Heavy rain in goa Dainik Gomantak
गोवा

Goa News: '..जगणं झालयां लाचार, आभाळ फाटलं', पर्जन्यराजा कोपला; गोव्यात शेती पडली आडवी

Goa Agriculture Damage: यंदा समाधानकारक पीक मिळणार अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती. मात्र ऐन कापणीच्यावेळी पावसाच्या रूपाने नैसर्गिक आपत्ती कोसळल्याने शेतकऱ्यांच्या आशेवर पाणी पेरले आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

डिचोली: राज्‍यात पावसाचे धुमशान सुरूच आहे. त्‍यामुळे शेतीला मोठा फटका बसला आहे. डिचोलीतील बोर्डे, मये आदी भागातील भातशेती पाण्याखाली गेली असून प्रचंड प्रमाणात नुकसान झाले आहे.

यंदा समाधानकारक पीक मिळणार अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती. मात्र ऐन कापणीच्यावेळी पावसाच्या रूपाने नैसर्गिक आपत्ती कोसळल्याने शेतकऱ्यांच्या आशेवर पाणी पेरले आहे. बोर्डेसह मये आदी भागातील भातपिक यंदा बुडाल्यातच जमा झाले आहे. या नैसर्गिक आपत्तीमुळे यंदाही शेतकऱ्यांची मेहनत वाया जावून, त्यांना मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसानीला तोंड द्यावे लागणार आहे, हे जवळपास निश्चित आहे.

पर्जन्यराजाचा कोप झाल्याने यंदा हातातोंडाशी आलेला घास मातीमोल होण्याच्या वाटेवर आहे. यंदा प्रचंड प्रमाणात नुकसानी सोसावी लागणार, अशी भीती शेतकरी व्यक्त करत आहेत. दरम्यान, विभागीय कृषी खात्याच्या अधिकाऱ्यांनी मये, बोर्डेसह विविध भागातील भातशेतीची पाहणी करुन आढावा घेतला आहे.

आठवडाभरापासून पर्जन्यवृष्टी सुरूच

गेल्या जवळपास सात दिवसांपासून पर्जन्यवृष्टी सुरू आहे. डिचोलीतील बोर्डे, मयेसह विविध भागातील भातशेती आडवी झाली आहे. शेतीत साचलेले पाणी आणि पावसाचे सावट लक्षात घेता सध्या भातकापणी सोडाच, कापणी यंत्रही शेतीत उतरविणे अवघड आहे. त्यामुळे यंदा हातातोंडाशी आलेले पीक वाया गेल्यातच जमा झाले आहे. या आपत्तीमुळे बळीराजा पुरता गलितगात्र बनला आहे. सरकारने शेतकऱ्यांना आधार द्यावा, अशी मागणी बोर्डे येथील भीमाकर पळ आणि अन्य शेतकऱ्यांनी केली आहे.

‘हार्वेस्टिंग’ यंत्रे उपलब्ध; मात्र कामे पडली लांबणीवर

पेडणे तालुक्यात सध्या भात कापणी व मळणीची कामे सुरू आहेत. मात्र पावसामुळे शेतीच्या या कामात व्यत्यय निर्माण झाला आहे. काही शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. तालुक्यात सगळीकडे शेती मळ्यातील शेती कापणीसाठी तयार झाली असून सरकारतर्फे मिळणाऱ्या सवलतीद्वारे हार्वेस्टिंग यंत्रे उपलब्ध आहेत मात्र या कामात पावसामुळे व्यत्यय आला आहे.

तालुक्यात ४५ ते ५० टक्के कापणी व मळणी झालेली असताना अवकाळी पावसामुळे यंत्राद्वारे सुरू असलेले शेतीची कामे बंद ठेवावी लागत आहेत. तालुक्यात अनेक ठिकाणी पिकलेले भात पावसामुळे आडवे झाले आहे. शेतीत पाणी साचल्याने भाताला कोंब येऊन भात कुजून जाण्याची शक्यता आहे. आडवे झालेली भात शेती कापणी मळणीचे काम करताना यंत्राला बराच वेळ खर्च करावा लागतो. भात कापताना अचानक पाऊस आल्यास भात कापणीचे काम अर्ध्यावरच सोडावे लागते.

पडवीतच मळणी; सत्तरीत बळीराजा हैराण

वसांपासून पडत असलेल्‍या जोरदार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. तसेच हातातोंडाशी आलेला शेतीचा घास हिरावला गेल्‍यातच जमा आहे. दररोज सकाळच्या वेळेस मुसळधार सरी कोसळतात, दुपारनंतर थोडी उसंत मिळते, मात्र संध्याकाळ होताच पुन्हा पावसाला सुरुवात होते. त्यामुळे नागरिक आणि शेतकरी दोघेही हैराण झाले आहेत.

