आठवड्याच्या विलंबानंतर 8 जून रोजी मॉन्सून केरळात दाखल झाला. बिपरजॉय चक्रीवादळ, अल निनो तसेच अन्य काही घटकांमुळे यंदा मॉन्सूनचा वेग काहीसा मंदावला होता; परंतु आता पुन्हा मॉन्सून सक्रिय झाला असून आज तो कारवारात दाखल झाला आहे.
येत्या 48 तासांत मॉन्सून गोव्यात धडकणार असल्याची शक्यता हवामान खात्याद्वारे वर्तविण्यात आली आहे. पुढील 48 तासांत बंगालचा उपसागर, ईशान्य राज्यांचा उर्वरित भाग, उपहिमालयीन आणि सिक्कीमच्या काही भागांमध्ये मॉन्सून पुढे सरकणार असल्याचे वेधशाळेने म्हटले आहे.
मात्र, अरबी समुद्रात घोंघावणाऱ्या बिपरजॉय चक्रीवादळाचा धोका दिवसेंदिवस वाढत आहे. गोव्यापासून सुमारे 700 किलोमीटर अंतरावर अरबी समुद्रात हे वादळ थैमान घालत असून आता गोव्याला निर्माण झाला असून हे वादळ प्रतितास 7 किलोमीटरच्या तीव्र वेगाने उत्तरेकडे सरकत आहे. पुढील 24 तासांत चक्रीवादळाची शक्यता अधिक तीव्र होऊन ते उत्तर-ईशान्येकडे हळूहळू सरकण्याची दाट शक्यता आहे.
उंच लाटांचा धोका
अरबी समुद्रातील बिपरजॉय चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर समुद्र खवळलेला असून गोव्याच्या किनारपट्टीवर उंचच उंच लाटांचा धोका निर्माण झाला आहे. 11 जूनपर्यंत राज्यात ३.५ ते ४.१ मीटर उंच लाटा किनाऱ्याला धडकू शकतात. त्यामुळे गोव्यातील मच्छीमारांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
नागरिकांना सतर्कतेचा इशारा
गोवा राज्य आपत्कालीन व्यवस्थापन प्राधिकरणाने सतर्कतेचा ईशारा दिला असला, तरी नागरिकांनी घाबरू नये. मात्र, समुद्र किनाऱ्यावर स्नानासाठी जाऊ नये, तसेच बोटी व लहान जहाजे न चालविण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
या दिवसांत समुद्र किनाऱ्यालगत कोणत्याही प्रकारचे कार्यक्रम पूर्णत: बंद करण्यास सांगितले असून आपत्कालीन काळात ०८३२२४१९५५०, ०८३२२२२५३८३, ०८३२२७९४१०० या क्रमांकावर नागरिकांनी संपर्क साधावा, असे आवाहन केले आहे.
मॉन्सूनपूर्व रिमझिम सरींना सुरुवात
शुक्रवारी रात्रीपासून मॉन्सूनपूर्व सरींचा राज्यातील विविध भागांत शिडकाव सुरू आहे. आतापर्यंत सर्वाधिक पेडणे, त्याखालोखाल म्हापसा, पणजी, साखळी, काणकोण, दाबोळी, मुरगाव, सांगे आदी भागांत मॉन्सूनपूर्व पाऊस पडल्याचे निरीक्षण गोवा वेधशाळेने नोंदवले आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.