Goa Crime News: बनावट कॉल सेंटर सुरू करून अमेरिकन नागरिकांची लूट करणाऱ्या 19 ते 26 वयोगटातील तरुणांच्या टोळीचा क्राईम ब्रँचने छापा टाकून पर्दाफाश केला. चिंचवाडा-चिंबल येथील या कारवाईत नागालँड व अहमदाबाद येथील सहाजणांच्या मुसक्या आवळण्यात आल्या. या टोळीकडून 6 लॅपटॉप्स, मोबाईल्स तसेच इतर सामग्री मिळून सुमारे 10 लाखांचा ऐवज जप्त करण्यात आला.
अटक केलेल्यांमध्ये आकाश हितेशभाई पंचोली (28), थ्रेंम्हो केचिंग्बा (23), सनम रिंग्सा बथारी (23), आनंद सुजित सेन्ग्यून्ग (26), लईरिम मनमोहन होजाई (19) व हेमरिंग सोनाई गिरीसा (२२) यांचा समावेश आहे.
दहा दिवसांपूर्वी संशयितांनी चिंचवाडा येथे बंगला भाड्याने घेऊन तेथे कॉल सेंटर सुरू केले होते. अमेरिकन नागरिकांना त्यांचे कर्ज तसेच वैद्यकीय बिले मंजूर करण्याचे आमिष दाखवून त्यांच्याकडून पैसे घेतले जात होते.
या टोळीचे संबंध अमेरिकेतील काही भारतीय नागरिकांशी आहेत. ते या टोळीला तेथील अमेरिकन नागरिकांनी कर्ज तसेच वैद्यकीय बिलांसाठी ऑनलाईन पद्धतीने केलेली माहिती पुरवत होते, असे चौकशीत उघड झाले आहे.
चिंबल येथे एका बंगल्यात उत्तर भारतातील काही तरुणांचा गट राहात असून ते रात्रीच्यावेळी बंगल्यात काहीतरी संशयास्पद हालचाली करत असल्याची माहिती क्राईम ब्रँचला मिळाली होती. त्यानुसार बुधवारी मध्यरात्री पोलिस पथकाने या बंगल्यावर छापा टाकला.
सात लाख लंपास : रावणफोंड येथून एटीएम मशीन पळवले
गोव्यात सध्या सुरक्षा रक्षक नसल्याचे हेरून बँकांची एटीएम मशीन्स चोरण्याच्या घटना वाढल्या असतानाच बुधवारी रात्री रावणफोंड मिलिटरी कॅम्पजवळ भर रस्त्यालगत असलेल्या आयसीआयसीआय बँकेचे एटीएम मशीन अज्ञात चोरांनी उखडून नेल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली. मशीनमधील सुमारे सात लाख रुपयांवर चोरांनी डल्ला मारल्याची माहिती मिळाली आहे.
चोरांनी हे मशीन फोडून त्यातील रक्कम पळवली. नंतर फोडलेले रिकामे मशीन चोरांनी दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या नेसाय येथील रेल्वे पुलाजवळच्या दाट झाडीत फेकून दिले.
चोरीचे मशीन वाहून नेण्यासाठी ज्या गाडीचा वापर करण्यात आला, ती गाडीही चोरीचीच असल्याचे उघडकीस आले असून काम झाल्यावर चोरांनी ही गाडी कोकण रेल्वे स्थानकाजवळ सोडून दिली.
ही गाडी पोलिसांनी जप्त केली आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी श्वानपथकाला पाचारण करून चोरांचा माग घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, धागेदोरे हाती आले नाहीत. पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.