Goa Monsoon Assembly Session 2023 | Kala Academy Slab Collapsed Dainik Gomantak
गोवा

Goa Monsoon Assembly 2023: दोषींना सोडणार नाही! कला अकादमीप्रकरणी सखाेल चौकशी करण्याचे मुख्यमंत्र्यांनी दिले आदेश

दैनिक गोमन्तक

Goa Monsoon Assembly Session 2023: पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येलाच कला अकादमीच्या खुल्या रंगमंचाचे छत कोसळल्याप्रकरणी दोषींवर कडक कारवाई करण्याची ग्वाही मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आज अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी सभागृहात दिली.

याच मुद्यावर विरोधकांनी चर्चेसाठी मांडलेला स्थगन प्रस्ताव सभापतींनी फेटाळल्याने ते आक्रमक झाले होते. घोषणाबाजी करत सभापतींच्या आसनासमोरील हौद्यात विरोधकांनी धाव घेतल्याने अखेर सभापतींना पहिल्याच दिवशी विधानसभेचे कामकाज तहकूब करण्याची वेळ आली.

नूतनीकरण करण्यात येत असलेल्या पावसाळी विधानसभा अधिवेशनात विरोधक आक्रमक होणार, हे साहजिकच होते. त्याप्रमाणे आज विरोधकांनी स्थगन प्रस्ताव आणत सर्वप्रथम चर्चा करा आणि स्पष्टीकरण द्या, अशी मागणी करत गदारोळ केला.

यामुळे पहिल्या दिवशी अर्ध्या तासासाठी विधानसभेचे कामकाज तहकूब करावे लागले. अखेर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी याबाबतचे स्पष्टीकरण दिल्यानंतर कामकाज सुरळीत सुरू झाले.

कला अकादमीच्या मुद्यावरून गोवा विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सभागृहात विरोधकांनी गदारोळ करत गोंधळ घातला. विरोधकांनी दाखल केलेल्या स्थगन प्रस्तावावर चर्चा आणि सरकारने स्पष्टीकरण द्यावे, अशी विरोधकांची मागणी होती.

मात्र, सभापती रमेश तवडकर यांनी ती फेटाळून प्रश्नोत्तर तास सुरू केल्याने विरोधकांनी पहिल्यांदाच चर्चा, असे म्हणत फलक दाखवत विधानसभा हौद्याकडे धाव घेतली. याच मुद्द्यावर घोषणाबाजी करत विरोधकांनी गदारोळ सुरूच ठेवल्याने अखेर सभापतींनी अर्ध्या तासासाठी सभागृहाचे कामकाज तहकूब केले.

एकाकी झुंज

कामकाज पुन्हा सुरू झाल्यानंतर विजय सरदेसाई कला अकादमीवरील चर्चेसाठी आग्रही असताना विरोधक मात्र प्रश्नोत्तरांचे सत्र सुरू करण्याची मागणी करत जागेवर बसले होते, तर वीरेश बोरकर यांनी झाडे तोडल्याचा प्रश्‍न विचारला. त्यावर मंत्री सुदिन ढवळीकर उत्तर देत होते. यावेळी विरोधी आमदार आपल्या जागेवर उभे होते. मात्र, ते सरदेसाईंच्या सोबत नव्हते. सरदेसाई संपूर्ण प्रश्नोत्तर तास सभापतींच्या आसनासमोर आपल्या मागणीसाठी उभे राहिले. तरीही सरदेसाई यांनी आपली एकाकी झुंज सुरूच ठेवली.

अहवाल सादर करण्याचे निर्देश

कला अकादमीच्या खुल्या रंगमंचाचे छत कोसळल्याप्रकरणी मुख्यमंत्री सावंत यांनी स्पष्टीकरण देताना दोषींवर कडक कारवाई केली जाईल, अशी ग्वाही सभागृहाला दिली. ते पुढे म्हणाले, बांधकाम खात्याला प्राथमिक चौकशीचे आदेश दिले असून, उत्तराखंड येथील आयआयटी रुरकीच्या माध्यमातून सखोल चौकशी करून अहवाल सादर करण्याची सूचना केली आहे.

मुख्यमंत्र्यांचे रेशमी चिमटे

सरदेसाई हे कला अकादमी मुद्यावर चर्चेची मागणी करत असतानाच ‘आरजी’चे आमदार वीरेश बोरकर यांनी ''मला बोलू द्या'' अशी विनंती केली. त्यावर ‘विजय तुम्हाला बोलू देत नाही, विरोधक विभागले आहेत’ असा चिमटा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काढला.

क्षणचित्रे

  • दीर्घकाळ चालणाऱ्या पावसाळी अधिवेशनाचा पहिलाच दिवस विरोधकांनी गाजवला.

  • कामकाज सुरू होताच विरोधकांनी स्थगन प्रस्तावावर चर्चेची मागणी करत आक्रमक पवित्रा घेतला.

  • मुख्यमंत्र्यांनी दुरुस्त्या मांडत विरोधकांना रोखण्याचा प्रयत्न केल्यावरही आपल्या मागणीवर ठाम होते.

  • कला अकादमी विषयावर चर्चा करा, असे फलक विरोधकांनी पहिल्यांदाच विधानसभेमध्ये दर्शविले.

  • विरोधक आक्रमक होत असल्याचे लक्षात आल्यावर सभापतींनी प्रश्‍न पुकारले. पण प्रश्‍न मांडले जात नसल्याचे लक्षात येताच त्यांनी नवे प्रश्‍न सभागृहापुढे ठेवले. यामुळे विरोधकांमध्ये गोंधळ.

  • संपूर्ण प्रश्‍नोत्तर तास विजय सरदेसाई आपल्या मागणीचा फलक घेऊन सभापतींच्या आसनासमोर उभे होते.

  • प्रश्‍नोत्तर तासानंतर कला अकादमीप्रश्‍नी मुख्यमंत्र्यांनी स्पष्टीकरण दिल्यानंतर विरोधक काहीसे शांत झाले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rahul Gandhi: 'गोव्यात भाजप सांप्रदायिक तणाव निर्माण करतंय'; राहुल गांधींचा हल्लाबोल

St. Francis Xavier DNA Test Row: वेलिंगकरांविरोधात रस्त्यावर उतरलेल्या आंदोलकांची माघार! राजकीय मायलेजचा मुद्दा नडला

Leopard Trapped at Pissurlem: ..अखेर बिबट्या जेरबंद! पिसुर्ले ग्रामस्थांनी सोडला सुटकेचा नि:श्वास

CM Pramod Sawant: पोल्ट्री उद्योगातून 'स्वयंपूर्ण गोवा' करण्यासाठी सरकार करणार मदत

Viral Video : ‘तो’ व्हिडिओ गोव्याचा नव्हे, कांगोचा

SCROLL FOR NEXT