kamarabhat flood situation Santosh Kubal
गोवा

Goa: आणखी किती वर्षे आम्‍हाला बुडवणार?

कामराभाटवासीयांचा सवाल; पावसानंतर आता भीती डेंग्‍यू आणि मलेरियाची

Santosh Kubal

पणजी : पावसाळा सुरू झाला की ताळगाव पंचायत क्षेत्रातील कामराभाट येथील लोकांच्‍या काळजात धस्‌ होते. या झोपडपट्टीतील लोक जीव मुठीत घेऊन जगतात. दिवसाबरोबर रात्रही जागून काढताना पाऊस थांबण्‍यासाठी देवाकडे प्रार्थना (pray) करतात. कारण एकच...घरांमध्‍ये घुसणारे पावसाचे पाणी. दरवर्षी निर्माण होणारी ही समस्‍या आता त्‍यांच्‍यासाठी नवीन नसली तरी मुलाबाळांना कुशीत घेऊनच दिवस काढावे लागतात. नुकत्‍याच कोसळलेल्‍या मुसळधार पावसामुळे (heavy rain) येथील चार घरांमध्‍ये पाणी शिरले तर उर्वरित घरांना पाण्‍याने वेढले. यात दुर्घटना घडली नसली तरी आणखी किती वर्षे आम्‍ही अशी भीतीच्‍या छायेत काढायची, असा ग्रामस्‍थांचा प्रश्‍‍न आहे. पाऊस कमी झाला असला तरी डोक्‍यावर धोक्‍याची टांगती तलवार कायम आहे. आता पावसाचे पाणी ओसरल्‍यावर धोका आहे तो डेंग्‍यू (dengue) आणि मलेरियाबरोबरच (maleria) साथीचा रोगांचा.

मुसळधार पावसामुळे कामराभाट झोपडपट्टी पूर्ण पाण्‍याखाली गेली होती. आता तेथे सर्वत्र चिखल आणि माती (mud and sand) साचलेली आहे. त्‍यातूनच लोकांचे दैनंदिन व्‍यवहार सुरू आहेत, लहान मुले त्‍यातच खेळतात. ज्‍या घरांमध्‍ये पाणी शिरले होते, त्‍या कुटुंबांना पाऊस ओसरल्‍यानंतर थोडा दिलासा मिळाला असला तरी त्‍यांचे सामान आणि काही वस्‍तू वाहून गेल्‍या आहेत. त्‍यामुळे त्‍यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. आता ही कुटुंबे पुन्‍हा घरातील वस्‍तू जाग्यावर ठेवण्‍याच्‍या कामाला लागली आहेत. अजूनही त्‍यांच्‍या घरात चिखल आणि माती आहे. साफसफाई करण्‍यात ही मंडळी गुंतलेली आहे. गेल्‍या २५-३० वर्षांपासून कामराभाटवासीयांना पावसाळ्‍यात ही समस्‍या सतावत असली तरी कोणत्‍याही राजकीय पक्षाने वा नेत्‍याने त्‍यांचे दु:ख समजून घेतलेले नाही. फक्त निवडणुका (election) आल्‍या की त्‍यांना या झोपडपट्टीची आठवण येते. नाक मुठीत धरून आणि मान खाली घालून त्‍यांना तेथे त्‍यांना जावेच लागते. मात्र एकदा ही भेट दिल्‍यानंतर पाच वर्षे कोणी ढुंकूनसुद्धा तिकडे पाहत नाही. दाटीवाटीने उभ्‍या असलेल्‍या या दोनशे ते अडीचशे घरांचा (झोपड्या) वापर फक्त एकगठ्ठा मतांसाठी केला जातोय.

कामराभाटजवळच शेतीचे विस्‍तीर्ण मळे आहेत. पावसाळ्‍यात तेथे पाणी भरते. सलग तीन-चार दिवस पाऊस पडला तर हे पाणी शेतातून थेट कामराभाट वस्‍तीत शिरते. तेथे संरक्षक कठडा उभारला तर ही समस्‍या तेवढी सतावणार नाही. राजकारण्‍यांकडे तशी मागणी वारंवार करण्‍यात आली, मात्र अजूनपर्यंत कोणीच लक्ष दिलेले नाही. पाणी घरांमध्‍ये शिरल्‍यानंतर जेवढा त्रास होतो, त्‍यापेक्षा ते ओसरल्‍यानंतर शिल्लक राहिलेल्‍या चिखल, मातीमुळे होतो. साथीच्‍या रोगांचा सामना करावा लागतो.
- रवीबाबू होन्नावरकर, ग्रामस्‍थ

..........................................

