पणजी : स्व. रवी नाईक यांच्या निधनानंतर सुमारे १३ महिने रिक्त असलेल्या मंत्रिपदी शनिवारी मुरगावचे आमदार संकल्प आमोणकर यांची वर्णी लागली. लोकभवनातील दरबार हॉलमधील कार्यक्रमात राज्यपाल पुसापती अशोक गजपती राजू यांनी आमोणकर यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली.
मंत्री आमोणकर यांना सोमवारी (ता. ९) खात्यांचे वाटप होण्याची शक्यता असून रवी नाईक यांचीच खाती मिळण्याचा कयास आहे. या समारंभाला मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्यासह मंत्री-आमदार, भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक तसेच आमोणकरांचे मुरगावातील हितचिंतक उपस्थित होते.
२०२२ च्या निवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवारीवर निवडून आलेल्या आमोणकर यांनी इतर आठ आमदारांसह भाजपमध्ये प्रवेश केला होता. तेव्हापासून त्यांना मंत्रिपद मिळेल, अशी चर्चा होती. परंतु, दोनवेळा मंत्रिमंडळ फेरबदलात ज्येष्ठ आमदार दिगंबर कामत व आलेक्स सिक्वेरा यांना संधी दिली. त्यामुळे आमोणकरांना आमदारकीवरच समाधानी रहावे लागणार, असे वाटत असताना मुख्यमंत्र्यांनी आमोणकर यांना मंत्रिमंडळात स्थान दिले.
नवे मंत्री त्यांच्या खात्यांना योग्य न्याय देतील : मुख्यमंत्री
नवनिर्वाचित मंत्री आमोणकर यांचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी अभिनंदन केले. ‘‘आमोणकर यांना जी खाती दिली जातील, त्यांना ते न्याय देतील. नवीन मंत्री नव्या कल्पना घेऊन येत असतो. त्यामुळे आमोणकर यांचा मुरगाव तसेच राज्यालाही फायदा होईल’’, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
कमी वेळेत शक्य तितके काम करू : मंत्री आमोणकर
‘‘आतापर्यंत पक्षाने मला जी जबाबदारी दिली, ती स्वीकारून काम करीत राहिलो. मंत्री म्हणून काम करताना मला निश्चितच कमी वेळ मिळेल. पण त्याही वेेळेत शक्य तितके काम मी करेन. त्यासाठी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि इतर मंत्र्यांचे सहकार्य मिळेल’’, असा विश्वास नवनिर्वाचित मंत्री संकल्प आमोणकर यांनी शपथविधीनंतर व्यक्त केला.
मुरगावातील चारही मतदारसंघ जिंकणार! : ‘‘आमोणकर यांच्या रूपाने मुरगाव तालुक्याला दुसरे मंत्रिपद मिळाले आहे. त्यामुळे आमचे बळ आणखी वाढले असून, दाबोळी, वास्को, मुरगावसह कुठ्ठाळीतही यावेळी आम्ही भाजपचा झेंडा फडकावू’’, असा निर्धार मंत्री माविन गुदिन्हो यांनी व्यक्त केला. ‘‘मंत्री या नात्याने आमोणकर त्यांना मिळतील त्या खात्यांची जबाबदारी योग्यरित्या सांभाळतील’’, असेही ते म्हणाले.
विश्वजीत, बाबूश मोन्सेरात अनुपस्थित
शपथविधी समारंभाला मंत्री विश्वजीत राणे आणि बाबूश मोन्सेरात अनुपस्थित होते. दिगंबर कामत, रमेश तवडकर, सुभाष शिरोडकर, सुभाष फळदेसाई, नीळकंठ हळर्णकर, सुदिन ढवळीकर, माविन गुदिन्हो, रोहन खंवटे यांच्यासह आमदार, पदाधिकाऱ्यांनी आमोणकर यांचे अभिनंदन केले.
अन् संकल्प यांचे माता-पिता भावूक
संकल्प आमोणकर यांच्या शपथविधी सोहळ्याला उपस्थित असलेले त्यांचे पिता पद्मनाभ आणि माता रेखा हे भावूक झाले. ‘‘संकल्प सुरुवातीपासूनच धडपडी स्वभावाचे आहेत. लोकांची कामे करण्यात ते नेहमीच पुढे असतात. याची दखल घेऊन पक्षाने त्यांना कामाची पावती दिली आहे. मंत्री म्हणूनही संकल्प चांगलेच काम करेल’’, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.