पणजी, लोकसभा निवडणुकीचे कॉंग्रेस पक्षाच्या दृष्टिकोनातून विश्लेषण केल्यास, राज्यातील कॉंग्रेस नेतृत्व संपूर्णत: निकामी व बेभरंवशाचे ठरल्याचे समोर आले आहे.
उत्तर व दक्षिण गोव्यात कॉंग्रेसला विविध मतदारसंघांमध्ये मिळालेल्या मतांचा व एकंदर टक्केवारीचा ताळमेळ घातल्यास विरोधी पक्षनेते युरी आलेमाव, प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर तसेच इतर दोन आमदार कॉंग्रेसला उभारी देण्यात सपशेल अपयशीच ठरल्याचे स्पष्टपणे दिसत आहे.
२०१९ च्या तुलनेत उत्तर गोव्यात कॉंग्रेस पक्षाची मतांची टक्केवारी २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत सहा टक्क्यांनी कमी झाली असून, दक्षिणेत केवळ १.२५ टक्के जास्त मते कॉंग्रेसच्या पारड्यात जमा झाली आहेत. इंडिया आघाडीमधील बहुतेक सहयोगी पक्ष सोबत असूनही ही टक्केवारी निश्चितच प्रभावी नाही, असे राजकीय विश्लेषकांचे मत आहे.
मागील लोकसभा निवडणुकीत उत्तर गोव्यात कॉंग्रेसला ३८ टक्के मते मिळाली होती. या निवडणुकीत नोटाची २ टक्के व इतर चार उमेदवारांची मतांची एकूण टक्केवारी ४ टक्के होती. यंदा उत्तरेत ही सहा टक्के मते आपल्या बाजूने करण्यात कॉंग्रेसला अपयश आल्याचे निकालावरून स्पष्ट होते.
दक्षिण गोव्यात २०१९ मध्ये कॉंग्रेसची एकूण मतांची टक्केवारी ४७ टक्के होती. ‘आप’च्या उमेदवाराला त्यावेळी पाच टक्के मते मिळाली होती व ‘नोटा’च्या खात्यात एक टक्का मते गेली होती. यंदा कॉंग्रेस उमेदवाराने केवळ ४८.३५ टक्के मते मिळविण्यात यश मिळविल्याचे आकडेवारी सांगते. याचा अर्थ २०१९ च्या तुलनेत जवळजवळ सर्व विरोधी पक्ष सोबत असताना २०२४ मध्ये कॉंग्रेसची मतांची टक्केवारी दीड टक्केच वाढली, असाच होतो. एकंदर गोव्यात कॉंग्रेसची मतांची टक्केवारी २०१९ च्या तुलनेत तीन टक्के उतरून ४३ टक्क्यांवरून ४० टक्क्यांवर आली आहे.
कुंकळ्ळी मतदारसंघाचे नेतृत्व विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांच्याकडे असूनही त्यांना कॉंग्रेसला केवळ ५५४८ मतांची आघाडी देता आली. दक्षिण गोवा मतदारसंघासाठी समन्वयक नेमलेले कॉंग्रेसचे आमदार एल्टन डिकॉस्ता यांनी आपल्या मतदारसंघात कॉंग्रेसला केवळ ७८४ मतांची आघाडी दिली. प्रदेशाध्यक्ष अमित पाटकरांच्या कुडचडे मतदारसंघात कॉंग्रेस उमेदवार १६९७ मतांनी पिछाडीवर पडला.
प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी किमान २५ मतदारसंघ हेरून तेथे आतापासूनच २०२७ च्या विधानसभा निवडणुका लक्षात घेऊन उमेदवार तयार करण्याच्या कामाला लागणे गरजेचे आहे.
विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी केवळ पत्रके काढणे वा पत्रकार परिषदा घेणे यावर न थांबता प्रत्यक्षात रस्त्यावर उतरून, प्रसंगी प्रखर आंदोलने करून कार्यकर्ते व जनतेमध्ये चैतन्य निर्माण करावे लागेल.
लोकसभा निवडणुकीत आपल्या मतदारसंघात कॉंग्रेससाठी योगदान दिलेल्या स्थानिक नेत्यांना प्रोत्साहन देणे महत्त्वाचे असून, तेच पुढे विधानसभेसाठी योग्य उमेदवार ठरू शकतील.
कॉंग्रेसकडे विचारवंत तथा राजकीय डावपेच आखणाऱ्यांची वानवा असून, पक्षाला शिस्त लावण्यासाठी एक मास्तर नेमणे गरजेचे आहे.
