डिचोली: देवावरील भक्ती आणि श्रद्धेपोटी एखादा भक्त मनी कोणता नवस बोलेल आणि कोणता संकल्प करील, त्याचा अंदाज बांधणे कठीण. पंढरीच्या श्री विठ्ठलाचा (Vitthal) निःसीम भक्त असलेल्या डिचोलीतील (Bicholim) एका वारकऱ्यानेही सध्या आगळावेगळा संकल्प केला आहे. पुढच्या वर्षी तरी पंढरीची (Pandhari) पायी वारी (Wari) करायला मिळावी म्हणून या विठ्ठलभक्त वारकऱ्याने दाढी न कापण्याचा अर्थातच शेविंग (Shaving) न करण्याची प्रतिज्ञा केली आहे. महामारीचे संकट टळून निर्विघ्नपणे पंढरीची पायी वारी आणि प्रत्यक्ष पंढरपूरच्या विठूरायाचे दर्शन घेण्याचा भक्तीयोग मिळत नाही, तोपर्यंत आपण दाढी कापणार (शेविंग) नाही. असा दृढ संकल्प मुळगाव-डिचोली येथील एक विठ्ठलभक्त तथा वारकरी मंडळाचे अध्यक्ष रघुनाथ (भाऊ) गाड यांनी केला आहे. विठ्ठलभक्त रघुनाथ गाड यांनी आषाढी एकादशीनिमित्त सलग अकरा वर्षे पंढरपूरपर्यंत पायी वारी केलेली आहे.
'कोविड' महामारीमुळे मागील वर्षीप्रमाणे यंदाही पंढरीची पायी वारी करण्याचे भाग्य मिळाले नसल्याने मनी खंत आणि चुकल्याचुकल्या सारखे वाटत आहे. तरी पंढरीच्या विठूरायावर आपली आणि समस्त माऊली भक्तांची पूर्ण श्रद्धा आहे. पायी वारी करता आली नसल्याने आपल्या भक्तांची झालेली घालमेल विठूरायाला नक्कीच समजली असणार. संकटकाळी आपल्या निःसीम भक्तांच्या हाकेला धावून येणारे चंद्रभागेच्या तीरी रखुमाई सोबत विटेवर उभे असलेले पांडुरंग यंदा नसले, तरी पुढच्या वर्षी नक्कीच भक्तांना आपल्या चरणांकडे नेणार. असा विश्वास रघुनाथ गाड यांनी दै. 'गोमन्तक' कडे बोलताना व्यक्त केला. श्री विठ्ठलावर अपार श्रद्धा असलेल्या समस्त भक्तांनाही हाच विश्वास असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
विठूरायावर पूर्ण श्रद्धा
वडिलांची इच्छा आणि श्री विठ्ठलावरील श्रद्धा, यामुळे 1998 साली आषाढी एकादशीला जाण्याचा योग मिळाला. त्यानंतर 2008 सालापर्यंत आपण दरवर्षी इतर भक्तगणांसमवेत बसमधून पंढरपूरला जावून आलो. नंतर मुळगाव येथे वारकरी संस्था स्थापन झाली आणि 2009 साली मुळगाव येथून पहिली पायी वारी पंढरपूरला मार्गस्थ झाली.
या वारीचा आपण प्रत्यक्ष साक्षीदार आहे. "जन्मा येवूनी एकदा तरी पायी वारी करावी' संत महात्म्याचे हे वचन आपण ऐकून होतो. त्यातूनच आपणाला प्रेरणा मिळाली आणि आपण 2009 साली पहिली पायी वारी केली. नंतर 2019 सालापर्यंत सलग अकरा वर्षे आपण पायी वारी करून चंद्रभागा तीरी भरणाऱ्या भक्त मेळाव्यात सहभागी झालेलो आहे. पायी वारीचे नियोजनही आपण केलेले आहे. असे श्री. गाड यांनी सांगितले. पायी वारी करताना मिळणारा आनंद आणि अनुभूती अविस्मरणीय अशीच असते. सर्व वारकऱ्यांना श्री विठूरायाच्या दर्शनाची आस लागलेली असते. मागील वर्षीप्रमाणेच यावर्षीही ही अनुभूती मिळत नाही, याची मनी रुखरुख लागणे साहजिकच असले, तरी श्री विठ्ठल कृपेने पुढच्या वर्षी पायी वारी निर्विघ्नपणे होईल. याचा आपल्याला विश्वास असल्याचे रघुनाथ गाड म्हणाले. याच दृढ विश्वासाने सध्या घरी पूजेला लावलेल्या श्री विठ्ठल-रखुमाईच्या मूर्तीसमोर बसून नित्यनेमाने हरिपाठ वाचन आदी भक्तीसेवा आपण करीत आहे. असेही श्री. गाड यांनी सांगितले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.