Khari Kujbuj Political Satire  Dainik Gomantak
गोवा

Goa Politics: खरी कुजबुज; तिसरा ‘लाॅटरी जिल्‍हा’ केला तर...?

Khari Kujbuj Political Satire: भाजपचे युरोपच्या आठवडाभराच्या दौऱ्यानंतर परतलेले प्रदेशाध्यक्ष दामू नाईक सोमवारी विधानसभेत अवतीर्ण झाले. त्यानी विधानसभेच्या गॅलरीत बसून काहीवेळ कामकाजही पाहिले.

Sameer Panditrao

तिसरा ‘लाॅटरी जिल्‍हा’ केला तर...?

गोव्‍यात तिसरा जिल्‍हा स्‍थापन करावा की नाही, यावर बऱ्याच उलट सुलट प्रतिक्रिया आतापर्यंत ब्रेक झाल्‍या आहेत आणि त्‍या पाहता तिसरा जिल्‍हा हाच आता चेष्‍टेचा विषय तर बनला नाही ना अशी शंका यावी. या सर्व पार्श्‍वभूमीवर दोन दिवसांपूर्वी केपे येथे गणेशचतुर्थीच्‍या लॉटरी खरेदी करण्‍यासाठी सकाळपासून सायंकाळपर्यंत लोकांची रांग लागलेली होती. त्‍यावर एकाने उत्‍कृष्‍ट अशी प्रतिक्रिया व्‍यक्‍त करताना, ‘कुडचडे, सावर्डे, सांगे आणि केपे या चारही ठिकाणी गणेश चतुर्थीच्‍या लाॅटरीसाठी लोकांची गर्दी उसळली ते पाहता ही चारही ठिकाणे एकत्र करुन एक लॉटरी जिल्‍हा म्‍हणून जाहीर केला तर...?’ आहे की नाही लक्षवेधी प्रतिक्रिया. ∙∙∙

दामू विधानसभेत!

भाजपचे युरोपच्या आठवडाभराच्या दौऱ्यानंतर परतलेले प्रदेशाध्यक्ष दामू नाईक सोमवारी विधानसभेत अवतीर्ण झाले. त्यानी विधानसभेच्या गॅलरीत बसून काहीवेळ कामकाजही पाहिले. ते आले तेव्हा नेमके कुडचड्याचे आमदार नीलेश काब्राल सत्ताधारी आमदार असूनही तावातावाने आपली बाजू मांडत होते. त्याला मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत संयमाने उत्तर देत होते. हे चित्र दामू यांनी पाहिले. ते आले त्यानंतर काही वेळाने उत्तर गोवा जिल्हा पंचायतीचे अध्यक्ष धाकू मडकईकर तेथे आले. मात्र दामू निघून गेल्यानंतर त्यांनीही निघून जाणे पसंत केले. यापूर्वी अधिवेशनावेळी तत्कालीन प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांचा विधानसभा संकुलात नियमित वावर असायचा त्याची आठवण सोमवारी आल्यावाचून अनेकांना राहिली नाही. ∙∙∙

नारळ महागला; माकडांमुळे!

गोव्याच्या खाद्य संस्कृतीतील अविभाज्य घटक म्हणजे नारळ. बहुतांशी सर्व पदार्थांत खोबऱ्याचा वापर हमखास केला जातो. परंतु आता ऐन सणासुदीच्या कालावधीत आणि चतुर्थीच्या तोंडावर राज्यात नारळांचा तुटवडा भासत आहे. राज्यात तामिळनाडू आणि कारवारमधून नारळ आयात केले जात आहेत. नारळाचा तुटवडा हा उत्पादन घटल्यामुळे नव्हे तर माकडांमुळे होणाऱ्या नासाडीमुळे प्रामुख्याने होत आहे. माकडांच्या उपद्रवातून नारळाचे पीक वाचवण्यास कोणीच पुढे येणारा वाली उरलेला नाही. माकडांपासून पीक वाचविण्यासाठी कोणत्याही प्रकारची फवारणी, उपकरण अजून तरी अस्तित्वात नाही. हा प्रकार असाच सुरू राहिल्यास येत्या काही वर्षात कृषी खात्याला माकडांमुळे होणाऱ्या पीक नुकसानीसाठी ‘शेतकरी आधार निधी’तून शेतकऱ्यांना अर्थसाह्य करण्याची वेळ येईल, असे बोलले जातेय. ∙∙∙

पावसापासून वाचण्यासाठी

पणजी महापालिकेच्या बाजार संकुलाकडे दुर्लक्ष झाले आहे. कदाचित या संकुलात महापालिकेला भाडे मिळत नसल्यामुळे असे होत असावे. भर पावसात पावसाचे पाणी या मार्केटमध्ये शिरू लागले आहे. त्यातून व्यापाऱ्यांना वाचवण्यासाठी अनोखी शक्कल लढवण्यात आली आहे. प्लास्टिकचे छत उभारून त्याचे पाणी एका बादलीत गोळा होईल, अशी व्यवस्था करण्यात आली आहे. पणजी शहराच्या बाजूने बाजाराच्या इमारतीत शिरल्याबरोबर उजव्या हाताला ही आगळी वेगळी व्यवस्था दृष्टीस पडते आणि बाजाराची इमारत गळू लागल्याचा साक्षात्कार होतो. ∙∙∙

