देशातील निवडणुका ईव्हीएम यंत्राद्वारे न घेता मतपत्रिकेने घ्याव्यात या मागणीसाठी सोमवारी पणजीत आंदोलन छेडले गेले.
या आंदोलनामुळे राजधानी पणजीसह अल्तिन्हो परिसरात काही काळ तणावाचे वातावरण तयार झाले होते. घोषणाबाजी करत अल्तिन्हो येथील निवडणूक आयोगावर मोर्चा नेण्याचा प्रयत्न करणाऱ्या आंदोलकांना यावेळी पोलिसांनी रोखले.
निवडणूक आयुक्तांना भेटून त्यांना आमच्या मागण्या त्यांच्यापर्यंत पोहोचवायच्या असल्याचे आंदोलकांनी सांगितल्यावर अखेर पोलिसांनी पाच सदस्यांच्या शिष्टमंडळाला निवडणूक आयुक्तांना भेटण्यासाठी परवानगी दिली.
आंदोलनात भानू प्रताप सिंग, सावियो कुतिन्हो, रामा काणकोणकर, तनोज अडवलपालकर यांच्या सह अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.
सर्वोच्य न्यायालयाचे वकील आणि देशभर हे आंदोलन करणारे भानू प्रताप सिंग यांनी पत्रकारांशी संवाद साधताना असे सांगितले की, 'सध्या देशात EVM यंत्राविषयी संभ्रम निर्माण झाला आहे.
देशातील जागृत नागरिक या EVM मशीन द्वारे होणाऱ्या निवडणूक प्रक्रियेच्या विरोधात आहोत. EVM रद्द करा आणि मतदानपेपरवर निवडणूक घ्या ही आमची मागणी असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले. या बाबत सकाळी आम्ही आझाद मैदानात बैठक घेतली.
यापुढे ते म्हणाले, सरकारी अधिकारी हे जनतेचे नोकर असतात. जनतेने त्यांना भेटणे किंवा त्यांच्यासमोर आपल्या मागण्या मांडणे यात काहीही बेकायदेशीर नाही.
आम्ही निवडणूक अधिकाऱ्यांना सुमारे 1 लाख लोकांच्या सह्या असणारे पत्र देणार आहोत. हे पत्र राष्ट्रपतींना संबोधित केले असून निवडणूक अधिकारी ते त्यांच्यापर्यंत पोहोचतील अशी आमची आशा आहे.
तर या आंदोलनातील एक आंदोलक रामा काणकोणकर म्हणाले की, आम्ही शांततामय मार्गाने आमच्या मागण्या मांडत होतो. तरी पोलिसांनी आम्हाला रोखले.
आम्हाला निवडणूक अधिकाऱ्यांना केवळ निवेदन द्यायचे आहे. मात्र यामध्ये आम्ही कोणता कायदा मोडला म्हणून पोलीस आम्हाला अडवत आहेत हे समजत नाही.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.