Amol Gole IFFI 2022 |Goa News
Amol Gole IFFI 2022 |Goa News Dainik Gomantak
गोवा

Amol Gole IFFI 2022: शिक्षणाचा ध्यास बाळगणारी ‘सुमी‘

विलास ओहाळ

Amol Gole IFFI 2022: खेडेगावातील मुलीचे सातवीपर्यंतचे शिक्षण झाल्यानंतर पुढील शिक्षण घेण्याची तिची तळमळ ‘सुमी’ या चित्रपटातून मांडण्यात आली आहे. एखादा विषय लहान मुलांच्या माध्यमातून सर्वांपर्यंत पोहोचविणे शक्य होते. त्यासाठीच लहान मुलांचा चित्रपट दिग्दर्शित करण्याचे ठरविल्याचे अमोल गोळे यांनी ‘गोमन्तक''ला सांगितले

उत्कृष्ट बालचित्रपट म्हणून राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त ‘सुमी’ या चित्रपटाचा प्रीमियर उद्या शनिवारी इफ्फीमध्ये होत आहे. त्यानिमित्ताने अमोल गोळे यांनी सांगितले की, संजीव झा यांच्याकडील हिंदीत असलेल्या मूळ कथेवर आधारीत हा मराठी चित्रपट बेतलेला आहे. सहा वर्षांपूर्वी झा यांनी आपल्याला ही कथा ऐकवली होती.

हा चित्रपट करण्याचे मनात सतत घोळत होते. यापूर्वी आपण अमोल गुप्ते यांच्याबरोबर ‘तारे जमीन पर'' या चित्रपटासाठी साहायक दिग्दर्शक म्हणून काम केले होते. ‘स्टॅन्‍ली का डब्बा’ हा चित्रपट दिग्दर्शित केला. शिवाय गुप्ते यांचा हवाहवाई, एलिझाबेथ एकादशी आणि रत्नाकर मतकरी यांचा इन्व्हेस्टमेंट असे लहान मुलांचे चित्रपट दिग्दर्शित केले आहेत.

अमोल गुप्ते यांच्‍यामुळे मी लहान मुलांच्‍या चित्रपटांकडे वळलो. सामाजिकदृष्ट्या ज्या गोष्‍टी मोठ्यांना बोलणे शक्य नसते, त्‍या आपण लहान मुलांकडून वदवून घेऊ शकतो. त्यामुळे अशा चित्रपटांना चांगला स्पेस मिळू शकतो, असे गोळे म्‍हणाले.

‘सुमी’ चित्रपटाचे वैशिष्ट्य म्हणजे, या मुलीच्या गावात रस्ते नाहीत, सुविधा नाहीत. सातवीपर्यंत शाळा आहे. त्यानंतरच्या शिक्षणासाठीची तिची धडपड सुरू होते. आई-वडिलांना विनंती करून ती पुढील शिक्षणासाठी घराबाहेर पडते असे सांगून मुंबई आणि नाशिकमधील भातसा धरण परिसरातील आदिवासी पट्ट्यात असलेल्या शहापूर गावात या चित्रपटाचे चित्रीकरण करण्यात आल्‍याचे गोळे यांनी स्‍पष्‍ट केले.

सदर चित्रपट तयार झाल्यानंतर आम्ही तो इफ्फीसाठीच पाठविला होता. पुणे फिल्म फेस्टिव्हलमध्ये तो पाठवायचा होता, परंतु लॉकडाऊनमुळे तो महोत्सव ऑनलाईन होणार होता. आम्ही इफ्फीला तो पाठविला.

‘प्लॅनेट मराठी‘ या ओटीटी प्लॅटफॉर्मने हा चित्रपट घेतला असून, तो बालदिनापासून सुरू झाला आहे. चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित करण्यास बऱ्याच अडचणी आहेत. जून 2023 पर्यंत एकही शुक्रवार मिळणार नाही. त्यामुळे लहान मुलांचा हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित होण्‍यासाठी वाट पाहावी लागेल असे अमोल गोळे यांनी सांगितले.

मुंबईत मराठी टक्का किती?

मुंबईत थिएटरमध्ये मराठी चित्रपट दाखविण्यावरून निर्माण झालेल्‍या वादाबाबत बोलताना अमोल गोळे यांनी, मुंबईत मराठी टक्का पूर्ण आहे का? असा सवाल केला. मुंबई हे मोठे शहर असल्याने तेथे थिएटर मिळणे अवघड होते.

‘नशीबवान’ हा चित्रपट प्रदर्शित झाला तेव्‍हा मुंबईतील दीडशे थिएटर्स रजनीकांतच्या चित्रपटांनी अडविली होती. लोक त्यांच्या आवडीचे चित्रपट पाहणारच. हाच चित्रपट पाहा, म्हणून आपण त्यांच्या डोक्यावर बंदूक ठेवू शकत नाही. खूप तर मराठी माणूस चित्रपट पाहण्यासाठी उठून जात नाही हे आपण दुर्भाग्य म्हणू शकतो.

दुसऱ्याला दोष देण्यापेक्षा आपण आपल्या चित्रपटाचे प्रमोशन किती प्रभावीपणे करू शकतो, याकडे लक्ष दिले तर योग्य ठरेल, असे अमोल गोळे म्हणाले.

सिनेमा थिएटरपुरता मर्यादित नाही

सिनेमांचा व्यवसाय हा आता थिएटरपुरता मर्यादित राहिलेला नाही. थिएटरमध्ये चित्रपट प्रदर्शित करण्याव्यतिरिक्त 72 हक्क आहेत. वेगवेगळे हक्क असल्याने दिग्दर्शक आणि निर्माते सध्या या त्‍यातून आपण किती व्यवसाय करू शकतो, याचे गणित मांडत असतात.

केवळ बॉक्स ऑफिसवर अवलंबून न राहता वेगवेगळ्या मार्गांतून आपण आपली गुंतवणूक परत मिळवू शकतो का, याचाही विचार यात होतो, असे अमोल गोळे यांनी सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Margao News : जनाधार कमी झाल्‍यानेच फळदेसाईंचे आरोप; सावित्री कवळेकर यांचा दावा

Siolim Water shortage : सागर उशाला; तरी कोरड पडलीय घशाला! आसगाव, शापोरावासीयांची व्यथा

Panaji News : पाटकर यांनी माफी मागावी; आमोणकरांची मागणी

Bicholim Factory Explosion : डिचोलीतील दुर्घटना; कारखान्यात सलग चार स्फोट

Video: मुंबई हल्ल्याचा मास्टरमाइंड हाफिज सईदने पुन्हा ओकली गरळ; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल!

SCROLL FOR NEXT