‘रेंट अ कार’चा नवा भांडाफोड

कॉंग्रेस नेते अमित पाटकर हे कोणत्याही प्रश्नाचे राजकारण व नंतर आक्रस्ताळेपणा अधिक करतात, असे म्हटले जाते. पण परवा त्यांनी गोव्यांतील ‘रेंट अ कार’ प्रकरणाचा जो भांडाफोड केला आहे तो सरकारसाठी खचितच नामुष्कीचा असल्याची चर्चा सुरू झाली आहे. पाटकर यांनी आकडेवारीसह केलेले आरोप विशेषकरून वाहतूक मंत्र्यांची गोची करणारे आहेत, असेही म्हटले जाते. पण आजवर वाहतूक मंत्री अनेक प्रकरणातून सहीसलामत बाहेर पडलेले आहेत व त्यामुळे हे प्रकरण म्हणजे त्यांना किस झाडकी पत्ती असेल अशीही चर्चा आहे. गोव्यात बनावट ‘रेंट अ कार’ फिरतात, असा आरोप फार पूर्वींपासून होतो. पण तो अजून सिध्द झालेला नाही एवढेच. पण खरेच जर सहा हजारांवर अशी वाहने असतील व सरकार तो आरोप खोटा असल्याचे म्हणत असेल तर या सर्व वाहनांच्या मालकांची नावे व पत्ते का जाहीर करू नयेत, अशी जर कोणी मागणी केली तर ती चुकीची म्हणता येणार नाही. मावीनबाब आहे का तयारी? ∙∙∙

धारबांदोड्यातील बेकायदा चिरे खाण!

धारबांदोडा तालुक्यात बेकायदेशीर चिरे खाणीचा व्यवसाय जोमात सुरू आहे. साकोर्डा पंचायतक्षेत्रात तर सर्व नियम कानून धाब्यावर बसवून बेकायदा चिऱ्यांचा व्यवसाय सुरू आहे. आता या प्रकाराला कुणाचा वरदहस्त आहे, कुणाचे अभय आहे म्हणून सरकारी यंत्रणा कारवाई करण्यास धजत नाही याबद्दल उलटसुलट चर्चा सुरू आहे. तसे पाहिले तर पूर्वीपासून धारबांदोडा तालुका बेकायदेशीर कृत्यांसाठी सरकारने आंदण दिल्यात जमा आहे, कारण संजीवनी साखर कारखान्याची जमीन हडप करण्यासाठी नाना क्लृप्त्या लढवणे सुरू आहेत. त्यामुळे आता मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालून साकोर्ड्यातील चिरे खाणींप्रकरणी लक्ष घालावे, अशी जोरदार मागणी होताना दिसत आहे. ∙∙∙

कारण काय?

पावसाळी अधिवेशनाच्‍या पहिल्‍या दिवसापासून आतापर्यंत विविध प्रश्‍नांवरून विरोधक ज्‍या पद्धतीने संघटित होत आहेत, मुख्‍यमंत्र्यांना भंडावून सोडत आहेत, त्‍यापद्धतीने सत्ताधारी मात्र एकत्र येताना दिसत नाहीत. काही वर्षांपूर्वी विरोधकांनी मुख्‍यमंत्र्यांवर हल्लाबोल सुरू केला की, त्‍यावेळी मंत्री असलेले नीलेश काब्राल, सध्‍या मंत्रिपद शाबूत असलेले सुभाष फळदेसाई, माविन गुदिन्‍हो चर्चेत उतरून विरोधकांनाही ‘सळो की पळो’ करायचे. पण, चालू अधिवेशनात मात्र एकही मंत्री मुख्‍यमंत्र्यांच्‍या मदतीला धावून जाताना दिसत नाही, याचे मुख्‍य कारण मंत्रिमंडळ फेरबदलाची चर्चा तर नसेल? ∙∙∙

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Helicopter Crash: फ्रान्समध्ये थरार! आग विझवणाऱ्या हेलिकॉप्टरचे तलावात क्रॅश लँडिंग; सुदैवाने जीवितहानी टळली Watch Video

Money Laundering Case: धर्मांतरण रॅकेटचा मास्टरमाइंड छंगूर बाबाच्या साम्राज्यावर ईडीचा घाला! मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी 13 कोटींची मालमत्ता जप्त

Viral Video: चांगलीच खोड मोडली! जिवंत कोळंबी खाण्याचा प्रयत्न करणाऱ्या पोरीचा व्हिडिओ व्हायरल; नेटकऱ्यांनी उठवली टीकेची झोड

Ro-Ro Car Train Service: गणेशोत्सवापूर्वी कोकण रेल्वेची पहिली रो-रो कार ट्रेन गोव्यात दाखल, जाणून घ्या भाडे?

Porvorim: ओ कोकेरो ते मॉल दी गोवा रस्ता 5 दिवसांच्या गणेश चतुर्थीनंतरच होणार बंद; CM सावंतांनी केले स्पष्ट

SCROLL FOR NEXT