Subhawati Bhobe Goa Dainik Gomantak
गोवा

नाव बदलून महाराष्ट्रातून गोव्यात आल्या, जखमी स्वातंत्र्यसैनिकांच्या जखमेवर घातली मायेची फुंकर; सेवाव्रती स्वातंत्र्यसेनानी सुभाताई भोबे

Subhawati Bhobe Freedom Fighter: कोणत्याही प्रकारे गोव्‍यातून पोर्तुगिजांना हाकलून लावायचेच असा दृढ निर्धार त्याकाळी गोमंतकीयांनी केला होता. मुक्तिलढ्याला सुरवात झाली होती.

गोमन्तक डिजिटल टीम

नरेंद्र तारी, फोंडा

पोर्तुगिजांची जुलमी राजवट उलथवून टाकण्यासाठी गोव्यात आंदोलन सुरू झाले. गोवा मुक्तीपूर्व काळात अनेकांनी आपल्या घरादारांवर तुळशीपत्र ठेवून या स्वातंत्र्यलढ्यात सहभाग घेतला. पोर्तुगीज पोलिसांनी अमानुष मारहाण केली, तुरुंगात असताना हाल हाल केले. हा लढा लढताना काहींना आपल्‍या प्राणांची आहुती द्यावी लागली. या स्वातंत्र्यसैनिकांच्या त्यागामुळेच नंतरच्या काळात आपला गोवा मुक्त झाला. या गोवामुक्ती पर्वात एक नाव प्रामुख्याने घ्यावे लागेल ते म्हणजे सुभावती दिनकर भोबे यांचे.

सुभावती दिनकर भोबे या म्हापसा येथील. बिठ्ठोण येथील काळोखे कुटुंबात त्यांचा जन्म झाला. पुढे त्यांचे लग्न दिनकर भोबे यांच्याबरोबर झाले. भोबे यांचे मामाकडचे आजोळ हे वेंगुर्ला येथील. त्याकाळी गोव्यात शिक्षणाच्या तशा फार मोठ्या संधी नव्हत्या. गोव्यात शिक्षण घ्यायचे झाल्यास पोर्तुगीज भाषा अनिवार्य ठरली होती. त्यामुळे सुभावती यांनी आपल्या मामाच्या घरी वेंगुर्ला येथे राहून प्राथमिक शिक्षण पूर्ण केले. पुढे मुंबईत जाऊन त्यांनी परिचारिका अभ्यासक्रम पूर्ण केला, तोसुद्धा नोकरी करूनच. या परिचारिका अर्थातच नर्सिंग कोर्सचा गोवा मुक्तिलढ्यात फार मोठा उपयोग झाला. ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी पीटर आल्वारीस यांच्यासोबत सुभावती भोबे नॅशनल काँग्रेसमध्ये सामील झाल्या. तेथूनच त्यांना गोवा मुक्तीचे बाळकडू मिळाले.

कोणत्याही प्रकारे गोव्‍यातून पोर्तुगिजांना हाकलून लावायचेच असा दृढ निर्धार त्याकाळी गोमंतकीयांनी केला होता. मुक्तिलढ्याला सुरवात झाली होती. त्‍यातील एक अग्रणी असलेल्या सिंधू देशपांडे यांचे त्याकाळी सुभावती यांच्या घरी काळोखे कुटुंबीयांकडे गुप्त वास्तव्य होते. तेथूनच त्यांनी मुक्तिलढ्याची सूत्रे हलवायला सुरवात केली होती. पोर्तुगिजांच्या हे लक्षात आल्यानंतर पोलिस काळोखे यांच्या घरी आले. मात्र सिंधुताई निसटल्या होत्या. पण त्‍यांना आश्रय दिल्याबद्दल सुभावती यांचे वडील पांडुरंग काळोखे यांना पकडले आणि कोठडीत डांबले. काही काळानंतर पांडुरंग काळोखे यांची सुटका झाली. सुभावती त्यावेळी मुंबईत होत्या. गोवामुक्ती आंदोलनामुळे गोवा-भारत संबंध तुटले होते.

सुभावती यांना पुढील शिक्षणासाठी युरोपात जायचे होते. त्यापूर्वी आपल्या आईवडिलांना भेटावे याची तळमळ त्‍यांना लागली होती. पण गोव्यात आल्यावर पोर्तुगीज सैनिक पकडण्याची भीती होती. त्यामुळे सुभावती यांनी आपले नाव मथुरा प्रभू असे करून गुपचूपपणे गोव्यात प्रवेश केला व आईवडिलांना भेटून मुंबईत परतल्या. तेथून नंतर इंग्लंड, अमेरिका अशी परदेशवारी करत आहारशास्त्राचा अभ्यास केला. युरोपात असताना अनेक इस्पितळांत नोकरी करून सुभावती यांनी स्वतःला प्रगल्भ केले. युरोपात साडेतीन वर्षे राहिल्यामुळे परिचारिका आणि आहारशास्त्र याबाबत त्‍यांना नवनवीन क्‍लृप्‍त्‍या समजल्‍या होत्‍या, ज्याचा खूप चांगला उपयोग गोवा मुक्तीसाठी झाला.

