इतर काही अज्ञात मोबाईल व व्हॉट्सअॅप नंबर वापरणाऱ्या व्यक्तींनी तक्रारदाराला ऑनलाइन गुंतवणुकीवर जास्त परतावा देण्याचे खोटे आमिष दाखवले. आरोपींच्या आमिषाला बळी पडून तक्रारदाराने वेळोवेळी अनेक मोठे व्यवहार केले. मात्र, जेव्हा तक्रारदाराने गुंतवलेली रक्कम परत मागितली, तेव्हा आरोपींनी पैसे काढण्यासाठी अतिरिक्त रक्कम भरण्याची मागणी करण्यास सुरुवात केली. या फसवणुकीमुळे तक्रारदाराचे एकूण 1,52,00,000 इतके मोठे आर्थिक नुकसान झाले.
दुसरीकडे, सायबर क्राईम पोलीस ठाण्याच्या पथकाने तक्रारीच्या आधारे तांत्रिक व आर्थिक विश्लेषण करत त्वरित तपास सुरु केला. पोलीस उपनिरीक्षक अनिल पोळेकर यांच्या नेतृत्वाखालील पथकाने तात्काळ मुंबई गाठले. पोलिसांनी मुंबईच्या बोरिवली पश्चिम भागातून रॉनी फिलिप सिक्वेरा (वय-65, रा. औदुंबर, छाया, सीएचएस बिल्डिंग, आयसी कॉलनी रोड, मुंबई) या आरोपीला अटक केली. प्राथमिक तपास आणि तांत्रिक विश्लेषणात रॉनी सिक्वेरा याच्या बँक खात्यात या फसवणुकीतील 35,00,000 जमा झाल्याचे उघड झाले.
प्राथमिक तपासणीत असेही आढळून आले की, आरोपी रॉनी सिक्वेरा हा त्याच्या पत्नीसह अन्य दोन राज्यांमध्ये अशाच प्रकारच्या सायबर गुन्ह्यांमध्ये सहभागी आहे. हा संपूर्ण तपास पोलीस अधीक्षक (SP) राहुल गुप्ता, अप्पर पोलीस अधीक्षक (ASP) श्रीमती बी. व्ही. श्रीदेवी, आयपीएस आणि सायबर क्राईम पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक (PI) दीपक पेडणेकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आला. अटक केलेल्या आरोपीला कोर्टात हजर करुन पोलीस कोठडी घेण्यात आली असून पोलीस निरीक्षक दीपक पेडणेकर यांच्या देखरेखीखाली पुढील सखोल तपास सुरु आहे. या रॅकेटमधील इतर सहभागींचा शोध पोलीस घेत आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.