पणजी: कॉंग्रेसने (Congress) आघाडी करावी यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस (Nationalist Congress) व गोवा फॉरवर्डने (Goa Forward Party) दबाव वाढवला असतानाही आघाडीसाठी कॉंग्रेसने अद्याप दरवाजे किलकिलेही केलेले नाहीत. आपण येथे आघाडीची बोलणी करण्यासाठी आलेलोच नाही, असे सांगत ज्येष्ठ रणनीतीकार पी. चिदंबरम (P. Chidambaram) यांनी कॉंग्रेसचा इरादा स्पष्ट केला. केवळ इतर पक्षांना झुलवत ठेवण्यासाठी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर (Girish Chodankar) मात्र आघाडीचा निर्णय वरिष्ठ घेतील, असे सांगत आहेत असेही जाणवू लागले आहे.
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रफुल्ल पटेल नुकतेच गोव्यात येऊन गेले. त्यांची मगोचे नेते सुदिन ढवळीकर व गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांनी भेट घेतली होती. त्यावेळी कॉंग्रेस आघाडीचा विषय चर्चेला आला होता. कॉंग्रेसने १५ सप्टेंबरच्या आसपास आघाडीविषयी भूमिका स्पष्ट करावी अन्यथा बिगर कॉंग्रेस आघाडीचा विचार करावा लागेल, असे पटेल यांनी नमूद करून कॉंग्रेसवरील दबाव वाढवला होता. सरदेसाई यांनीही कॉंग्रेसने चतुर्थीपूर्वी आघाडीविषयी स्पष्ट बोलावे, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.
पत्ते गुलदस्त्यात
मुरब्बी राजकारणी असलेल्या चिदंबरम यांनी राजकीय वाटचालीचे पत्ते गुलदस्त्यात ठेवले आहे. आघाडीबाबत त्यांनी इशारे देणाऱ्यांनाच इशारा देण्याचा प्रयत्न केला आहे. कॉंग्रेस पक्षाने निवडणूक रणनीती ठरवण्याचे सर्वाधिकार लेखी आदेशाने चिदंबरम यांना दिले असल्याने तेच याविषयी निर्णय घेतील, हे स्पष्ट असतानाही ते स्पष्टपणे काही सांगत नसल्याने कॉंग्रेसचा मनसुबा काय, हेही अस्पष्ट आहे.
मी गोव्यात काँग्रेस पक्ष बळकट करण्यासाठी आलोय : पी. चिदंबरम
विधानसभा निवडणुकीसाठी कॉंग्रेस पक्षाची तयारी करणे, पक्ष संघटना बळकट करणे, सर्व मतदारसंघांत पक्षाचा विस्तार करतानाच जास्तीत जास्त सदस्य करणे, गट समित्यांची फेरस्थापना करणे व निवडणुकीसाठी पक्ष सक्रिय करणे यासाठी मी गोव्यात आलो आहे. त्यामुळे युती किंवा इतर विषयावर चर्चा करू इच्छीत नाही. असे चिदंबरम यांनी स्पष्ट केले.
मडकईकरांचा प्रवेश
पणजीचे माजी महापौर तथा विद्यमान नगरसेवक उदय मडकईकर यांनी आज समर्थकांसह कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला. पणजी येथील कॉंग्रेस कार्यालयातील कार्यक्रमात उदय मडकईकर यांच्यासह माजी नगरसेवक राहुल लोटलीकर व इतर कार्यकर्त्यांना प्रदेश कॉंग्रेस अध्यक्ष गिरीश चोडणकर व विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांनी प्रवेश दिला.
यावेळी माजी मंत्री संगीता परब, नगरसेवक सुरेंद्र फुर्तादो व इतर पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी चोडणकर म्हणाले की, पणजी व ताळगावमध्ये आता बदलाचे वारे वाहात असून येत्या निवडणुकीत दोन्ही जागांवर कॉंग्रेसचेच उमेदवार निवडून येतील. पती-पत्नी आमदार आणि मुलगा महापौर ही घराणेशाही पणजीकरांना नको झाली आहे. पणजी व ताळगावचे उमेदवार कोण ते तेथील लोकच ठरवतील, असेही चोडणकर म्हणाले.
समित्यांच्या प्रमुखांशी चर्चा; ज्येष्ठ नेत्यांचा समावेश
चिदंबरम यांनी शनिवारी पणजी येथील कॉंग्रेस कार्यालयात हल्लीच निवडणुकीच्या तयारीसाठी नियुक्त केलेल्या विविध समित्यांचे प्रमुख व उपप्रमुखांशी चर्चा केली. यावेळी त्यांच्यासोबत कॉंग्रेसचे गोवा प्रभारी दिनेश गुंडू राव, निवडणूक निरीक्षक प्रकाश राठोड, मन्सूर खान आणि सुनील हनुमन्नावर उपस्थित होते. या बैठकीत विरोधी पक्षनेते दिगंबर कामत, गोवा प्रदेश कॉंग्रेस अध्यक्ष गिरीश चोडणकर, आलेक्स सिक्वेरा फ्रान्सिस सार्दिन, माजी मुख्यमंत्री तथा आमदार लुईझिन फालेरो, माजी केंद्रीय मंत्री ॲड. रमाकांत खलप, आमदार आलेक्स रेजिनाल्ड, माजी मंंत्री ॲड. चंद्रकांत चोडणकर आणि एल्वीस गोम्स उपस्थित होते.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.