Goa Panchayat Election : राज्यातील 186 पंचायतींसाठी 10 ऑगस्ट रोजी मतदान होणार आहे. यासाठीचे मतपत्रिका, मतपेट्या आणि मतदानासाठी लागणारे इतर साहित्य मामलेदारांकडे रवाना झाले असून ते त्यांच्या स्ट्रॉँग रूममध्ये राहिल. हे साहित्य 9 ऑगस्टला दुपारी संबंधित मतदान अधिकारी त्या-त्या मतदान केंद्राकडे कर्मचाऱ्यांसह पाठवतील. सोमवारी पाच वाजता पंचायत निवडणुकीसाठीचा जाहीर प्रचार बंद होणार आहे.
निवडणूक सहाय्यक संचालक सागर गुरव यांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यातील 186 पंचायतींच्या 1528 प्रभागांपैकी 64 प्रभागातील उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. आता 1464 प्रभागातील 5038 उमेदवार आपले भवितव्य आजमावत आहेत. बाराही तालुक्यांमधील तालुक्याच्या ठिकाणी मतदानासाठी लागणारे मतपत्रिका, मतदान पेट्या आणि इतर साहित्य संबंधित मामलेदारांकडे पाठवण्यात आले आहे. 9 ऑगस्ट रोजी दुपारनंतर त्यांचे वितरण सुरू होईल.
10 व 12 ऑगस्टला ड्राय डे
पंचायत निवडणुकीसाठी 10 आणि 12 ऑगस्ट रोजी पंचायत क्षेत्रांमध्ये दारूबंदी लागू करण्यात आली आहे. याशिवाय मतदानादिवशी सर्व मतदान केंद्रापासून 200 मीटर अंतरातील सर्व व्यावसायिक दुकाने, अन्नपदार्थांची दुकाने पूर्णपणे बंद राहणार आहेत असेही निवडणूक आयोगाने जाहीर केले आहे
येथे होणार मतमोजणी
उत्तर गोवा
तिसवाडी : डॉ.शामाप्रसाद मुखर्जी स्टेडिअम, बांबोळी. सत्तरी : कंदबा बसस्थानक सभागृह, वाळपई. बार्देश : पेडे स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, पेडे. पेडणे : सोयरोबानाथ आंबिये शासकीय महाविद्यालय, विर्नोडा. डिचोली : नारायणे झांट्ये महाविद्यालय वठादेव सर्वण
दक्षिण गोवा
सांगे : शासकीय क्रीडा कॉम्प्लेक्स, खैरीकाटे. धारबांदोडा : शासकीय कार्यालय कॉम्पल्केस, धारबांदोडा. सासष्टी : माथानी साल्ढाना प्रशासकीय इमारत, मडगाव.
फोंडा : शासकीय आयटीआय फर्मागुढी, फोंडा. काणकोण : मामलेदार कार्यालय, काणकोण. केपे : शासकीय क्रीडा कॉम्प्लेक्स, बोरमोळ-केपे. मुरगाव : रविंद्र भवन, मुरगाव
30 मतदान केंद्रे संवेदनशील
1049 ठिकाणी 1566 मतदान केंद्र उभारले आहेत. यातील 30 मतदान केंद्रे संवेदनशील आहेत. यासाठी 10,700 कर्मचारी तैनात केले जातील. 21 निवडणूक अधिकारी म्हणून कार्यरत असतील तर 12 तालुक्यांमध्ये प्रत्येकी एक याप्रमाणे 12 निवडणूक निरीक्षक म्हणून यापूर्वीच जाहीर केले आहेत.
पक्ष समर्थकांचे पॅनल
पंचायत निवडणुका पक्षीय पातळीवर लढवल्या जात नसल्या तरी बहुतांश पक्षांनी आपल्या समर्थकांचे पॅनल या निवडणुकीत उतरवले आहेत.
सत्ताधारी भाजप यात आघाडीवर असून त्यांनी आपले मंत्री, आमदार आणि विधानसभा मंडळ अध्यक्षांना याकामी जुंपले आहे. तुलनात्मकदृष्ट्या मुख्य विरोधक असलेल्या काँग्रेसमध्ये या निवडणुकीसाठी उत्साहाचे वातावरण दिसत नाही.
तर गोवा फॉरवर्ड, आरजी, मगोप आणि आप आमदारांनी आपापल्या मतदारसंघातील आपल्या समर्थकांचे पॅनल उतरवून निवडणुकीत चूरस निर्माण केली आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.