गोवामुक्तीचा ध्यास घेतलेल्या अनेकांनी छुप्या मार्गाने मुंबईहून गोव्यात प्रवेश केला. त्याकाळी महाराष्ट्रातून गोव्यात प्रवेश बंदी होती. पण सुभावती कशाबशा गोव्यात पोचल्या. गोवामुक्ती आंदोलन काळात त्यांना आणि त्यांच्या दोन्ही बहिणींना पोर्तुगीज सैनिकांनी अटकही केली. पण त्‍या खचल्या नाहीत. आता गोवामुक्तीची मशाल अधिकाधिक प्रज्वलित करायचा असा ध्यास घेतलेल्या स्वातंत्र्यसैनिकांच्या खांद्याला खांदा भिडवून काम करायचे असा निर्धार सुभावती यांनी केला.

मुक्तिलढ्यात उचलला खारीचा वाटा!

नंतरच्या काळात भारत सरकारने पोर्तुगिजांना हाकलून लावले आणि गोवा मुक्त झाला. स्वातंत्र्यसैनिकांच्या प्रयत्नांना यश आले. हालअपेष्टा सोसलेल्या, प्रसंगी छातीवर गोळ्या झेललेल्या शूरवीर स्वातंत्र्यसैनिकांचे बलिदान कामी आले. अर्थातच सुभाताई यांच्या प्रयत्नांना यश आले. आज आपण गोवामुक्तीची फळे चाखतो आहोत, पण या मुक्ती आंदोलनात अनेकांनी सहभाग घेतला. मुक्तिलढ्याचा प्रज्वलित झालेला यज्ञ सतत तेवत ठेवण्यासाठी स्वातंत्र्यसैनिकांच्या समिधा पडल्या, ज्यामुळे नंतरच्या काळात गोवा मुक्त झाला. या मुक्तिलढ्यात आपण खारीचा वाटा उचलला, असे अभिमानाने सुभाताई सांगतात. पण हा खारीचा नव्हे तर मोलाचा वाटा होता, हे त्यांच्या कार्यावरून सिद्ध होते.

युरोपमध्‍ये शिक्षण घेऊन जखमी स्‍वातंत्र्यसैनिकांवर केले उपचार

गोवामुक्तीच्या लढ्यात अनेकवेळा स्वातंत्र्यसैनिकांवर लाठीमार झाला. प्रसंगी गोळीबारही झाला. त्यावेळी जखमी स्वातंत्र्यसैनिकांची निगा आणि उपचार सुभावती भोबे यांनी केले. याकामी त्यांना परिचारिका प्रशिक्षणाचा फार मोलाचा हातभार मिळाला. बऱ्याचदा काय मिळेल ते खाल्ले. काही वेळा उपाशीपोटी दिवस काढले. स्वातंत्र्यसैनिकांचा दिनक्रम असा होता. त्यामुळे आहारासंबंधी सजग राहताना सुभावती यांनी स्वातंत्र्यसैनिकांना आहारासंबंधी मार्गदर्शन केले. तसेच जखमी स्‍वातंत्र्यसैनिकांवर उपचार केले.

मुक्तिलढ्याचे महत्त्व आजच्‍या पिढीला सांगणे गरजेचे

गोवा मुक्तीनंतरचा गोवा फार वेगळा होता. माणूस सुखी-समाधानी होता. पैसा नसला तरी प्रामाणिक होता. आजची स्थिती वेगळी आहे. पैशांच्या मागे माणूस धावत सुटला आहे. कोणतीही अपेक्षा न ठेवता स्वातंत्र्यसैनिकांनी मुक्तिलढ्यात स्वतःला झोकून दिले. प्रसंगी प्राणार्पण केले. पण याचे महत्त्व आणि मोल सध्याच्या स्थितीत कमी झाल्यासारखे वाटते. मुक्तिलढ्याचे महत्त्व मुलांना माहीतच नाही, मुद्दामहून सांगावे वाटते. ही स्थिती बदलली पाहिजे. आपला गोवा समृद्ध आहे. ही समृद्धता टिकवणे फार गरजेचे आहे, असे सुभाताई यांनी सांगितले

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

BJP: इतिहासात पहिल्यांदाच भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे महिलेकडे जाणार? RSS चा ग्रीन सिग्नल; 'ही' तीन नावे चर्चेत

Goa News Live: ओपा जल शुद्धीकरण प्रकल्पाजवळ ट्रक दरीत कोसळला

Goa Athletics: गोव्यात रंगणार 'मनोहर पर्रीकर स्मृती ॲथलेटिक्स स्पर्धा'; तारखा, ठिकाण जाणून घ्या..

Pakistani Team: 'पाकिस्तान' टीम खेळणार भारतात! क्रीडा मंत्रालयाकडून ग्रीन सिग्नल; 2 करंडकांमध्ये घेणार भाग

Goa Rain Update: गोव्यात जिकडे तिकडे पाणीच पाणी! पावसाचा रौद्रावतार; आपत्कालीन यंत्रणा सतर्क

SCROLL FOR NEXT