कुंकळ्ळी: जातीय सलोखा जपण्यासाठी सर्वांनी काम केले पाहिजे, त्यामुळे शांतता राखण्यास मदत होईल, असे प्रतिपादन विरोधी पक्षनेते व कुंकळ्ळीचे आमदार युरी आलेमाव यांनी मंगळवारी केले कुंकळ्ळी मतदारसंघात विकासकामांच्या शुभारंभप्रसंगी ते बोलत होते.
आलेमाव यांनी उस्किणीबांद-पांझरखणी व देमानी येथील ‘गणपती विसर्जन’ शेड आणि पायऱ्यांचे उद्घाटन केले. त्याचबरोबर देमानी येथील सुन्नी जामिया मस्जिदच्या कब्रस्तानच्या संरक्षक भिंतीची पायाभरणी केली.
‘गणेश चतुथी’च्या आधी त्यांनी देमानी येथील ‘गणपती विसर्जना’साठी शेड व इतर विकासकामांचे उद्घाटन केले. ‘‘गणपती विसर्जनाच्या व्यासपीठाचे सुशोभीकरण करण्याचे आश्वासन मी परिसरातील नागरिकांना दिले होते आणि ते प्रत्यक्षात आले आहे,’’ असे ते म्हणाले.
उस्किणीबांद-पांझरखणी येथील लोकांनी गणपती विसर्जन परिसरात योग्य सुविधा मिळाव्यात अशी विनंती केली होती, असे ते म्हणाले. यावेळी कुंकळ्ळीचे नगराध्यक्ष लँड्री मास्कारेन्हस, नगरसेवक गौरी शेटकर, मस्जिदचे अध्यक्ष शाह शबीर व इतर पदाधिकारी, नगरसेवक उदेश देसाई आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना ते म्हणाले, “कुंकळ्ळीच्या लोकांनी धार्मिक एकतेचा आदर्श घालून दिला आहे. आम्ही सर्व धर्मांचे पारंपारिक कार्यक्रम एकत्र येऊन आणि एकमेकांच्या घरी जाऊन साजरे करतो. आमची ही परंपरा आमच्या जातीय सलोख्याचे रक्षण करते,” असे ते म्हणाले.
ते म्हणाले की, कुंकळ्ळी हे धार्मिक सलोख्याचे मॉडेल असून त्याचे आपण नेहमीच संरक्षण केले पाहिजे. प्रगतीसाठी एकतेच्या सर्वोच्च महत्त्वावर जोर देऊन, युरी आलेमाव यांनी आमदार- योजनेअंतर्गत सुन्नी जामिया मस्जिदसाठी कम्युनिटी हॉल बांधण्याचे आश्वासन दिले. “आम्ही एक कम्युनिटी हॉल बांधू शकतो जिथे २०० ते ३०० लोक एकत्र येवू शकतील. यामुळे सुन्नी जामिया मस्जिदसाठी उत्पन्नसुद्धा मिळू शकेल,” असे ते म्हणाले.
देमानी व इतर भागातील रस्त्यांचे डांबरीकरण लवकरच होणार असल्याचे त्यांनी सांगितले. “आम्ही तुमच्या संमतीने प्रकल्प पुढे नेत असताना, मला ‘अर्बन हॉस्पिटल’ बांधण्याची इच्छा आहे आणि त्यासाठी नोव्हेंबरमध्ये पायाभरणी करण्याचा प्रयत्न करेन. आम्ही नवीन वैद्यकीय प्रकल्पात सर्व वैद्यकीय सुविधा देऊ,” असे ते म्हणाले.
हॉस्पिटल बांधणे हे आपले वडील माजी आमदार ज्योकी आलेमाव यांचे स्वप्न होते असे ते म्हणाले. अंडरग्राउंड केबलिंगमुळे वीज क्षेत्रातील समस्यांचे निराकरण होईल असेही ते म्हणाले. “मी सरकारला वीज बिघाडांशी संबंधित सर्व समस्या सोडवण्यास सांगितले आहे,” असे ते म्हणाले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.