पणजी: मडगाव येथील एका खासगी जमिनीवर जमीनमालकाची कोणतीही पूर्वपरवानगी किंवा संमती न घेता आणि भूसंपादनाची प्रक्रिया न राबवता थेट बांधकाम केल्याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने प्रशासन आणि संबंधित अधिकाऱ्यांना चांगलेच फटकारले आहे.
प्रशासनाला खासगी जागेत घुसून रस्ता बांधण्याचा अधिकार कुणी दिला, अशा कडक शब्दांत न्यायालयाने प्रशासनाला सुनावले. तसेच, संबंधित जमीनमालकाला जुन्या दराने नव्हे, तर आजच्या बाजारभावानुसार मोबदला द्यावा, असे स्पष्ट निर्देश खंडपीठाने दिले आहेत.
मडगाव येथील तक्रारदाराच्या मालकीच्या खासगी जागेवर प्रशासनाने कोणतीही कायदेशीर प्रक्रिया पूर्ण न करता बांधकाम केले होते. या अतिक्रमणाविरोधात जमीनमालकाने उच्च न्यायालयात धाव घेतली. सुनावणीदरम्यान, जमीनमालकाची संमती न घेताच रस्ता बांधण्यात आल्याचे सरकारी वकिलांनीही मान्य केले. त्यावर खंडपीठाने तीव्र नाराजी व्यक्त केली.
सुनावणीदरम्यान सरकारी वकिलांनी बाजू मांडताना सांगितले की, सरकार या जमिनीसाठी भूसंपादन कायद्यानुसार ठरलेला ३ लाख ९१ हजार रुपये इतका मोबदला देण्यास तयार आहे. मात्र, न्यायालयाने सरकारचा हा युक्तिवाद फेटाळून लावला. कोणत्याही परवानगीशिवाय खासगी मालमत्तेवर अतिक्रमण करून जुन्या किंवा कमी दराने भरपाई देणे योग्य नसल्याचे मत न्यायालयाने नोंदवले. जमीनमालकाला आजच्या प्रचलित बाजारभावानुसारच मोबदला मिळायला हवा, असे खंडपीठाने स्पष्ट केले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.