पेडणे, अनेक वर्षे रेंगाळलेला तुये हॉस्पिटल प्रकल्प येत्या १५ ऑगस्टपूर्वी पूर्णपणे मार्गी न लागल्यास १५ सप्टेंबरपासून याविरुद्धचे आंदोलन तीव्र करण्याचा निर्णय रविवारी झालेल्या तुये नागरिक समिती आणि पेडणे नागरिक समितीने घेतलेल्या संयुक्त बैठकीत घेण्यात आला.
तत्पूर्वी याविषयी येत्या दोन दिवसांत मुख्यमंत्री तसेच आरोग्यमंत्र्यांना तुये हॉस्पिटल कृती समितीतर्फे निवेदन सादर करण्यात येणार आहे. यासाठी बैठकीनंतर कृती समिती स्थापन करण्यात आली.
या बैठकीत माजी मुख्यमंत्री प्रा. लक्ष्मीकांत पार्सेकर, आपचे गोवा प्रदेश अध्यक्ष ॲड. अमित पालेकर, कार्यकारी अध्यक्ष वाल्मिकी नाईक, मांद्रेचे सरपंच प्रशांत नाईक, माजी सरपंच ॲड. अमित सावंत, बाबी बागकर, भारत बागकर, प्रमेश मयेकर, तुयेचे पंच नीलेश कांदोळकर, देवेंद्र प्रभुदेसाई, ॲड. प्रसाद शहापूरकर,
ॲड. जितेंद्र गावकर, भास्कर नारूलकर, व्यंकटेश नाईक, देवेंद्र प्रभुदेसाई, जुझे लोबो, अमोल राऊत, सुहास नाईक, अमोल राऊत, चिंतामणी पोळजी, विलासिनी नाईक, जगन्नाथ पार्सेकर, डॉ. मेलविन डिसोझा, राजमोहन शेट्ये, नारायण रेडकर, डायगो मेंडोन्सा, डॅनियल डिसोझा, स्नेहा नाईक, शालन साळगावकर यांनी याप्रसंगी आपले विचार मांडून हॉस्पिटल सुरू होईपर्यंत आंदोलन तीव्र करण्यासंबंधी विचार मांडले.
७७ कोटींपेक्षा जास्त खर्च करून उभारलेला आणि गोवा वैद्यकीय महाविद्यालयाशी संलग्न असलेला तुये हॉस्पिटल प्रकल्प कार्यान्वित व्हावा यासाठी पेडणेकरांनी संघटितपणे कार्य करण्याची गरज यावेळी अनेकांनी व्यक्त केली. देवेंद्र प्रभुदेसाई यांनी १५ ऑगस्टपर्यंत या हॉस्पिटलबाबत सरकारकडून ठोस आश्वासन मिळाले नाही, तर आंदोलन तीव्र करण्याचा निर्णय घेण्याची घोषणा केली.
तोपर्यंत मी आंदोलनात ः पार्सेकर
माजी मुख्यमंत्री प्रा. लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी या प्रकल्पाची माहिती देताना केवळ पेडणे तालुक्याच्या सामान्य नागरिकांचे आरोग्य डोळ्यासमोर ठेवून प्रकल्प मार्गी लावला, पण दुर्दैवाने गेली अनेक वर्षे हा प्रकल्प धूळ खात पडला आहे याचे गांभीर्य लक्षात घेऊन पुढील कृती करण्याची गरज आहे. मला यात राजकारण करायचे नाही, आपण हा प्रकल्प कार्यान्वित होईपर्यंत तुये आणि पेडणेवासीयांबरोबर राहीन. त्यासाठी आपण एकत्रितपणे हा प्रकल्प पूर्ण करण्याचा संकल्प करूया.
स्वतः डॉकटर असणाऱ्या मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी राजकीय द्वेष बाजूला ठेवून सर्वसामान्य पेडणेकरांच्या जीवनाशी निगडीत असलेला हा प्रकल्प विनाविलंब कार्यान्वित करावा, अन्यथा पुढील परिणामास सज्ज रहावे.
- वाल्मिकी नाईक, कार्यकारी अध्यक्ष, आप
सध्या मुख्यमंत्री आणि आरोग्यमंत्री यांच्यातील शितयुद्धामुळे गोमंतकीयांचे आरोग्य धोक्यात आले आहे. तुये हॉस्पिटल प्रकल्पाविषयी ठोस आश्वासन मिळत नाही, तोपर्यंत हा लढा आपण चालू ठेवूया.
- अमित पालेकर, प्रदेशाध्यक्ष आम आदमी पार्टी
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.