पणजी: हडफडेतील बर्च बाय रोमियो लेन क्लबला आग लागून २५ जणांचा मृत्यू प्रकरणासह बेकायदेशीररित्या सुरू असलेले भू-संपादन, वाढती बेरोजगारी, ढासळती अर्थव्यवस्था, पर्यावरण हानी, कायदा-सुव्यवस्था यांसारख्या मुद्द्यांवर राज्य सरकारला येत्या अधिवेशनात घेरण्याची रणनीती विरोधी आमदारांनी मंगळवारी विधानसभा संकुलातील बैठकीत आखली.
विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीला काँग्रेस आमदार कार्लुस फेरेरा, एल्टन डिकॉस्ता, गोवा फॉरवर्डचे आमदार विजय सरदेसाई, रिव्हॉल्युशनरी गोवन्सचे (आरजीपी) आमदार वीरेश बोरकर आणि आम आदमी पक्षाचे आमदार वेंझी व्हिएगस उपस्थित होते.
गत महिन्यात हडफडे येथील बर्च क्लबला आग लागून त्यात २५ जणांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे जागतिक पर्यटन केंद्र असलेल्या गोव्याची प्रतिमा जगभर मलीन झाली. त्यामुळे १२ जानेवारीपासून सुरू होणाऱ्या विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनात याबाबत सरकारला जाब विचारण्याचा निर्णय सर्वच विरोधी आमदारांनी बैठकीत घेतल्याची माहिती विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी दिली.
अधिवेशनात सर्वच विरोधी आमदार संघटितररित्या गोमंतकीयांच्या हितासाठी महत्त्वपूर्ण असलेले मुद्दे हाती घेऊन जनतेला न्याय मिळवून देतील. सत्ताधाऱ्यांकडे सध्या ३३ आमदारांचे बळ असले तरी अधिवेशनात त्यांना पूर्णपणे अपयशी ठरवू, असा विश्वास आलेमाव यांनी व्यक्त केला.
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार खाण व्यवसाय ठप्प झाल्यानंतर पर्यटन व्यवसाय राज्याच्या अर्थव्यवस्थेचा प्रमुख कणा बनला होता. परंतु, राज्य सरकारने हा कणाच मोडून टाकला आहे. सरकारी कर्मचाऱ्यांना वेतन देण्यासाठीही कर्ज घ्यावे लागत आहे. सरकारच्या चुकीच्या धोरणांचा फटका राज्याचा विकास आणि जनतेला सहन करावा लागत असल्याची टीकाही आलेमाव यांनी केली.
बेकायदा जमीन रूपांतरण करून आणि मेगा प्रकल्पांना परवानगी देऊन सरकारने गोवा भांडवलदारांना विकण्याचा घाट घातला आहे. त्यामुळेच स्थानिकांना आपली गावे वाचवण्यासाठी, पर्यावरणाची हानी रोखण्यासाठी आंदोलने करावी लागत आहेत. त्यामुळेच या मुद्द्यांवर आम्ही आवाज उठवणार असल्याचेही आलेमाव यांनी नमूद केले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.