दिवाळीच्या सणात नागरिकांना घराबाहेर पडणेही अवघड बनले आहे. या अनियमित आणि सततच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होऊ लागले आहे. भातशेतीला कोंब येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.वाळपई विभागीय कृषी अधिकारी विश्वनाथ गावस यांनी सांगितले, पाऊस असाच कायम राहिला तर भातपिकांना कोंब येण्याचा धोका संभवतो.

काही शेतकऱ्यांनी कापणी पूर्ण केली आहे तर काहींची व्‍हायची आहे. नोव्हेंबरपर्यंत अनेक ठिकाणी भातशेती पिकेल. मात्र पाऊस असाच राहिल्यास मोठ्या नुकसानीची शक्यता आहे.दरम्‍यान, सत्तरीतील लहान-मोठ्या शेतकऱ्यांची स्थिती बिकट झाली असून, पावसाने आता थोडी विश्रांती घ्यावी, अशीच सर्वजण प्रार्थना करत आहेत.

हळदोण्‍यात शेती कुजण्‍याची भीती

गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे भातशेती पाण्याखाली गेली आहे. कापणीचे काम ठप्प पडले आहे. त्यामुळे हळदोणा आणि परिसरातील शेतकरी हवालदिल बनले आहेत.

पावसाचे पाणी शेतीत साचले आहे. अपेक्षित उघडीप न मिळाल्याने ओलाव्यामुळे उभे पीक कुजण्याची शक्यता वाढली आहे. कापणीनंतर भात वाळवण्याच्या प्रक्रियेतही अडथळे येत आहेत. भिजलेले धान्य बुरशी, अंकुर आणि वजन घट यांसारख्या समस्यांना आमंत्रण देत आहे.

काही शेतकऱ्यांनी धाडस करून पावसातच कापणी केली, पण त्यांच्यासमोर नवीन अडचणी उभ्या राहिल्या आहेत. सूर्यप्रकाश नसल्याने किंवा हवापुरवठा न झाल्याने धान्य सुकवता येत नाही. ताडपत्र्यांखाली झाकलेले भाताचे गठ्ठे आर्द्र हवेमुळे पुन्हा भिजत आहेत. पाऊस लवकर थांबला नाही तर कापलेले धान्य वाया जाण्याची भीती शेतकऱ्यांना आहे.

सध्या शेतात कापणी यंत्रे उभी आहेत आणि कामगार हवामान सुधारण्याची वाट पाहत आहेत. संततधार पावसामुळे अनेक ठिकाणी भाताचे देठ वाकले असून उत्पादनाचा मोठा भाग वाया जाण्याची शक्यता आहे. जर हवामान लवकर सुधारले नाही तर अनेक शेतकरी कुटुंबे आर्थिक संकटात सापडणार आहेत.

मोरजीत भातशेती आडवी

पावसामुळे मोरजीतही भातशेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी शेती पाण्याखाली गेली आहे. त्‍यामुळे शेतकरी चिंतेत सापडले आहेत. कृषी खात्याने नुकसानीची पाहणी करून तातडीने भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकरी यशवंत ऊर्फ आप्पा शेटगावकर यांनी केली आहे.

प्रत्येक शेतकरी काबाडकष्ट करून, मेहनत-परिश्रम घेऊन शेती करत असतो. परंतु सध्‍या मोरजी पंचायत क्षेत्रातील शेतीकडे पाहिले तर अनेक ठिकाणी शेती पाण्‍याखाली जाऊन कुजलेल्या अवस्थेत असल्‍याचे दिसून आले. त्यामुळे कृषी खात्याने याची त्‍वरित दखल घ्‍यावी, अशी मागणी करण्‍यात येत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Jogamma Jogappa History: कार्तवीर्य अर्जुनाने जमदग्नीचा वध केल्याने रेणुका विधवा झाली; जोगम्मा आणि जोगप्पाची कथा

"शाहबाज शरीफ आणि आसिफ मुनीर महान लोक...''; दहशतवाद पसरवणाऱ्यांना ट्रम्प यांच्याकडून 'ग्रेट पीपल'चा दर्जा, आसियान परिषदेत उधळली स्तुतीसुमने

Upcoming Phones: Realme, OnePlus... 'या' आठवड्यात लॉन्च होणार 'हे' जबरदस्त स्मार्टफोन; फीचर्स एकदा पाहाच…

गोमंतकीय जोडप्याने मणिपूरात उभारले प्रार्थनास्थळ; मुनपी गावात पहिल्यावहिल्या 'सेंट जोसेफ चर्च'चे लोकार्पण!

ENG vs NZ 1st ODI: इंग्लंडच्या हॅरी ब्रूकचा महाविक्रम! 32 वर्षांपूर्वीचा रॉबिन स्मिथचा मोडला रेकॉर्ड; एकाकी लढत देऊन ठोकले 'दमदार शतक' VIDEO

SCROLL FOR NEXT