त्याचबरोबर समाजमाध्यम विभाग आणि प्रवक्ते यांची एक फळी उभारणेही कॉंग्रेस पक्षाला फायद्याचे ठरणार आहे.
काँग्रेसचे नव्हे, सामान्य जनतेचे प्रयत्न
राजकीय विश्लेषक ॲड. क्लिओफात आल्मेदा कुतिन्हो यांच्या मते, दक्षिण गोव्यात यंदा काँग्रेसचे उमेदवार कॅ. विरियातो फर्नांडिस हे जिंकण्यामागे काँग्रेस आमदार आणि कार्यकर्त्यांपेक्षा सर्वसामान्य जनताच कारणीभूत ठरली.
निवडणुकीदरम्यान नेहमीप्रमाणे काँग्रेस पक्षातील विस्कळीतपणा जाणवला. मतदारांना घराबाहेर काढण्याची काँग्रेसकडे कुठलीच यंत्रणा नव्हती. असे असतानाही मतदार स्वत:हून घराबाहेर आले आणि त्यांनी उत्स्फूर्तपणे मतदान केले. त्यामुळेच कॅप्टनना एवढ्या माेठ्या प्रमाणात मते मिळाली.
समाजकार्यकर्त्यांमुळे विजय सुकर :
समाजकार्यकर्ते रामा काणकाेणकर म्हणाले, कॅ. फर्नांडिस हे काँग्रेस आमदार आणि कार्यकर्त्यांनी केलेल्या प्रयत्नांमुळे जिंकून आले, असे म्हणणे चुकीचे ठरेल. या निवडणुकीवेळी विरियातोंसाठी जर कोण अधिक वावरले असेल तर ते सामाजिक आणि पर्यावरण चळवळीतील कार्यकर्ते. त्यांनी पूर्ण शक्ती फर्नांडिस यांच्यामागे लावली. त्यामुळेच कॅप्टनच्या समर्थनात मोठ्या प्रमाणात मतदान झाले. कॅप्टनना जिंकून आणण्यासाठी काँग्रेसपेक्षा इंडिया आघाडीतील इतर पक्षांतील आमदारांचे प्रयत्न अधिक होते.
आळस सोडा, कामाला लागा
कॉंग्रेसच्या आठ आमदारांनी पक्षांतर केल्यानंतर कॉंग्रेसचे स्थानिक नेतृत्व हे राजकीय अनुभव नसलेल्यांकडे राहिल्यानेच आज पक्षाची अशी स्थिती झाल्याचे राजकीय विश्लेषकांचे मत आहे. कॉंग्रेस नेतृत्वाने आळस सोडून अहोरात्र काम करणे काळाची गरज असून, प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी अनुभवी सल्लागारांची नेमणूक करून शिस्तबद्ध पद्धतीने पक्षबांधणी केली तरच २०२७ मध्ये विधानसभा निवडणुकीत पक्ष टक्कर देऊ शकेल. आज प्रदेशाध्यक्ष तसेच तिन्ही आमदारांनी कार्यकर्त्यांना भेटणे, त्यांच्या तक्रारींचे निरसन करणे गरजेचे आहे.
कार्लुस फेरेराही अपयशी
: उत्तर गोव्यात हळदोणे मतदारसंघाचे नेतृत्व करणारे ॲड. कार्लुस फेरेरा यांनाही आपला गड राखून ठेवता आला नाही. जेमतेम ८० मतांची आघाडीच ते काँग्रेस उमेदवाराला देऊ शकले. याउलट काँग्रेसचे नेतृत्व नसलेल्या कळंगुटमध्ये २१५७ व सांताक्रुझ मतदारसंघात २२१६ मतांची काँग्रेसने आघाडी घेतली. सांतआंद्रेत भाजपची आघाडी १०० वर राहिली.
लोकसभा निवडणुकीवेळी काँग्रेस कार्यकर्ते भाजप कार्यकर्त्यांच्या तुलनेत दिसले नाहीत, ही गोष्ट खरी; पण लाेकांना परिस्थितीची जाणीव करून देण्याचे काम काँग्रेसने व्यवस्थित केले. त्यामुळेच लोकांमध्ये चैतन्य निर्माण झाले आणि ते परिवर्तन दक्षिण गोव्यामध्ये काँग्रेसला झालेल्या मतदानातून प्रतिबिंबित झाले.
- बीना नाईक,
अध्यक्ष, महिला काँग्रेस
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.