सांतिनेज नाल्‍याचा (अगोदरची खाडी) ताळगाव पंचायत क्षेत्रात येत असलेला भाग नितळ आहे. आम्‍ही वेळोवेळी उपसून त्‍यातील गाळ काढतो. पण पणजी मनपा क्षेत्रात विशेषत: आयनॉक्‍सजवळ या नाल्‍यावर अतिक्रमणे करण्‍यात आलेली आहेत. त्‍यामुळे पावसाच्‍या पाण्‍याचा निचरा होण्‍यास अडचण निर्माण होते व कामराभाट परिसर पाण्‍याखाली जातो. दुसरे म्‍हणजे ज्‍या घरांमध्‍ये पाणी शिरते, ती घरे शेताजवळ बेकायदा उभारण्‍यात आलेली आहेत. तेथे संरक्षक भिंत उभारण्‍याचा विचार होता, पण काही शेतकऱ्यांनी त्‍यास आक्षेप घेतला आहे. तरीसुद्धा लवकरच तोडगा काढू.
- टेरेसीना बार्रेटो, पंचसदस्‍य
...........................
२०-२५ वर्षांपासून गाळ तसाच
सांतिनेज नाला जेथे कामराभाट परिसरात पोचतो, तेथील गाळ गेल्‍या २०-२५ वर्षांपासून काढलेलाच नाही असे ग्रामस्‍थांनी सांगितले. परिणामी नाल्‍याची खोली कमी होऊन गाळ वरपर्यंत आला आहे. या नाल्‍यात माणूस बुडण्‍याची शक्‍यता कमीच, पण गाळात रुतून त्‍याचा जीव जाण्‍याची भीती अधिक. तलावाच्‍या दुतर्फा कठडा आहे. त्‍यावर लहान-लहान मुले खेळत असतात. पाय घसरून ती पाण्‍यात पडण्‍याची शक्‍यता नाकारता येत नाही. दुसरी गोष्‍ट म्‍हणजे ग्रामस्‍थांच्‍या म्‍हणण्‍यानुसार, या नाल्‍यात मगरींचेही वास्‍तव्‍य आहे. भरपूर पाऊस पडतो तेव्‍हा नाल्‍यातील पाणी लोकवस्‍तीत आणि तेथे समोरच असलेल्‍या ख्रिश्‍‍चन बांधवांच्‍या क्रूसापर्यंत जाते. हा भाग पूर्णपणे पाण्‍याखाली जातो.
पोर्तुगीजकाळात व्‍हायची जलवाहतूक
काही वर्षांपूर्वी सांतिनेज नाल्‍याच्‍या सफाईसाठी १० कोटींची निविदा काढण्‍यात आली होती, पण नंतर माशी कोठे शिंकली हे कळायला मार्ग नाही. पोर्तुगीज काळात हा नाला नव्‍हताच मुळी, तर ती एक नदी होती. आणि ही नदी एवढी रुंद आणि स्‍वच्‍छ होती की तेथून जहाज वाहतूक व्‍हायची. पोर्तुगालहून माल घेऊन आलेली जहाजे मांडवी नदीतून याच मार्गाने आत प्रवेश करायची. आता तिची स्‍थिती आणि दुरवस्‍था पाहिली की, सांतिनेज नाला म्‍हणजे पूर्वी एक नदी होती, यावर कोणी विश्‍‍वाससुद्धा ठेवणार नाही.
शौचालय आहे, पण पाणी नाही!
ेयेथील लोकांसाठी तेथे एक सार्वजनिक शौचालय उभारण्‍यात आलेले आहे. पण तेथे वीज आणि पाण्‍याची सोय नसल्‍यामुळे गेल्‍या कित्‍येक महिन्यांपासून ते तसेच पडून आहे. लोकांनी वारंवार मागणी करूनही अजूनही तेथे पाण्‍याची सोय करण्‍यात आलेली नाही. त्‍यामुळे लोकांची प्रचंड गैरसोय होत आहे. दरम्‍यान, कचऱ्याची समस्‍या कामराभाटमध्‍ये तीव्र बनत चालली आहे. लोक घरातील कचरा या शौचालयाच्‍या बाजूलाच नेऊन टाकतात. विशेष म्‍हणजे तेथे ‘नो गार्बेज झोन’चा फलक लावलेला आहे. तेथून जवळच हाकेच्‍या अंतरावर प्राथमिक शाळा आहे. मुलांना आणि शिक्षकांना नाक मुठीत धरूनच तेथे बसावे लागते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Medical College: गोमेकॉत नाकातून मेंदूची शस्त्रक्रिया लवकरच सुरु होणार; गोमंतकीय रुग्णांना मिळणार मोफत उपचार!

Maharashtra Election: निवडणूक बंदोबस्तातील गोवा पोलिसाचं मुंबई 'पर्यटन'; फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये उतरला...

Goa News: 'कॅश फॉर जॉब'; त्यांनी "क्लीन चीट" शब्द कुठेच वापरला नाही, मुख्यमंत्री स्पष्टच बोलले! वाचा दिवसभरातील ठळक घडामोडी

भाजपने IFFI आंतरराष्ट्रीय फ्रॉड फेस्टिव्हल केलाय, गोवन फिल्म विभागावरुन काँग्रेसने सरकारला विचारला मोठा सवाल

Goa Crime: गोव्यात आंतरराष्ट्रीय मानवी तस्करी रॅकेटचा भांडाफोड; ओमानमध्ये नोकरीचे आमिष देऊन महिलांना फसवलं, 2 अटक

SCROLL FOR NEXT