पणजी: बस प्रवासाचे तिकीट आरक्षण, मोटारसायकल पायलट आणि ऑटोरिक्षा बुकिंगसह दैनंदिन गरजांच्या विविध सेवा आता एकाच व्यासपीठावर उपलब्ध होणार आहेत. कदंब वाहतूक महामंडळाने (केटीसी) शनिवारी ‘माझे ॲप’चे लोकार्पण केले.
या ॲपद्वारे कदंबच्या राज्यांतर्गत आणि आंतरराज्यीय बस प्रवासाचे तिकीट आरक्षित करण्याबरोबरच स्मार्ट ट्रान्झिट कार्ड, पायलट बाईक टॅक्सी तसेच पिंक आणि नियमित ऑटोरिक्षा बुकिंगची सुविधा मिळणार आहे. केटीसीचे अध्यक्ष उल्हास तुयेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत या ॲपचे लोकार्पण करण्यात आले.
या ॲपमुळे महामंडळाच्या सर्व ६०० बसेसचे जीपीएस प्रणालीद्वारे लाइव्ह ट्रॅकिंग करता येणार आहे. त्यामुळे बसचे थेट लोकेशन प्रवाशांना पाहता येईल, अशी माहिती तुयेकर यांनी दिली. ऑनलाइन तिकीट आरक्षित केले तरी निश्चित आसनाची हमी मिळणार नाही; मात्र उपलब्धतेनुसार प्रवाशांना बसमध्ये बसून किंवा उभे राहून प्रवास करता येईल, असे त्यांनी स्पष्ट केले. या ॲपच्या माध्यमातून गोव्यातील विविध शहरांमध्ये दुचाकी आणि तीनचाकी टॅक्सीही बुक करता येणार आहेत.
वाहतूक सेवांबरोबरच अन्नपदार्थही उपलब्ध
गोव्यातील ग्रेसफुलगोंय सुपरॲप प्रा. लिमिटेड कंपनीने कदंब महामंडळाच्या भागीदारीत आणि गोवा सरकारच्या दिव्यांग व्यक्तींसाठीच्या राज्य आयुक्त कार्यालयाच्या सहकार्याने हे ॲप विकसित केले आहे. वाहतूक सेवांबरोबरच अन्नपदार्थ आणि किराणा सामानाची घरपोच सेवा, औषधे, घरगुती सेवा, आरोग्यसेवा, विमान प्रवास, हॉटेल तसेच खासगी यॉट बुकिंग अशा विविध सुविधा एकाच व्यासपीठावर उपलब्ध करून देण्याचे या ॲपचे उद्दिष्ट आहे.
मोटरसायकल पायलटांना विमा संरक्षण: ‘माझे ॲप’वर नोंदणी केलेल्या पायलट बाईक टॅक्सी आणि पिंक ऑटोरिक्षा चालकांना एकूण १५ लाख रुपयांचे विमा संरक्षण देण्यात येणार आहे. यात पाच लाख रुपयांचा आरोग्य विमा आणि दहा लाख रुपयांच्या मुदत विम्याचा समावेश आहे. ॲपमुळे नोंदणीकृत बाईक टॅक्सी चालकांना प्रवाशांकडून थेट डिजिटल बुकिंग मिळणार असून, त्यांना ठरावीक ठिकाणी थांबून प्रवाशांची वाट पाहण्याची गरज कमी होणार आहे.
बसभाड्यात वाढ नाही'
डिझेलच्या किमती वाढत असल्या तरी केटीसीएल बसच्या तिकीट दरात वाढ केली जाणार नसल्याचे अध्यक्ष उल्हास तुयेकर यांनी स्पष्ट केले. प्रवाशांवर अतिरिक्त आर्थिक भार पडू नये, यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. सध्या महामंडळाकडे ६०० बसेसपैकी १५० बसेस इलेक्ट्रिक आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.